चक्क खड्ड्यांमध्ये तांदूळ
चक्क खड्ड्यांमध्ये तांदूळ
आपण आपल्या घरात धान्य साठवायचे झाल्यास विविध कणग्या, पेट्या, कोठी, पिंप, लादनीचा वापर करतो. पूर्वीच्या काळातील घराच्या भिंतीतील कोठार आजही काही गावात बघायला मिळतात. आंध्र प्रदेश व ओरिसा राज्याच्या सीमावर्ती गावांमध्ये अंगणात खड्डे करून धान्य साठविण्याची अनोखी पद्धत बघायला मिळते. तांदूळ सारखे धान्य साठवायला ते कोणत्या धातूच्या पेटीचा वापर न करता थेट घराबाहेर अगदी रस्त्यांवर 5 ते 7 फुट खड्डा खोदतात व त्यात नवीन तांदूळ पुरतात. ह्या पद्धतीला पिट राईस या नावाने ओळखल्या जाते.
ह्या भागातील लोकं फारसे आर्थिकदृष्ट्या संपन्न नसल्याने त्यांचे घरे छोटी आहे. लहान घर व सदस्य अधिक असल्याने घरातील मुख्य पिक तांदूळ साठवायला जागा राहत नाही. त्यामुळे एका कुटुंबाला पुरेल एवढा तांदूळ ते जमिनीत पुरवितात. जून महिन्यात तांदूळ पिकाची कापणी व मळणी झाल्यानंतर घरासमोर धान्यानुरूप खड्डा केला जातो. त्याला शेणाने सारविल्या जाते. त्यांनतर त्या खड्यात तांदूळ पुरविला जातो व नंतर खड्डा बुजवून त्यावर रांगोळी घातल्या जाते. हा तांदूळ साधारण चार महिने जमिनीत साठवला जातो. आजही आंध्र प्रदेशात व ओरिसा राज्यातील सीमावर्ती भागातील इच्छापूरम, टेकाली, पलासा , पठ्पट्टनम, मंडपल्ली या भागात हि पारंपारिक पद्धत बघायला मिळते.
न्यारी चव:-
अश्या पद्धतीने तांदूळ साठविल्याने तांदूळ खराब होत नाही शिवाय खायला सुद्धा चविष्ठ लागतो. याचा भात दोन दिवस टिकतो. यामुळे घरातील लहान मुलं व म्हातारी माणसांना हा तांदूळ अधिक मानवत असल्याचे इथल्या स्थानिकांचे मत आहे. ह्या तांदुळाचे ईतर पदार्थ बनवितांना ह्याला छोट्या चाकाच्या गिरणीवर दळल्या जाते यामुळे याची पोषकता कायम राहते. खड्यातील हा तांदूळ सुमारे दोन वर्ष वापरल्या जातो.