पेंचचा निसर्ग रक्षक – बंडूभाऊ उईके
पेंचचा निसर्ग रक्षक – बंडूभाऊ उईके
पेंच व्याघ्र प्रकल्प मध्य भारतात सातपुडा पर्वत रांगेत असलेले एक सुंदर ठिकाण. पेंचच्या सुरक्षेसाठी येथील वनविभाग तर कार्यरत आहेच पण येथील स्थानिक आदिवासी व्यक्तींमुळे सुद्धा या जंगलाचे विविध प्रकारे संरक्षण व संवर्धन केल्या जात आहे. घाटपांढरी गावातील एका आदिवासी कंत्राटी वनमजुराच्या पोटी जन्माला आलेले बंडूभाऊ उईके हे असेच अनोखे वनरक्षक आहे जे सध्या सातपुडा फौंडेशन अंतर्गत निसर्ग संवर्धनाचे मौलिक काम करत आहे.
बंडूभाऊना वडिलांच्या छत्रछायेखाली जंगलाची आवड निर्माण झाली. यातून त्यांचा जंगलाचा अभ्यास सुरु झाला. लहानपणी सरपटणारे प्राणी पकडण्याचा छंद असलेल्या बंडूभाऊंनी एकदा एका उंदीराला सापाच्या तावडीतून वाचविले तेंव्हा त्यांनी हि बाब तत्कालीन वन अधिकाऱ्यांना सांगितली. अवस्थी नावाच्या अधिकाऱ्याने तेंव्हा बंडूभाऊना जंगलातील अन्नसाखळी समजावून सांगत उंदीराला जीवदान देण्याच्या नादात सापाला कसे उपाशी ठेवले हे समजावून सांगितले तेंव्हापासून प्रत्येक वन्यजीव कसा व किती महत्वाचा आहे हे त्यांना कळले.
त्यानंतर त्यांनी वनविभागसोबत पेट्रोलिंग मधील सहकार्य, विविध शिकारी प्रतिबंधक कामकाज, वनवणवा तसेच जंगलात पानवठा निर्माण करणे, लाकूडतोडी प्रतिबंधन सारख्या निसर्ग संवर्धनाच्या विविध कामात सक्रीय सहभाग नोंदविला. हे काम करतांना सातपुडा फौंडेशनचे संस्थापक किशोर रिठे यांच्याशी भेट झाल्यानंतर ते सध्या सातपुडा संस्थासाठी योगदान देत आहे. एका दुर्गम भागातील रहिवासी असलेल्या बंडूभाऊंनी पदवीचे शिक्षण पूर्ण करून कधीकाळी मुंबई, कलकत्ता सारख्या मेट्रोसिटीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आहे. स्थानिक आदिवासींसाठी शासकीय कोणत्या योजना आहेत याचा देखील त्यांचा दांडगा अभ्यास आहे. याचा वापर ते जागृतपणे आपल्या समाजातील लोकांसाठी करतात. घरासाठी व स्वयंपाकाच्या सरपणासाठी होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी त्यांनी स्थानिकांची जनजागृती करत आदिवासी भावंडाना सिलेंडर गैसची सबसिडी योजना, घरकुल योजना सर्वांपर्यंत पोहोचविली. शिवाय बाहेरच्या व्यक्तीच्या पैस्याच्या मोहात आपण न पडता हे जंगल आपल्यासाठी कसे पालनपोषण कसे महत्वाचे आहे हे ते स्थानिकांना पटवून देतात. वयाच्या तिशीच्या टप्प्यात त्यांनी कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर मात करत आपले निसर्ग शिक्षण व निसर्गसंवर्धनाचा वसा पार पाडत आहे.