पडीक जमिनीतून दरवळणार सुगंध
महाराष्ट्रातील अनेक गावात शासनाच्या इ क्लास जमिनी आहेत. काही ठिकाणी ह्या जागा पडीक, ओसाड आहे . अमरावती जिल्हातील पार्डी (ता.मोर्शी) येथील गावकऱ्यांच्या एकजुटीने ओसाड व खडकाळ जमिनीचे सोने केले आहे. या जागेवर बांबू उत्पादन घेत त्याद्वारा रोजगार निर्मितीसह त्या बांबूपासून अगरबत्ती साठी काडी काढल्या जाणार आहे. गावकऱ्यांच्या परिश्रमातून फुललेल्या मळ्याच्या अगरबत्तीतून सर्वत्र सुगंध दरवळणार आहे.
पार्डी ग्रामपंचायतने गावकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणून स्थानिक जागेवर दोन वर्षाच्या अथक परिश्रमातून बांबू वनस्पतीची बाग फुलविली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून पार्डी गावालगत असणाऱ्या 70 पैकी 60 एकर ई क्लास खडकाळ जमिनीवर 18 हजार विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक 12 हजार वृक्ष हे बांबूचे आहेत. यासोबतच केशर आंबा, चिकू, सीताफळ, पेरू, कडुनिंब, उंबर अशा विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. बांबू वनस्पतीचे आयुष्य सुमारे ४० वर्ष असून दरवर्षी याची कटाई करता येते. दोन वर्षानंतर बांबू वनस्पती चांगली बहरली असून लवकरच या पासून अगरबत्ती व कुल्फीची काडी म्हणून या बांबूचा वापर केला जाईल. या गावचे रहिवासी प्रवीण ठवळी हे पुण्यात उद्योजक असून त्यांच्या दूरदृष्टीकोन व गावकर्याच्या सहकार्यातून गावाचा कायापालट होत आहे. सरपंच वर्षा वानखडे व ईतर ईतर ग्रामस्थांनी गावाचा शाश्वत विकास व्हावा म्हणून ई क्लास जमिनीवर विविध वनस्पतीची लागवड केली आहे.
मेळघाटातील ‘राहू’ या सहाशे लोकवस्तीच्या ग्रामपंचायतने प्रत्येक घराला लखपती बनविले आहे. राहू ग्रामपंचायत बांबू उत्पन्नातून करोडोची उलाढाल करणारे गावं म्हणून सर्वत्र सुपरिचित आहे. त्याच धर्तीवर पार्डी गावाने बांबू वनस्पती व फळझाड मार्फत रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. यामुळे गावातील नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. या विकासाची दखल घेत सरकारने पार्डी गावाचा ”माझी वसुंधरा अभियान” पुरस्काराने गौरव केला आहे.