संस्कृती विश्व

पंढरीची वारी with सायकल सवारी

राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो सायकलपटू विठ्ठल दर्शनाला

 

पंढरीची वारी with सायकल सवारी

वारी पंढरीची वैष्णवांचा मेळा, मुखी हरी नाम भाळी चंदन टिळा ..

चालतो मी वारी, लीन तुझ्या दारी ,तुझा मी विठ्ठला…वारकरी

असे नानाविध अभंग, कीर्तन म्हणत पताका घेत वारकरी गत महिनाभरापासून पंढरपूर रस्त्याने बघायला मिळत आहे. वारीमुळे एक वेगळीच आत्मानुभूती मिळत असल्याने अनेक व्यक्ती विठ्ठलाच्या नामजपात लीन होत वारीत सहभागी होतात. कोणी हि वारी ठरवून करतात तर कोणाची न ठरवता हि वारी घडून येते. या वारीसाठी शेतकरी आपल्या शेताची नांगरणी, पेरणी करून पुढील पावसाची वाट न बघता वारीत समाविष्ठ होतो, या वारीत केवळ शेतकरी, व्यापारी, नोकरदार, छोटा व्यावसायिक तर कोणी मोलमजुरी करणारा असे नानाविध व्यक्तिमत्व भक्त म्हणून या वारीत आपला जमेल तसा सहभाग नोंदवतात. पायदळ वारी आपण पालखी व दिंडीद्वारा अनुभवली आहे. पण राज्यातील कानाकोपऱ्यातून पांडुरंगाच्या दर्शनासाठी भक्त सायकल प्रवास करत सायकल वारीचा अनोखा अनुभव घेत आहे.

अखिल महाराष्ट्र सायकल वारी महासंमेलन नुकतेच पंढरपूर येथे दिनांक 6 व 7 जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते. गत तीन वर्षापासून हे महासंमेलन घेण्यात येत आहे. यापूर्वी पंढरपूर व बारामती तर यावर्षी नाशिक जिल्ह्याने महासंमेलनाचे आयोजन केले. महाराष्ट्रातील 34 मोठ्या सायकलिंग संघटना या संमेलनाच्या निमित्याने एकत्र येतात. पांडुरंगाच्या चरणी लीन होतात सोबतच सायकलिंग, व्यायामाचे फायदे, प्रबोधन, चर्चा. साद-प्रतिसाद व अनुभवांचे आदान प्रदान या निमित्याने होते. याकरिता प्रत्येक जिल्ह्यातील सायकल वारकरी यांचेकडून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविली जाते. आयोजकांच्या वतीने त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. 6 जुलै रोजी राज्यातील अनेक सायकल वारकरी पंढरपूर येथे दाखल झाले. कोणी एक दिवस, कोणी दोन दिवस तर कोणी पाच ते सहा दिवस सायकलने प्रवास करत पंढरपूर येथे पोहचले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे  संपूर्ण पंढरपूरला प्रदक्षिणा मारून सकाळी 6 वाजता विठ्ठल रुख्मिणी संस्थानच्या प्रांगणात भव्य सायकल रिंगणचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक वारकऱ्यांनी आपली सायकल वर्तुळाकार रचनेत लावत रिंगण खेळल्या गेले.

नाशिककरांची सायकलवारी :-

नाशिकमधील सायकललिस्ट फौंडेशन साधारण 12 वर्षापासुन् नाशिक ते पंढरपूर सायकल वारी करतात. निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी हरीश बैजल यांच्या मातोश्री लज्जावती बैजल यांच्या स्मरणार्थ हि वारी सुरु करण्यात आली. वारकरी संप्रदाय रुजावा, युवा पिढी व्यसन मुक्त राहावी म्हणून यावर्षी पर्यावरण वाचवा, अंमलीपदार्थ  मुक्त देश असा सामाजिक संदेश देत वारी पूर्ण केली. यावर्षी या  300 नाशिककर सहभागी झाले होते. नागपूर येथील मानेवाडी येथून 32 सायकल वारकरी यावर्षी पंढरपूरला सायकलवारीत सहभागी झाले. गत तीन वर्षापासून हि वारी सुरु आहे. यावर्षी 32 व्यक्तीं यात सहभागी आहे. विशेष म्हणजे यात 2 महिला सायकल वारकरी समाविष्ट आहे. तब्बल 5 दिवस सलग सायकलिंग करून 750 प्रवास करून ते पंढरपूर प्रवास पूर्ण केला.

आय.ए.एस ची सवारी

पुणे येथील इंडियन एथेलेटिक सोसायटी (आयएएस) अंतर्गत या वारीत सुमारे 1734 लोकांचा समावेश होता. गजानन खैरे यांनी 2016 मध्ये 6 मित्रांसह या वारीची सुरुवात केली. आयएएसने खूप सुंदर आयोजन करत प्रत्येक वारकऱ्यासाठी एनर्जी ड्रिंक, जेवण व उत्तम स्वास्थ साठी अम्बुलंस सुविधा सह जागोजागी स्वयंसेवक सुविधा पुरविली. या वारीत सहभागी झालेले शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी पहाटे सव्वा तीनला सायकलिंग ला सुरुवात करत सलग अठरा तास प्रवास करत 250 किमी अंतर पार पंढरपूर गाठले. हा अनुभव फार सुखद असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथील आय टी इंजिनिअर असलेले सिद्धार्थ वाघ यांनी मुलगा मल्हार (वय 13) व मुलगी मीरा (वय10) व पत्नीसह हि वारी पूर्ण केली.

निसर्गानुभव :-

सायकलने पंढरपूर चा प्रवास खरं तर हा आगळावेगळा अनुभव असतो. एरव्ही आपण एकट्याने नियमित रस्त्याने प्रवास करतो पण या वारीत तुम्ही संघ भावनेने प्रवास करता त्यामुळे इर्षा,द्वेष स्पर्धा नाहीशी होऊन एकमेकांबद्दल जिव्हाळा, आपुलकी, प्रेम निर्माण होते. निसर्गरम्य वातावरणात उन्ह,पाऊस,थंडी न जाणवता रस्त्याने झाडाखाली जेवण, गावात थोरा मोठ्या महिलांद्वारा  फुलांची उधळण या वेगळाच आनंद सोहळा असल्याचे विटा (सांगली) येथील सायकल वारकरी नवनाथ कदम यांनी सांगितले.

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close