एका ‘शंकरा’ ची तपस्या !
लेखन – रघुनाथ पांडे
सातपुड्यातील या शंकराने कधीच कशाची अपेक्षा केली नाही. सातपुड्याच्या डोंगरातील वझ्झर गावात अंबादासपंत वैद्य दिव्यांग बालसुधारगृह स्थापन करून गेली तीस वर्षांपेक्षा अधिक काळ राहणाऱ्या शंकरराव पापळकर नावाच्या तपस्याला भारत सरकारनं पद्मश्री खिताब देण्याचा निर्णय घेतला..दोन वर्षापूर्वी अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाने डी.लिट. दिली. शंकरराव गाडगेबाबांची नाळ घेऊन त्यांचा वसा चालवत आहेत. हे केवळ वाक्य नाही. तर, त्यांचे आचरणही असेच आहे.
बोलता बोलता शंकरबाबा म्हणाले –
” हातों के लकिरों के,
फरेंबो मत आना..
जोतिष कें दुकानों में,
किस्मत नही बिकती..”
•••
तसा, त्यांचा पापळकर.. शंकर..शंकरराव..ते शंकरबाबा हा प्रवास विलक्षण प्रेरणादायी आहे. हा माणूस वयोमानाने ८० च्या आसपास असेल, पण त्यांची धडाडी तारुण्यसुलभ आहे. अफाट जनसंपर्क, धडपडण्याची प्रचंड उमेद आणि हे सारे टिकावे..वाढावे म्हणून जिभेवर साखर ठेवण्याची वृत्ती. गेली ३५-३६ वर्षे हा त्यांचा प्रवास मी अत्यंत जवळून पाहतो आहे.. कडक खादीचा पण परीटघडीचा पांढरा शुभ्र खादीचा झब्बा पायजमा ते घालत. झब्याच्या कोनाला ते फाडून टाकीत…लहानसे भोक करीत; त्यातून सुताची तुसं दिसत. असे करण्यामागे त्यांचा समज भारी होता. गरिबीतून वर आलेला ‘मी’ असा कडक राहिलो तर लोक काय म्हणतील? असे म्हणताना, ते विसरुन जात,की आपल्याजवळ आजही तीनच झब्बे-पायजमे आहेत.
आज या प्रश्नाचे उत्तर त्यांनी त्यांच्या अभूतपूर्व कष्टाने दिले.
माझे काका, रा. ना.पांडे जिल्हा परिषदेत मुख्याध्यापक होते. ज्यांना मी मोठेबाबा म्हणायचो. त्यांनी एकदिवस या माणसाला आमच्या घरात आणले. नक्की साल कोणते ते माझ्या लक्षात नाही. कळतही नव्हते अशा वयात शंकरकाका माझे वडील अं. ना. पांडे यांच्यासोबत त्यांच्या सायकलवर फिरत. एका हाती ‘देवकीनंदन गोपाला’ हे मासिक आणि दुसऱ्या खांद्यावर शबनम.!! बेसन, भात, भाकरी आई जेवणात वाढे; कधी डबा देई. सणावाराला काका आणि देवाचे ताट असेच समीकरण असे..म्हणजे, स्वतः पापळकर काका सांगतात,” मी या घरी पहिल्यांदा आलो, त्यादिवशी घरी कुठलासा सण होता. मला बघून तुझे बाबा मला हात धरून देवघरात घेऊन गेले. मी नमस्कार केला. ते सोवळ्यात होते. मी त्यांना म्हटले, भाऊसाहेब मी जातीनं धोबी आहे. तुम्ही देवघरात आणले. तेव्हा, त्यांनी प्रसाद हातावर दिला आणि देवाचे ताट माझ्यासमोर केले. मी जेवलो. मग सगळेच सणवार आणि कैकदा हा क्रम होता.”
माणुसकीच्या या निर्मळ जिव्हाळ्यावर शंकरकाका गेली अनेक वर्षे आमच्या घरात आहेत.
गाडगेबाबा आणि शंकरराव पापळकर यांच्यातील अनेक साम्यस्थळे आहे. जी अनुयायांत असतात; ती सारीच. पापळकरकाका आणि गाडगेमहाराज त्यांच्या अखेरच्या काळात बरेचदा एकत्र असायचे. कधी कीर्तन तर कधी फ़िरस्ती. गाडगेबाबा अमरावतीच्या इर्विन हॉस्पिटलमध्ये भरती होते. १८ डिसेंबर १९५६ हा तो दिवस. गाडगेबाबांनी त्यांची पांघरायची घोंगडी शंकरराव पापळकर नावाच्या अनुयायास दिली…ती कायम त्यांच्या खांद्यावर आहे. या घोंगडीचा स्पर्श व्हावा म्हणून आर .आर आबा पाटील यांनी पापळकर यांची खास भेट घेतली होती.
तर, थोडे मागे जावू..
अमरावतीत गाडगेबाबांच्या समाधिमंदिराजवळ तुकाराम पाटील नावाची दुमजली एक चाळ होती. तिच्या वरच्या माळ्यावर पापळकरांचे कार्यालय होते. अत्यंत साधे आणि आपुलकी जाणवू देणारे.
‘ देवकीनंदन गोपाला ‘या मासिकाचे शंकरराव पापळकर संपादक होते. हे मासिक गाडगेबाबाच्या विचारांचा पुरस्कार करणारे. पण, कुतुहल म्हणजे आजपासून पस्तीस वर्षांपूर्वी देशभरातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थेच्या (आजच्या भाषेत कार्पोरेट) बहुरंगी जाहिरात घेणारे मासिक. मासिकाच्या दिवाळी अंकात देशातील मोठी उदयॊगघराणी जाहिराती देत. टाटा समूहाच्या अनेक प्रोडक्टच्या जाहिराती याच मासिकात असायच्या…आणि शंकरराव पापळकर नावाच्या पत्रकाराला टाटा थेट ओळखायचे. या नावाच्या बरोबरीने अजून कोणती नावे सांगू? अव्वल दर्जाचे साहित्यिक या मासिकात लिहायचे. त्यांना पापळकर अंक पाठवायचे, मानधन द्यायचे. दिवाळीत मिठाईचा पुडा न विसरता दिवाळी अंकासह मिळत असे. आचार्य रजनीश, जे. कृष्णमूर्ती, भीमसेन जोशी, माधवराव गडकरी, विद्याधर गोखले, गो.नी. दांडेकर, अत्रे, करंदीकर, राम शेवाळकर, शांताराम, दादा कोंडके, अरुण साधू, जगदीश खेबुडकर अशी दिग्गज मंडळी लिहायची. राजकारणी आवर्जून लिहायचे. अमरावतीला विद्यापीठ व्हावे म्हणून त्यांनी एक अंक काढला होता. सुधाकरराव नाईक, सूर्यकांत जोग, रा.सु.गवई यांच्यासह काही अधिकाऱ्यांचे लेख त्यात होते. छपाईचा दर्जा, कागदाकडे त्यांचे बारीक लक्ष असे.
म्हणूनच, पत्रकार शंकरराव पापळकर ते शंकरबाबा पापळकर यांचा सामाजिक वावर एका विद्यापीठापेक्षा कमी नाही.
अगदी थेट लिहायचे तर –
बेवारस म्हणून सापडलेली लहान मुले १८ वर्षांपर्यंत बालसुधारगृहात राहू शकतात. नंतर त्यांचे तेथील दाणापाणी संपते. त्यानंतर पुढे त्यांचे काय होते? बालसुधारगृहातून पुन्हा बाहेर पडणार्या या बेवारस दिव्यांग मुलामुलींचे जीवन वाचवा, अशी हाक शंकरराव पापळकर यांनी दिली…आणि दिव्यांगांचे नवे आयुष्य जगापुढे आले.
काळाच्या ओघात उन्हापावसाने रापलेला त्यांचा चेहरा आताही लहान मुलांच्या ‘उज्ज्वल उद्यासाठी’ उमेद ठेवून आहे. मागील ३२ वर्षे पापळकर वझ्झरच्या बालसुधारगृहातून लहान मुलामुलींचे संगोपन करतात. या बालसुधारगृहातील मुलामुलींची लग्ने लावून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा ध्यास त्यांनी घेतला. साहजिकच शंकरराव पापळकर ही व्यक्ती ‘शंकरबाबा’ म्हणून लौकिकास पात्र ठरली. समाजाच्या ढोंगीपणाला नाकारून त्यातील चांगुलपणा शोधून शंकरबाबांनी आजवर २६-२७ बेवारस दिव्यांग मुलामुलींची लग्ने लावली. त्या सर्वांची आडनावे पापळकर आणि वडिलांचे नाव – शंकर!!
बाबांच्या सुधारगृहात असलेली सारीच मुले-मुली बेवारस आहेत. कुठे नालीतून, मंदिरात, रेल्वे-बसस्थानकांवर ही दिव्यांग मुले एक-दोन वर्षांची असताना सापडली. हातच्या फोडाप्रमाणे त्यांच्यावर माया लावल्यानंतर ती १८ वर्षांची झाली की त्यांना बाहेर काढा, असा संवेदना बोथट असलेला सरकारी नियम आहे. १८ वर्षांची तरुण मुलगी मग कुठे जात असेल? हा प्रश्न जिव्हारी लागणारा आहे. समाज अशांसाठी किती साह्यभूत ठरतो? किंवा परिस्थितीला शरण जाऊन मग ही तरुण मुलगी नेमकी कोणता मार्ग शोधत असेल? उत्तरालाच अनाथ करणारेच हे सारे प्रश्न. खरंच, सरकारी गतिमंदता केव्हा संपेल? मागील वीस वर्षांपासून शंकरबाबा मुख्यमंत्री, राज्य व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, सामाजिक न्याय विभागाच्या झाडून सर्व प्रशासकीय अधिकार्यांना भेटले. त्यांना या प्रश्नाची भीषणता समजावून सांगितली. नक्की काहीतरी करू, या बिनबुडाच्या उत्तराने शंकरबाबांची बोळवण केली गेली. बेवारस, गतिमंदासाठी कायमस्वरूपी पुनर्वसन कायदा केला पाहिजे, ही त्यांची मागणी आहे.
शंकरबाबा सांगतात, ‘देशातील सर्वच सुधारगृहांमधून दरवर्षी १८ वर्षांवरील तब्बल एक लाख मुले-मुली बाहेर पडतात.’ महाराष्ट्रात दहा सुधारगृहे आहेत. दोन सरकारी व आठ सामाजिक संस्थांकडून चालविली जातात. यातून दरवर्षी सात ते आठ हजार मुले- मुली बाहेर काढली जातात. तरुण मुली कुठे जात असतील? त्यांचा ठावठिकाणा काय? वझ्झरच्या बालसुधारगृहातून आजवर एकही १८ वर्षांवरील मुलगी बाहेर काढण्यात आलेली नाही. त्याचे कारण सांगताना, ते म्हणतात, ‘आम्ही सरकारी अनुदान घेत नाही. त्यामुळे तरुण मुलींना बाहेर काढण्याचा हा सरकारी नियम लागू होत नाही. इतर संस्था अनुदान घेतात, त्यामुळे तिथे माया, लळा व लोभ नाही. तिथे फक्त कायदा व नियम आहेत.’
शंकरबाबांनी त्यांच्या सुधारगृहातील सर्वच मुलामुलींना स्वत:चे नाव वडील म्हणून दिले. १२३ मुले-मुली शंकर पापळकर हे नाव लावून राहतात. त्या सर्वांचे आधारकार्ड, रहिवासी दाखले काढण्यात आले. ज्या बेवारसांची लग्न पापळकरांनी लावून दिली, त्यातील १७ जोडपी वझ्झरलाच राहतात. त्यांच्यातील १४ मुलींना सुदृढ अपत्यप्राप्तीही झाली. या सर्वांचे संगोपन शंकरबाबांच्या देखरेखीत सुरू आहे. समाजातील दानशूर मंडळी सुधारगृहाला देगणी देतात, त्यातून गाडा चालतो.
मला एक प्रसंग आठवला. बावीस – तेवीस वर्षांंपूर्वी शिर्डीच्या साईमंदिराबाहेर सापडलेली बेवारस मुलगी आता मोठी झाली. तिचे नाव मंगल ! रावेर येथील मूकबधिर योगेशसोबत जळगावला विवाहबद्ध झाली.. ते म्हणाले, हे मंगलचे म्हणजे, आपल्या परिवारातील विसावे लग्न पार पडले की लग्नाचे सोहळे थांबविण्याचे ठरवितो आहे. जड अंत:करणाने ते सांगत होते, १८ वर्षांवरील मुलींना बाहेर न काढता त्यांचे सुधारगृहातच संगोपन करण्यासाठी सरकार कधी काढेल जीआर? सांगून सांगून थकलो आता. कुणीच ऐकत नाही. माझं वयही झाले. मुलींचे चेहरे पाहिले,की कासावीस होतो.
पण, गेल्यावर्षीही एका मुलीचे लग्न लावले. कारण एकच, बाप हा बापच असतो.!!
असाच एक प्रसंग, आनंद आणि दुखा:च्या दोलकावरचा. कर्तव्याची बांधिलकी सांगणारा. शंकरबाबांच्या बाली नावाच्या गतिमंद कन्येचे साक्षगंध सुरू होते. तेवढ्यात एकाने सांगितले, बाबांच्या पत्नी पंचफुलाबाईंचे निधन झाले. हे बाबांना कसे सांगावे, हा पेच साऱ्यांना पडला. बाबा अत्यंत शांतपणे सरबराई, पाहुण्यांचे स्वागत, व्यवस्था लावण्यात मश्गूल. त्यांना ही दुःखद घटना कोणीच सांगितली नाही.पण तेथील वातावरण यामुळे तसे सुन्न होते. साक्षगंध झाले. त्यांनतर बाबा एकाला म्हणाले, ” गड्या चल.. गावाला सोडून दे! एक काम करायचे आहे.’ त्या व्यक्तीने हिंमत केली आणि दुःखद घटना सांगितली..
त्यावर शंकरबाबा म्हणाले,” अरे, ती गेल्याचे सकाळीच समजले होते. पण बालीचे साक्षगंध महत्वाचे होते. तिला आयुष्याचा जोडीदार मिळवून द्यायचा होता..”
याला जोडून आणखी एक गोष्ट आहे :
शंकरबाबांचे मूळगाव परतवाडा. टॅक्स भरू न शकल्याने त्यांच्या घरावर जप्ती आली. १९७५ मध्ये त्यांनी परतवाडा सोडले. अमरावतीच्या अंबापेठमध्ये भाड्याच्या खोलीत राहिले. ते आजही तीच स्थिती आहे. त्यांचा एकही नातेवाईक त्यांच्या सोबत संस्थेत नाही. संपूर्ण जबाबदारी दिव्यांग सांभाळतात. त्यांच्या जेवणाची सोय हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रमुख प्रभाकरराव वैद्य करतात.तर, कपडेलत्ते शेगावचे श्री गजानन महाराज संस्थांन. सामाजिक जाणिवांची ही एक ‘अजिबोगरीब’ चित्तरकथा आहे.
वझ्झरला सुधारगृहाच्या २४ एकरात या दिव्यांग मुलांनी १५ हजार झाडे लावली. ती डेरेदार फुलली. आता ते बाबा झाले आहेत. त्यांचे शिक्षण अवघे दहावीपर्यंत पण कर्तृत्ववाने डी.लीट बहाल केली.
शिक्षण म्हणजे नक्की काय? तर माणूस घडविणे. समाजाला माणूसपण देणे..
पद्मश्री घोषित होताच रात्री बोललो. म्हणाले, जोवर मुलांचा प्रश्न निकाली निघत नाही, तोवर कोणताही सन्मान घेणार नव्हतो. पण गाडगेबाबांच्या नावाने सन्मान होता म्हणून डी;लिट स्वीकारली. गाडगेबाबा जगण्याचा श्वास आहेत , मी त्यांच्या नावे असलेली डी; लीट नाकारू कशी ?
अगदी, त्याच भावनेतून आता पद्मश्री स्वीकारतो. आता सरकार दिव्यांगांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघत आहे. मला शब्द दिलाय. पद्मश्री मी दिव्यांग लेकरांना समर्पित करतो.. आणि, ज्यांनी देवाचे पान मला जेवायला दिले त्या गुरुजींना…
गडगडाटी हास्य अनुभवत त्यांनी एक शेर म्हटला. अर्थात, नेहमीच संभाषणाचा शेवट असाच असतो.
शंकरबाबा म्हणाले –
” हातों के लकिरों के,
फरेंबो मत आना,
जोतिष कें दुकानों में,
किस्मत नही बिकती..”
• रघुनाथ पांडे
9818213515