पाणमांजरचे खुलले भाग्य
पाणमांजरचे खुलले भाग्य
अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा मुहूर्तावर महाराष्ट्रातील ताडोबा – अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्पात प्रत्येकी 10 गिधाडांना (जटायू) सोडण्यात आले. गिधाड या पक्ष्यांचे पुनर्प्रस्थापन व्हावे म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या महत्वपूर्ण पुढाकाराने ताडोबा -अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्पात जटायु संवर्धन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पेंच भागात दुर्मिळ युरेशियन पानमांजर(ऑटर) आढळल्याने या ठिकाणी पाणमांजर संवर्धन व प्रजननाचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे पुढे आले आहे.
आययुसीएन च्या धोकादायक स्थितीत पाणमांजर या प्राण्याची नोंद झाली असून आंतरराष्ट्रीय तस्करीमुळे हा प्राणी देशातील बहुतांश किनाऱ्यावरून हद्दपार झाला आहे. त्याच्या मूळ अधिवासात उपलब्ध खाद्याचा अभाव, निवाऱ्यात सुरक्षेचा अभाव, अनियंत्रित वाळू उपसा, औद्योगिक जलप्रदूषण यामुळे नैसर्गिक निवारे कमी होणे व तस्करी या कारणामुळे याची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत या प्राण्याच्या कातडीला प्रचंड मागणी असून याच्या कातडीपासून कोट, पर्स, शोभिवंत वस्तू व कपडे साठी मुलायम कातडीची जास्त मागणी असल्याने हा प्राणी जलीय प्रदेशातून हद्दपार होत आहे.
गिधाड पक्ष्याच्या संवर्धन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पाणमांजर संवर्धन व प्रजनन करण्याचा विचार पुढे आला आहे. उत्तर भारतातील बहुतांश वन व पाणथळ प्रदेशातून हा प्राणी दृष्टीच्या पलीकडे गेला आहे. व्याघ्र दर्शनसह आकाशातील चंद्र ताऱ्यांची सफर, त्यांनतर गिधाड संवर्धन व आता पाणमांजर संवर्धन कार्यक्रममुळे पेंच व्याघ्र प्रकल्प पुन्हा एका चांगल्या कार्याने चर्चेत आले आहे.