गोड गळ्याचा :- दयाळ (oriental magpie-robin)
गोड गळ्याचा :- दयाळ
दयाळ पक्षी बुलबुलएवढा असतो. लहान आकाराच्या या पक्ष्याचे पंख काळे असतात आणि त्यावर मोठा उभा पांढरा पट्टा असतो. नराचे डोके, मान व पाठ काळी व पूर्ण पोट पांढरे असते. शेपूट लांब आणि मधली पिसे काळी व बाकीची पांढरी असतात. खाताना तसेच स्थिर बसल्यावर दयाळ शेपूट सतत वर-खाली हलवत असतो. नराच्या शरीरावरील काळे भाग मादीमध्ये तपकिरी रंगाचे असतात. मनुष्यवसतीच्या आसपास किंवा विरळ वनात तो एकेकटा किंवा जोडीने आढळतो. हा पक्षी घोड्यासारखी शेपटी उडवतो, म्हणून याचे नाव अश्वक नावाने तर अंगावर दह्या सारखे ठिपके असल्याने दाधिक किंवा दध्यंक म्हणून ओळखतात.
कीटक हे दयाळ पक्ष्याचे प्रमुख अन्न आहे. पांगारा, काटे-सावर यांच्या फुलातील मकरंद, रसाळ फळे, लहान सरडे व मासे अधूनमधून तो खातो. मार्च ते जुलै हा या पक्ष्याचा प्रजननकाळ असतो. विणीच्या हंगामात दयाळ भांडखोर बनतो. शेपटी पाठीवर उंचावणे, छाती फुगवणे, चोच आकाशाकडे करणे आणि मादीसमोर डोलणे अशा रीतीने तो मादीस आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. प्रतिस्पर्धी नराला हाकलून देण्यासाठी तो इतर नराच्या अंगावर धावून जातो. अंडी घालण्याआधी एक आठवडा मादी घरटे तयार ठेवते. एका वेळी ती ३–५ अंडी घालते. अंडी निळसर हिरव्या रंगाची असून त्यावर तांबूस ठिपके असतात. अंडी उबविण्याचे काम मादी करते. अंडी उबविण्यासाठी ८–१५ दिवस लागतात. पिलांचे संगोपन नर-मादी दोघेही करतात. दयाळ पक्ष्याचा आयु:काल सरासरी १० वर्षे असतो.
का करतात पिंजऱ्यात कैद ?
सुरेख गाणारा पक्षी म्हणून दयाळची ओळख आहे. एखादी सुरेख शीळ वाजवल्याप्रमाणे तो आवाज काढतो. तसेच शिळींमध्ये विविधता असते. मधुर आणि लांबलचक शीळ घातल्यासारखे याचे गाणे असते. झुडपामधून वावरताना तो ‘स्वीई स्वीई’ असा आवाज अधूनमधून काढतो. विणीच्या हंगामात त्याचा आवाज अधिक मंजूळ होतो. दिवसभर त्याचे गुंजन चालू असते. इतर पक्ष्यांचेही आवाज तो काढतो. त्याच्या ह्या गोड गाण्यामुळे त्याला आपण पिंजऱ्यात कैद करतो.