निसर्गपुरुष श्रीराम
निसर्गपुरुष श्रीराम
उत्तरप्रदेशातील शरयू नदीच्या काठावर वसलेल्या अयोध्यानगरीचे राजपुत्र रामलल्ला ते भगवान श्रीराम हा प्रवास सहज साध्य नाही. भारतातील विविध राज्य, त्यातील घनदाट अरण्य, वनप्रवास, वनातील उपलब्ध साधन सामग्रीद्वारा 14 वर्ष उदरनिर्वाह यासह फुले, लता, वेली, वनस्पती, पक्षी, प्राणी यांचा गाढा अभ्यास. राजकुमार रामच्या अभ्यासातून प्रवास होऊन पुढे ते श्रीराम घडले. पौराणिक संदर्भानुसार त्या काळात जीवसृष्टीचे अनन्यसाधारण महत्व होते, म्हणूनच ऋषीमुनी हे कठोर साधनेसाठी निसर्गात आश्रमाची निर्मिती करत. चित्रकूट, नैमिषारण्य, दंडकारण्य, पंचवटी हे त्याचे काही दाखले. अयोध्या ते श्रीलंका हा प्रवास करतांना साधारण २०० पेक्षा अधिक ठिकाणावर राम, लक्ष्मण व माता सीतेचा पदस्पर्श झाला. यामध्ये तमसा नदी, श्रुंगवेरपूर (शिंगरोर), कुरई, प्रयागराज ,चित्रकुट, दंडकारण्य. शहडोल ( अमरकंटक),भद्राचलम, पंचवटी, सर्वतीर्थ ,कोडीकरई, रामेश्वरम, धनुष्यकोडी, नुवारा एलिया पर्वतरांगा आदी विविध ठिकाणाचा समावेश आहे.अयोध्या नरेश राजा दशरथाने पुत्र रामाला वनवासाचा आदेश दिल्यानंतर श्रीराम हे पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण बरोबर मार्गस्थ झाले. दिवसा वनप्रवास व रात्री वृक्षाखाली पडाव असे प्रवास करत तिघे भारद्वाज आश्रमात येऊन पोचले. भारद्वाज मुनींनी त्यांचे यथोचित स्वागत करत त्यांना वास्तव्यासाठी चित्रकूट पर्वत योग्य असल्याचे सांगितले. ऋषींच्या मार्गदर्शनुसार चित्रकूट पर्वतावर पोहोचल्यावर एक सुंदर स्थान पाहून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले,
या इथें, लक्ष्मणा, बांध कुटी | या मंदाकिनिच्या तटनिकटीं ||
चित्रकूट हा, हेंच तपोवन | येथ नांदती साधक, मुनिजन ||
सखे जानकी, करि अवलोकन | ही निसर्गशोभा भुलवि दिठी ||
पलाश फुलले, बिल्व वांकले | भल्लातक फलभारें लवले ||
दिसति न यांना मानव शिवले | ना सैल लतांची कुठें मिठी ||
किती फुलांचे रंग गणावे ? कुणा सुगंधा काय म्हणावें ?
मूक रम्यता सहज दुणावें | येतांच कूजनें कर्णपुटीं ||
कुठें काढिती कोकिल सुस्वर | निळा सूर तो चढवि मयूर ||
रत्नेंक तोलित निज पंखांवर | संमिश्र नाद तो उंच वटीं ||
शाखा-शाखांवरी मोहळे | मध त्यांच्यांतिल खालीं निथळे ||
वन संजीवक अमृत सगळें | ठेविती मक्षिका भरुन घटीं ||
हां सौमित्रे, सुसज्ज, सावध, | दिसली, लपली क्षणांत पारध ||
सिद्ध असूं दे सदैव आयुध | या वनीं श्वापदां नाहिं तुटी ||
जानकिसाठीं लतिका, कलिका | तुझिया माझ्या भक्ष्य सायकां, || उभय लाभले वनांत एका | पोंचलों येथ ती शुभचि घटी ||
जमव सत्वरी काष्ठें कणखर | उटज या स्थळीं उभवूं सुंदर ||
शाखापल्लव अंथरुनी वर | रेखुं या चित्र ये गगनपटीं ||
ग.दि.माडगुळकर यांनी अगदी मोजक्या शब्दात श्रीरामांचे निसर्ग प्रेम व्यक्त केले. भाऊ लक्ष्मण व भार्या सीता यांना निसर्गातील अलौकिक सौन्दर्यांचे वर्णन करत इथे कुटी(झोपडी) का बांधायची याचे महत्व विशद केले आहे. इथे ऋषी मुनींच्या तपोवना सोबत विविध वृक्षवेली, पक्षी, फळ, फुलं, सुगंध, शांतता, मधाचे पोळ जणू अमृतच असे प्रसन्नचित्ताने व मुक्तकंठाने निसर्गाचे वर्णन केले. वरील शब्दातून श्रीरामांचे निसर्गावरील प्रेम व आपल्या कुटुंबाच्या प्रसन्नतेसाठी निसर्ग कसा सहकार्य करेल याचे शब्दवर्णन इथे बघायला मिळते.पुढे अगस्ती मुनींच्या आश्रमात श्रीरामांचे वास्तव्य होते. गोदावरी नदीतीरावरील पंचवटी (नाशिक) हे स्थान तेंव्हा दंडक वनात येत असे. आजही या ठिकाणी सीता गुहेजवळ पिंपळ, वड, आवळा, बेल आणि अशोक असे पाच प्राचीन वृक्ष म्हणजेच पंचवटी रचना आहे. जटायू आणि श्रीराम यांची मैत्रीदेखील याच ठिकाणी झाली होती. वाल्मीकि रामायण अरण्यकांडात पंचवटीचे नयनमनोहर वर्णन केलेले आहे. जटायू युद्धाचे स्थान नाशिकपासून ५६ किलोमीटर दूर ताकेड गावात आजही विद्यमान आहे. हे स्थान ‘सर्वतीर्थ’ म्हणून प्रसिद्ध आहे. जगातील जटायू पक्ष्यांचे हे एकमेव मंदिर असावे.
श्रीरामांचे वनवासाच्या निमित्याने वानर सुग्रीव, हनुमानजी, पक्षी जटायू यांचेशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले. ‘जय श्रीराम’ म्हटल्यावर आजही आठवण होते ते भक्त हनुमानाची. आपल्या देशात श्रीराम मंदिरापेक्षा जास्त मंदिर हनुमानाची बघायला मिळतात. श्रीरामांना निसर्गातील विविध प्राणी, पक्ष्यांची साथ नसती तर खरच श्रीलंकावर सहजासहजी विजय प्राप्त करता आला नसता. मर्यादा पुरुषोत्तम,कौसल नरेश, सूर्यवंशी राजा या नावासह श्रीरामांना निसर्गपुरुष म्हटल्यास वावगे ठरणार नाही.