निसर्ग दर्पण अंक 46
निसर्ग दर्पण अंक 46
5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा सप्ताह सर्वत्र पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. कारण 5 नोव्हेंबर ला जेष्ठ पक्षी तज्ज्ञ अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचा जन्मदिन, तर 12 नोव्हेंबर रोजी बर्डमॅन डॉ. सलीम अली साहेब यांचा जन्मदिवस. पक्षी अभ्यासात या दोन्ही थोर पुरुषांचे योगदान महत्वाचे असल्याने त्यांच्या सन्मानार्थ म्हणून हा सप्ताह साजरा केला जातो. या पक्षी सप्ताहच्या औचित्याने आपल्याला पक्ष्यांची नवलाई कळावी म्हणून हा विशेषांक.
सध्या जगात 10,400 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती अस्तित्वात आहे. यातील 1358 पेक्षा जास्त प्रजाती भारतात आढळतात. जगातील सर्वात लहान पक्षी हमिंगबर्ड आहे. जो 6.3 सेमी (2.5 इंच) लांब आहे आणि त्याचे वजन 3 ग्रॅम पेक्षा कमी आहे. शहामृग हा सर्वात मोठा जिवंत पक्षी आहे आणि तो 2.75 मीटर (9 फूट) उंच आणि 150 किलो वजनाचा असू शकतो. विशेष म्हणजे पक्षी हे मानवाच्या पाच पट अधिक स्पष्ट बघू शकतात.
अरण्यऋषी मारूती चितमपल्ली.
(जन्म:- 5 नोव्हेंबर 1932) प
र्यावरण संवर्धनासाठी आपल्या आयुष्यातील तब्बल ६६ वर्ष जंगलभ्रमंती, ५ लाख किमी पेक्षा अधिक प्रवास, 13 भाषांचे ज्ञान, 25 पुस्तके आणि 4 कोशांचे लेखन करणारी व्यक्ती म्हणजे अरण्यऋषी मारूती चितमपल्ली.
नोकरीनिमित्त 36 वर्षे जंगलात कार्यरत मारुती चितमपल्ली यांनी पक्षिकोश, प्राणिकोश, मत्स्यकोशाचे काम पूर्ण केले. नुकतेच त्यांनी वृक्षकोशाचे काम पूर्ण केले आहे. वन खात्यात 36 वर्षे करतांना देशभर संशोधकवृत्तीने सुमारे 5 लाख किमीपेक्षा अधिक प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी तब्बल 13 भाषांचे ज्ञान अवगत केले. या भाषांच्या मेहनतीतून त्यांनी आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत अनेकविध माहिती संकलित केली. त्यांची नोंद कायम आपल्या डायरीमध्ये ठेवली. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाची निर्मिती केली. उद्देश एकच हा ज्ञानाचा ठेवा पुढील पिढीला हस्तांतरित करणे आणि ह्या माहितीचा फायदा भावी संशोधकांना व्हावा.
अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्यजीवनाचे महत्व विषद करणारी 25 पुस्तके लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून त्यांनी हे संशोधनपर लेखन कार्य केले आहे. पक्षिकोशाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी प्राणिकोशासाठी 15 वर्षे काम केले. देशातील कानाकोपऱ्यातून जंगलातून माहिती मिळवली. पारधी, गोसावी, वडारी, आदिवासी लोकांकडून प्राण्याविषयी माहिती मिळविली. मत्स्यकोशासाठी 5 वर्षे कोकणात वास्तव्य करून कोळ्यांबरोबर समुद्रात प्रवास करत माशांचे प्रकार जाणून घेतले तर भंडारा जिल्ह्यातील कोळ्यांकडून गोड्या पाण्यातील माशांची माहिती मिळवली. नुकतेच त्यांनी वयाचे 92 वर्ष पूर्ण केले आहे.
——————————————————————
बर्डमॅन डॉ सलीम अली
(जन्म : 12 नोव्हेंबर 1896 मृत्यू : 27 जुलै 1987)
डॉ. सलिम मोइज़ुद्दीन अब्दुल अली यांची प्रसिद्ध भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि निसर्गशास्त्रज्ञ म्हणून ओळख आहे. बर्डमॅन म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे. भारतात प्रथमच पक्ष्यांचे पद्धतशीर सर्वेक्षण करण्याचे श्रेय हे डॉ. सलीम अलींना जाते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भरतपूर पक्षी अभयारण्य (केओलादेव राष्ट्रीय उद्यान) तयार करण्यात महत्वाचे योगदान दिले.
सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कचा नाश रोखण्यासाठी त्यांनी मोठी भूमिका वठविली. त्यांच्या नावावर अनेक पक्षी अभयारण्ये आणि संस्था आहेत. त्यांनी अनेक पक्ष्यांची पुस्तके लिहिली, 1941 मध्ये ‘द बुक ऑफ़ इंडियन बर्ड्स’ या त्यांचे सर्वाधिक प्रसिध्द असलेले पुस्तक आहे. निसर्गातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना भारत सरकार द्वारा 1958 मध्ये पद्मभूषण आणि 1976 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
——————————————————————
पक्ष्यांतील प्रेम कहाणी :-
पक्ष्यांच्या प्रेमाच्या गोष्टी सुध्दा खूप इंटरेस्टिंग आहे. प्रेमाचं प्रतिक म्हणून सारस पक्षी ओळखला जातो. सारस पक्ष्याची एकदा जोडी जमली तर ते आयुष्यभर टिकते. सहसा हे पक्षी जोड्याने वावरतात. एखादे वेळी एखादा जोडीदाराचा वध झाला तर जिवंत राहिलेला सारस पक्षी आपल्या क्षेत्रात आहार – विहार करत नाही. पण एवढा सुंदर पक्षी सध्या संकटग्रस्ताच्या यादीत आलेला आहे. क्रौंच पक्षी सुद्धा एक उत्तम दाखला आहे.
दुसरं उदाहरण आहे चिमणी पक्ष्याचे जे पक्षी अभ्यासक किरण मोरे यांनी सांगितले. एकदा ते कार्यालयात असतांना चिमणा – चिमणी कार्यालयात घरटे तयार करत असतांना फिरत्या पंख्यांला चिमण्याची धडक बसली असता तो जमिनीवर आदळला. चिमणीने त्याला न्याहाळले व त्यादरम्यान चिमण्याने आपला जीव सोडला. तेथून 15 मिनिटांमध्ये चिमणीने नवीन जोडीदार शोधला पुन्हा आपल्या घरटे बनविण्याच्या कार्यात मग्न झाली.
——————————————————————
बुद्धिमान पक्षी :-
बुद्धिमान पक्ष्याचा किस्सा सांगितला जलअभ्यासक सतीश खाडे यांनी. स्क्रब्जय नावाचा पक्षी आहे जो रॉबिन पक्ष्यासारखा दिसतो, मात्र त्याची बुद्धिमत्ता अफाट आहे. हा पक्षी त्याचे खाद्य लपवून ठेवतो आणि तब्बल 200 जागा तो यासाठी लक्षात ठेवतो. स्क्रब्जय पक्ष्यांच्या समूहातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास ते जंगलात मोठ्याने आक्रोश करतात.
हनी गाईड चिमणी सारखा दिसणारा पक्षी. याचे आवडते खाद्य मधमाश्याच्या पोळ्यातील अळी आहे. हे मिळविण्यासाठी तो चक्क अस्वलाशी मैत्री करतो. सहद हि अस्वलाची कमजोरी असल्याने असल्याने तो अस्वलाला सहद कुठे आहे हे दाखविण्यासाठी वाटाड्या म्हणून कार्य करतो. एकदा का अस्वलाने सहदाच्या पोळ्याला झाडले कि आपला स्वार्थ साधतो. तसेच सहद झाडणाऱ्या व्यक्तीला सुध्दा तो गाईड म्हणून काम करतो. या कार्यावरून त्याचे नामकरण करण्यात आले.
——————————————————————
पक्ष्यांचे स्वयंवर :-
मुलं- मुली तरुण झाले कि स्वतः सुदंर दिसावे म्हणून ते प्रयत्न करतात व मुले त्यांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्या मागे पुढे पिंगा घालतात. हे केवळ प्राण्यात होते असे नाही तर निसर्गातील अनेक घटकांत हे बघायला मिळते. पक्षीही याला अपवाद नाही. जुन्या काळातील राजवाड्यातील स्वयंवर प्रमाणे पक्ष्यांमध्ये सुद्धा स्वयंवर मांडले जातात. अगदी मोराला सुंदर पिसारा असला तरी लांडोरचे मन आकर्षित करण्यासाठी तिचे लक्ष त्याला वेधावे लागते. सुगरण पक्ष्यात तर एक घरटे आवडले नाही तर दुसरे घरटे तयार करावे लागतात. पक्ष्यांतील मादी ऐटीत राहते. नराने इंप्रेस करावे असे तिला मनोमन वाटते. कोणी तुर्यामुळे साद घालतो, तर कोणी शिळ घालतो, कोणी घरटे बनवितो, तर कोणी सुंदर नृत्य करतो. हे पक्षी सुद्धा आपल्या सहकार्याला भेटण्यासाठी दाट झाडी किंवा एकांताच्या जागा शोधतात.
नर पेग्विन पक्षी त्याच्या मादीला आकर्षित करण्यासाठी रंगीत खड्यांचा ढीग जमा करते. जो सर्वात जास्त खडे जमा करेल त्याच्याकडे मादी आकर्षित होते. विशेष म्हणजे काही पेग्विन तर चक्क हे खडे चोरतात.-
——————————————————————
चिमण्या स्थिर ….मोर चौपट
पक्षी अभ्यासासाठी ई बर्ड हे महत्त्वाचे एप्स आहे. यात जगभरातील पक्षी अभ्यासक त्यांना विविध ठिकाणी आढळलेल्या पक्ष्यांच्या नोंदी यावर नोंदवतात. याच ई बर्ड नोंदीच्या अभ्यासावरून असे आढळून आले कि, आपल्या परिसरात सर्वत्र आढळणारी चिमण्यांची संख्या स्थिर आहे. मोराची संख्या तिप्पट ते चौपट वाढली आहे. मोराला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा प्राप्त झाल्याने त्याला संरक्षण प्राप्त झाल्याने ही वाढ झाल्याचे पक्षी अभ्यासकांचे मत आहे.
चिमणी पक्ष्यांची संख्या कमी झाली असा केवळ कांगावा करण्यात आला. चिमणी ज्या भागात घरटे करत होती ते घरटे ग्रामीण भागातील बदलत्या घरामुळे दिसेनासी झाली आहे. पूर्वी खेड्यात माती, गवत, बांबू व कौलारूच्या मदतीने घराची निर्मिती व्हायची. त्यामुळे बांबूच्या आडोश्याला, मातीच्या झरोक्यात, कौलारूच्या फटीत चिमणी घरटे करायची. आता मातीच्या घराची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली, स्लॅपमुळे चिमण्यांचा आडोसा गायब झाला. भिंतीवरील फोटो ऐवजी पोस्टर लागले. खिडक्या ऐवजी मच्छरला अटकाव करणारी जाळी आली. मानवाने तिला घरात प्रवेश करायला बंदी केल्याने तिने केवळ तिचा निवारा बदलला. शिवाय मोबाईल टॉवर मुळे तिच्या प्रजननावर प्रभाव पडला हे अद्याप सिद्ध झाले नाही.
——————————————————————….ऐकावे ते नवलच
1) हा किस्सा आहे नागपूर येथील पक्षी अभ्यासकाचा. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या महानुभावाच्या घरी येलो वॅग्टेल हा पक्षी दरवर्षी पाहुणा म्हणून येतो. बरं गत 5 वर्षात दरवर्षी या पक्ष्याची येण्याची वेळ, दिवस हि सारखीच आहे. आहे की नाही नवलाई.
2) कोकिळा प्रजातीतील पक्षी स्वतः घरटे बनवीत नाही. दक्षिण आफ्रिका मधून भारतात याच प्रजातीतील काही पक्षी स्थलांतर करून येतात. येतांना ते येथे अंडी घालून निघून जातात. अंडीतून उडान भरणारे पक्षी पुन्हा आपल्या आई वडिलांशिवाय दक्षिण आफ्रिकाला परत जातात. आहे ना आश्चर्य. पक्ष्यांच्या डी.एन.ए मध्ये असलेल्या नकाशा व चुंबकीय लहरी मुळेते आपले घरटे सहज शोधत असल्याचे किरण मोरे सांगतात.