सर्वसामान्य अनुभवणार जंगलातील रात्र
सर्वसामान्य अनुभवणार जंगलातील रात्र
निसर्गप्रेमींना जंगलाबद्दल खूप क्रेझ असते. अनेकांना वाटते आपण जंगलात भ्रमंती करावी व रात्र झाली तर घनदाट जंगलात मुक्काम करावा,पण बुद्ध पौर्णिमेची प्राणी प्रगणना निमित्याने होणारा मुक्काम वगळता सर्व सामान्य व्यक्तीला जंगलात मुक्काम करायला मिळत नाही. आता मॅजिकल मेळघाटच्या माध्यमातून सर्व सामान्य व्यक्तीचे जंगलात मचाणावर मुक्काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
वनविभाग व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पुढाकाराने चिखलदऱ्याच्या घनदाट जंगलाच्या बफर झोन मध्ये पर्यटकांसाठी 8 मचाण उभारले जाणार आहे. केरळ राज्याच्या ट्री टॉपच्या धर्तीवर राज्यातील पहिला अभिनव प्रयोग मेळघाटात प्रत्यक्षात आकारास येत आहे. पर्यटकांना मचाणच्या माध्यमातून जंगलातील थ्रील अनुभवणे, निवांत क्षणी पक्षी, प्राणी, ओहोळ, झरा, कीटक, वनस्पतीची झुळूक अनुभवाला मिळणार आहे. रात्रीची निरव शांतता आणि सकाळी पक्ष्यांचा मंजुळ स्वर पर्यटकांच्या कानी पडणार आहे. विशेष म्हणजे पर्यटकांच्या सुरक्षितेची पूर्ण काळजी वनविभाग घेणार आहे. घराप्रमाणे एटॅच टॉयलेट बाथरूमची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
विशेष म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ने-आण करण्यासाठी पर्यटकांच्या दिमतीला जिप्सीची सुविधा राहणार असून तुमच्या सोबतीला या जंगला विषयी माहिती देणारा वाटाड्या अर्थात गाईड राहणार आहे. या मुक्काम दरम्यान पर्यटकांना मेळघाटातील अस्सल चुलीवरच्या जेवणाची मेजवानी मिळणार आहे. म्हणजे या पर्यटनाच्या माध्यमातून जिप्सी चालक, गाईड व एक सेवेकरी यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी घरबसल्या मेळघाट वनविभागाच्या मॅजिकल मेळघाट वेबसाईटवर ऑनलाईन सुविधाद्वारा कोठूनही आपले बुकिंग करता येणार आहे.
मचाणवर मुक्काम झाल्यावर तुम्हाला पायदळ रपेट मारायची असल्यास वनविभागाचा कर्मचारी तुम्हाला या भागातील वनौषधी, पक्षी, प्राणी आदींची माहिती देणार आहे. या सोबतच आमझरी व भीमकुंड परिसरात स्काय सायकलिंग, स्विस टेंट, ह्युमन गायरो राईड ,क्लायबिंग वॉल आदी सारखे अनेक साहसी क्रीडा प्रकार अनुभवाला मिळणार आहे.
सुरक्षेला प्राधान्य :
सर्व सामान्य व्यक्तीचे जंगलात मचाणवर मुक्काम करण्याचे स्वप्न मेळघाट वनविभाग पूर्ण करणार असून यासाठी काही स्पॉट निश्चित करण्यात आले. प्रत्येक पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी वनविभाग घेणार असून येत्या 15 ऑगस्ट नंतर हे काम पूर्णत्वास येणार असल्याचे मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी यशवंत बहाळे यांनी सांगितले.