निसर्गातही होतो चुपके चुपके व्हॅलेंटाईन
महाविद्यालयीन जीवनात युवक-युवतींना फेब्रुवारी महिन्यात वेध लागतात ते प्रेम सप्ताहाचे. या सप्ताहात प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग(आलिंगन) डे, कीस डे व शेवटी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. विशेष म्हणजे असे दिवस साजरे करण्यासाठी प्रेमवीर साथ घेतात ते निसर्गाचीच.
निसर्गात सुद्धा असा उत्सव होत असतो. निसर्गातील प्रेमभावना ह्या निरपेक्ष असतात. त्यात मानवा सारखा स्वार्थ नसतो. पक्षी, प्राणी, वेली, वनस्पती यांचा प्रेमाचा अंदाज व काळ थोडा वेगळा असतो. सारस या पक्ष्याने एकदा आपल्या जोडीदाराला प्रपोज केले तर ‘मरते दम तक’ बंधन टिकवतो. धनेश(हॉर्नबिल) तर आपल्या पत्नीच्या डिलिवरी दरम्यान तिला चक्क दीड दोन महिने संपूर्ण ढोलीत बंदिस्त करून रेस्ट देतो. आपल्या जोडीदार व पिल्लांच्या धडपडीत हा पक्षी या कालावधीत बारीक होतो. वाघाची तर तऱ्हाच न्यारी. हा प्राणी आजच्या तरुण पिढी सारखा अगदी बिनधास्त. आपले वर्चस्व व इलाका प्रस्थापित करण्यासाठी अनेक वाघिणीसोबत घरोबा करतो. दहीपळस वनस्पती तर अनेक प्रेमविरांच्या प्रेमाचा साक्षीदार. कारण गुप्त संदेश वहन करण्याचे काम दहीपळसची पाने करतात. अनेक वेली, लता तर संपूर्ण हयात सहजीवन साथ देतात. मान्सून काळात अनेक जण वाट बघतात ते चातक व पावश्या च्या संदेशाची. मान्सूनसूचक या पक्ष्यांच्या आगमनामुळे अनेकांच्या मनात वसुंधरा बद्दल वेगळीच प्रेमभावना निर्माण होते.
पावसाळ्याच्या दिवसाच्या पूर्वार्धात सुगरण पक्ष्यात प्रेयसी ला घरटे आवडले नाही तर प्रियकराला दुसरे सुंदर घरट्याची निर्मिती करावी लागते. यातील नर सुद्धा आजच्या काही युवकांसारखा स्मार्ट असतो. एकाचवेळी तो अनेकींना आपलेसे करण्यासाठी एका पेक्षा अनेक घरट्याची निर्मिती करतो. निसर्गात निरपेक्ष प्रेमाचा दाखला म्हणजे गत जुलै महिन्यात गोंदिया जिल्हातील पांगडी परिसरात स्वर्गीय नर्तकाच्या पिल्लांना चक्क चष्मेवाला पक्ष्याने चोचीत अन्न भरविले होते. शिवाय पिल्लांची विष्ठा सुद्धा साफ केली होती. गाय बगळा यांचे प्रेम तर हमसाया प्रमाणे सर्वश्रुत आहे. ऑक्टोंबर 2024 मध्ये ब्रम्हपुरी मधील एका टी 21 वाघाने आपल्या जोडीदारासाठी चार राज्यांच्या सीमा ओलांडल्या होत्या. निसर्गात सुद्धा अनेक प्रेमाचे किस्से अनुभवाला मिळतात.