उत्सव विशेष

अक्षय तृतीयेची भेंडवळची घटमांडणी

अक्षय तृतीयेची भेंडवळची घटमांडणी

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ गावं कृषी व राजकीय भाकीतासाठी सुपरिचित आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेडवळ गावात होणारी घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. यावर्षी 10 मे ला मांडणी व 11 मे ला भाकीत वर्तविले जाणार आहे.

तीनशे वर्षापूर्वी चंद्रभान महाराजांचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला आहे. घटमांडणीनंतर वर्तवलेली गेलेली पीकपाणी, राजकीय आणि आर्थिक भाकिते बऱ्याचदा खरी ठरली आहेत. शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास आहे. दरवर्षी या मांडणीचे भाकित ऐकण्यासाठी राज्यातील विविध भागातील हजारो शेतकरी व माध्यम प्रतिनिधी येथे उपस्थित असतात. मांडणीचे भाकित घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची, ते ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तविण्यात येतो. आज पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज वगैरेंनी चंद्रभान महाराजांची परंपरा जशीच्या तशी घटमांडणी करून जोपासली आहे.

अक्षय तृतीयाच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भेंडवळबाहेरील नरहरी वाघ यांच्या शेतात सुमारे सात फुट व्यासाचा गोलाकार घट तयार करण्यात येतो. घटाच्या मध्यभागी दोन फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीची चार ढेकळे ठेवण्यात येतात. ही ठेवण्यात आलेली चार ढेकळे पावसाच्या चार महिन्यांचे प्रतीक मानण्यात येतात. त्यावर पाण्याने भरलेला करवा अर्थात मातीचे भांडे ठेवण्यात येते. करव्यावर वडा, भजे, करंजी, पुरी, सांडोळी, कुरडी, पापड, पानविडा, सुपारी आदी मांडतात. गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडई यासह १८ प्रकारच्या धान्याची व खाद्य पदार्थांची प्रतीकात्मक मांडणी करण्यात येते. घटामध्ये ठेवलेली अंबाडी हे दैवत मानले जाते तर मसूर शत्रूचे प्रतीक आणि करडई संरक्षण व्यवस्था, सुपारी राजाचे, पानविडा राजाच्या गादीचे, पुरी पृथ्वीचे, सांडोळी-कुरडई चारा-पाण्याचे आणि करंजी अर्थव्यवस्थेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे यात झालेल्या बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करून वाघ कुटुंबातील सदस्य येत्या वर्षभरातील हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था आणि राजकीय घडामोडींबाबत भाकीत वर्तवितात.

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close