पावसाची पूर्वसूचना देणारं ‘घुंगरू का पेड’
सुवर्ण वृक्षाच्या फुलांना दक्षिण भारतात 'राज्यफुल' चा दर्जा

पावसाची पूर्वसूचना देणारं ‘घुंगरू का पेड’
सुवर्ण वृक्षाच्या फुलांना दक्षिण भारतात ‘राज्यफुल’ चा दर्जा
सध्या विदर्भात सूर्य आग ओकत आहे. एवढ्या तप्त वातावरणात देखील रस्त्याच्या कडेला झाडावर लटकलेले पिवळे झुंबर आपल्याला आकर्षित करतात. पिवळ्या फुलांमध्ये लटकलेल्या लांबलचक चॉकलेटी शेंग कर्णकुंडल सारखे भासतात. हे पिवळे गर्द फुल असलेलं वृक्ष म्हणवे ‘बहावा’ चे. या वनस्पतीला कर्णिकार, संस्कृत मध्ये आरग्वध, तसेच हिंदीमध्ये ‘अमलतास’ तसेच राजवृक्ष व सुवर्णवृक्ष या नावाने सर्वत्र ओळखल्या जाते. पिवळ्या धम्म फुलांमुळे याला इंग्रजी मध्ये ‘गोल्डन शॉवर ट्री’ म्हणून ओळखतात तर मेळघाटात याला घुंगरू का पेड म्हणून ओळखल्या जाते. कानात घालणारे अलंकार सुद्धा झुपकेदार असल्याने याला प्राचीन काळी ‘कर्णिकार’ नावाने ओळखल्या जात. निसर्गात हे फुल उगविल्यानंतर साठाव्या दिवसापर्यंत पावसाळा सुरुवात होतो अशी जुन्या जाणत्या लोकांची मान्यता आहे.
बहावा वृक्षाची उंची साधारणपणे ४० फुटांपर्यंत वाढते. या झाडाला फुलांचे घोस पिवळ्या रंगाचे झुंबर झुंबर लावल्याचा भास होतो. फुलांच्या गुच्छांत कळ्या आणि फुले असे दोन्ही पाहायला मिळतात. उन्हाळ्यात याचे सौंदर्य बघण्यासारखे असते. फुलांना मंद पण हवाहवासा सुगंध असल्याने शिवाय फुलांमध्ये मुबलक पुष्परस असल्याने विविध भुंगे व किटक याभोवती पिंगा घालतात. दिवसा हा सुगंध जाणवत नसला तरी रात्री तो अधिक जाणवतो. कीटकांमुळे पक्ष्यांचे सुद्धा हे आवडीचे झाड आहे. त्यामुळे हे झाड अन्नसाखळीत महत्वाची भूमिका पार पाडते.या फुलांच्या पाकळ्या वाळवून पिवळा रंग मिळतो. मेळघाटातील आदिवासी बांधव या फुलांची भाजी बनवतात. याची चव स्वादिष्ट असल्याचे सलोणा येथील रहिवासी अनिल झामरकर यांनी सांगितले.
औषधीय उपयोग :
याचे मुळ पौष्टीक आहे. कोवळ्या पानांचा रस चर्मरोगांवर, बियांचे चूर्ण मधुमेहावर, साल घशातील गाठीसाठी उपयुक्त आहे. व्रणशोथ, वातरक्त व आमवातामध्ये शोधावर गराचा लेप देतात. गर जास्त प्रमाणांत पोटातून घेतल्यास हगवण व पोटांत मुरडा येतो. व्रण भरण्यास, संधीवात, पित्तप्रकोप, हृदयरोग, उदरशूळ, गर्भपातन, संधीवात, कावीळ, पक्षघात यामध्ये पाने, फुले, फळे, बिया मूळ उपयुक्त आहे. बध्दकोष्ठतेवर सुद्धा उपयुक्त असून याचे सेवन करण्यापूर्वी वैद्याच्या सल्यानुसार याची मात्रा घ्यावी. पोट बिघडलं कि कोल्हे ,अस्वल, भेकर आणि साळींदर शेंगातील मगज खातात. माकडांना सुध्दा शेंगेतील गर खूप आवडतो.
बियांना कप्प्यांचे कडक संरक्षण :
बहावा वृक्षाचे बीज शेंगेत राहते. सुरुवातीला शेवग्याच्या शेंगासारखी हिरवीगार असलेली ही शेंग उन्हाळयात आणखी टणक व रंग बदलते. हिरवी शेंगेचे लाल करड्या रंगात रूपांतर होऊन काळी पडायला लागते. शेंग पूर्ण वाळल्यानंतर ही शेंग फोडून बघितल्यास या शेंगेच्या आतल्या भागात कपाटप्रमाणे पस्तीस ते पंचेचाळीसच्या घरात कप्पे आढळतात. या शेंगामध्ये बिया असतात. त्यांचा आकार बदामासारखा असून बिया चकचकीत असतात. यात बिया सुरक्षित गरात घट्ट बसलेले बघायला मिळते. प्राणी जेंव्हा हा गर खाण्यासाठी शेंग तोडतात तेंव्हा त्यांच्या विष्ठेतून सुध्दा हा बहाव्याचे बिजांचे निसर्गात रोपण होते.
ईतर उपयोग :-
बहाव्याचे लाकूड चांगले असल्याने इमारत, बैलगाड्या, होड्या, शेतीची अवजारे, शोभेच्या वस्तू ,मूर्ती बनविण्यासाठी वापर होतो. बहाव्याची साल कातडे कमावण्याच्या उपयोगी आहे. बहाव्याच्या शेंगेमध्ये पिवळसर चिकट डिंक असतो. तो गोड असल्याने माकडांना फार आवडतो म्हणूनच कदाचित त्या शेंगांना ‘बंदरलाठी’ असे म्हणतात.
पावसाचा पूर्वसुचकांक :
याला नेचर इंडिकेटर म्हणून सुद्धा ओळखल्या जाते कारण बहावा फुलल्या नंतर 60 दिवसात नैसर्गिक पाऊस पडतो असे मानले जाते. केरळ राज्यात या फुलाला राज्यफुलाचा दर्जा असून भारत सरकारच्या टपाल खात्याने बहाव्याच्या फुलांचे पोस्टाचे तिकीट काढले आहे. दक्षिण भारतात बहाव्याच्या फुलांना सोन्याचे म्हणजेच वैभवाचे प्रतीक मानतात. त्याला ‘कणिपू’ असे म्हणतात. ‘विशूच्या’ सणाला बहाव्याच्या फुलांना विशेष मान असतो. ही फुले बघितल्याचे घरात सुख समृध्दी रास करते अशी यामागील धारणा आहे.
Informative!