
राजधानीत 260 बाप-लेकांच्या गुरुजींची चर्चा
जांजावंडीच्या बेडके सरांना राष्ट्रीय सन्मान
देशाची राजधानी दिल्ली येथे 5 सप्टेंबर रोजी महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडत असतांना दिल्ली पासून गल्ली पर्यंत चर्चा होती ती मांत्यया बेडके गुरुजींची. कारण या शिक्षकाने केवळ विद्यार्थीच घडविले नाही तर त्यांच्या माय-बापांना सुद्धा विद्यार्जनाचे धडे गिरविले. गडचिरोली पासून 210 किलोमीटर अंतरावर असलेल्या नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यातील जांजावंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर मंत्यया चिंनी बेडके कार्यरत आहे. त्यांच्या शैक्षणिक तथा सामाजिक कार्याची दखल थेट दिल्लीत घेतल्या गेली. या शैक्षणिक योगदानामुळे त्यांना 2023 -2 4चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मांत्यया बेडके यांचे शिक्षण बी.एस.सी., डी.एड., बी.एड., डी.ए.एस, एम.ए. झाले आहे. एटापल्ली तालुक्यापासून 45 किलोमीटर अंतरावर 600 लोकवस्ती असलेले जांजावंडी हे गाव आहे. या भागात नक्षलवादी असल्याने छोटे काश्मीर म्हणून या भागाची वेगळी ओळख आहे. सन 2010 मध्ये येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मांत्यया चिंनी बेडके यांची नियुक्ती झाली. यावेळी पहिली ते चौथीच्या पटावर एकूण 7 विद्यार्थी पैकी 3 विद्यार्थी कायम जंगलात रमायचे. सद्यस्थितीत या शाळेत 140 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेचे वैशिष्टे म्हणजे या शाळेत विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकांनी सुद्धा अ आ इ चे धडे गिरवले. लहान काश्मिरात मांत्यया बेडके यांनी नंदनवन फुलविण्याचे कार्य केले आहे.
प्रौढ साक्षरता वर्गाचे आयोजन :
केवळ गावातील विद्यार्थी शिकून गावचा विकास होणार नाही. या गावात बहुतांश माडिया समाज असल्याने आई वडिलांचे शिक्षण सुद्धा तितकेच महत्त्वाचे असल्याने गावातील दोन युवकांच्या सहकाऱ्याने प्रौढ शिक्षण सुरु केले. स्वतः माडिया भाषा अवगत करून पालकांना त्यांच्या भाषेत संवाद साधून विश्वास संपादन केला. गावातील 120 पालकांना अंगठ्या वरून सही करायला लावण्याची किमया त्यांनी साध्य केली आहे. याकरिता वारंवार पालकांचे प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना घेतले दत्तक :-
गावातील विद्यार्थ्यांसाठी शिवार फेरी तसेच महिलांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन करणे. चावडी वाचन उपक्रम, नवोपक्रम मध्ये सहभाग घेतला. परिसरातील 31 अनाथ (कोणाला आई नाही तर कोणाला वडील नाही) व शाळाबाह्य मुलांना मुलांना एकत्रित करत त्यांची शालेय परिसरात निवास व भोजनाची व्यवस्था केली. आता हे सर्व 31 विद्यार्थी नियमित विद्यार्थी म्हणून शाळेत शिक्षण घेत आहे. 31 अनाथ मुलांचे पालक म्हणून त्यांनी आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.
विविध उपक्रमाचे आयोजन :-
शालेय अभ्यासक्रम सोबत वनभोजन, क्षेत्रभेट, क्रीडा स्पर्धेत सहभाग, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, सहलीचे आयोजन आदी उपक्रम त्यांनी राबविले. शाळा सुंदर करण्यावर त्यांनी भर देत एका उजाड शाळेचे रुपांतर रमणीय शाळेत केले आहे. शाळेतील भिंती बोलक्या करत विद्यार्थ्यांना मराठी भाषेसह इंग्रजी भाषेचे हजारो शब्द त्यांनी शब्द-चित्राच्या माध्यमातून दर्शनी भागात लावले आहे. कोरोना कालावधीत मुलांच्या शिक्षणासाठी यु ट्यूब वर वर्ग घेत स्वतःच्या शाळेसह ईतर शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासले.

डिजिटल शाळा : –
मांत्यया बेडके हे केंद्रस्तर ते जिल्हास्तरीय प्रशिक्षणात सहभाग घेत शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात. अति दुर्गम भागात शाळा असून सुद्धा त्यानी जांजावंडीच्या शाळेला डिजिटल शाळेत रुपांतर केले आहे. गावात नेटवर्क कमजोर असल्याने शाळेतील उंच झाडावर जुगाड पद्धतीतून एंटेना बसवत शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध केली आहे.
मुलाखतीची धडपड :-
जांजावंडी गावात जायला कुठलाही बारमाही पक्का रस्ता नाही. पावसाळ्याच्या दिवसात जंगलातील पायवाटेवर दुचाकी चालविणे म्हणजे सर्कसीचा प्रवास. ज्या दिवशी राष्ट्रीय आदर्श पुरस्काराची सभा होती त्या दिवशी गावात नेटवर्क नसल्याने जांजावंडी ते सुरजागड असा 18 किलोमीटरचा प्रवास मुसळधार पावसात करावा लागला. अनेक अडचणी होत्या. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे विजेची बत्ती गुल, नेटवर्क सुद्धा आंधळी कोशिंबीरचा खेळ करत असतांना कशीबशी मोबाईलवर मुलाखत दिली. त्यांनतर पुन्हा पुणे येथे प्रवास करावा लागला. आता दिल्ली येथून प्रवास करत दिनांक 7 रोजी आपल्या स्वगृही परतत आहे. मांत्यया गुरुजींच्या शैक्षणिक कार्यामुळे महाराष्ट्रातील दुर्गम जांजावंडी ते राजधानी दिल्ली हा प्रवास अनेक शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.