मोहफुलाची जागली

मोहफुलाची जागली
तुम्ही आम्ही गहू, हरभरा व ईतर पिकांसाठी शेतात जागरण केल्याचे अनुभवले आहे, पण मेळघाटात मोहाची फुले वेचण्यासाठी स्थानिक रहिवासी चक्क खडा पहारा देतात. सध्या मोहाच्या झाडांखाली मोहफुते पडायला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतातील झाडांखाली रात्रीबेरात्री तर काही उत्तररात्री तीन वाजल्यानंतर कुटुंबीयांसह शेकोट्या पेटवून बसत आहेत. एका शेतात तीन-चार मोहफुलाची झाडे आहेत. प्रत्येक झाडाखाली शेकोटी पेटविली जाते. असे न केल्यास मोहफुले चोरीला जाऊ शकतात किंवा जंगलात फिरणारे वन्यजीव जवळ येऊन हल्ले करू शकतात. रात्री तीन वाजतानंतर मोहफुले पहायला जरी सुरवात होत असली तरी वेचणीचे काम सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत चालते. हे काम करण्यासाठी पालकांसोबत त्यांची मुले व घरातील वृद्ध व्यक्ती सोबत असतात. ह्या मोहफुल वेचनीचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीवर होतो. साधारण एका झाडापासून दररोज 10 ते 20 किलोपर्यंत मोहफुले मिळतात. ही फुले तीन दिवस वाळल्यानंतर कमी होतात. तसेच एका झाडापासून एका सीझनमध्ये 100 ते 150 किलो उत्पादन होते. मेळघाटातील घराघरात अंगणात सध्या मोह्फुले वाळवताना बघायला मिळते. मोह्फुलापासून दारूनिर्मिती होत असल्याने अनेकांना चार पैश्यांची आवक होते. मात्र येत्या काही वर्षात या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाल्याने वृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा परिणाम आदिवासींच्या रोजगारावर होत आहे.
बहुउपयोगी मोहफुल
ज्या जनावराची प्रसूती होत नाही त्यास मोहफुले चारत्यास प्रसूती सहजतेने होते, असा स्थानिकांचा अनुभव आहे. पावसाळ्यात मोहफुले भाजून शेंगदाणे व गुळासोबत खाल्ल्यास भूक क्षमते. मोहफुले गव्हाच्या पिठासोबत भाजल्यावर गूळ मिसळून चांगला शिरा बनतो. तो शरीरासाठी उत्तम असते. शिवाय मेळघाटातील प्रसिध्द शिडडू याच मोह्फुलांपासून बनविली जाते. विशेषता होळी व ईतर उत्सव प्रसंगी पुरुषांसह येथील आदिवासी महिला सुद्धा ह्या शिडडूचा आस्वाद घेतात. याशिवाय मोहफुलाचे लाडू, तेल, कपडे धुण्याचे साबण, मेणबत्ती तथा सॅनिटायझर अशा विविध वस्तू तयार करण्यासाठी सुध्दा नव्याने वापर होय असल्याचे समोर येत आहे.