अमेरिका रिटर्न अभियंता रमला सातपुड्याच्या जंगलात
अमेरिका रिटर्न अभियंता रमला सातपुड्याच्या जंगलात
शिक्षण मेकॅनीकल इंजिनीअरिंग त्यांनतर फ्लोरिडा(अमेरिका) येथे जीआयएस चे पदव्युत्तर शिक्षण. वडील स्टेट बँक कर्मचारी, आई शिक्षिका. मनात आणले तर अमेरिकेत शिक्षणानंतर बक्कळ पैशाची नोकरी करता आली असती. पण बालवयात आजी -आजोबाच्या निसर्गाच्या गप्पा गोष्टी व वडिलांच्या नोकरीच्या निमित्याने सातपुड्यातील वास्तव्याने जंगलाने मनात घर केले ते कायमचे. आज हा युवक संबंध सातपुडा पालथा घालत आदिवासीसह जंगलांची सेवा सुश्रुषा करत आहे. मंदार पिंगळे हे त्या निसर्गवेड्या युवकाचे नाव.
अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर २०१३ मध्ये मंदारची सातपुडा फौंडेशन अमरावतीशी नाळ जुडली. या कालावधीत फ्लोरिडा येथे जीआयएस चे पदव्युत्तर शिक्षण घेतले. याचदरम्यान आयुष्यातील मोठा निर्णय घेतला. पैश्या पेक्षा समाधानासाठी काम करायचं. फ्लोरिडामध्ये सुद्धा जंगल भ्रमंती केली, पण भारतातील जंगलाची ओढ सुटत नव्हती. स्वदेशी आल्यावर पुन्हा सातपुडा संस्थेत शिक्षण अधिकारी म्हणून काम सुरु केले. पुढे संरक्षक अधिकारी म्हणून बढती मिळाली पण इथे पदापेक्षा सर्वांसोबत समान पातळीवर कामाला प्राधान्य दिला.
मध्य भारतातील सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाट, कान्हा,पेंच, ताडोबा -अंधारी, नवेगाव-नागझिरा आदी विविध व्याघ्र प्रकल्पाकरिता सातपुडा फौंडेशन संस्था काम करते. जंगलात काम करताना व्यक्तीमधील इगो नाहीसा झाल्याचे मंदार सांगतात. यामुळे स्थानिक भागातील आदिवासी लोकांच्या घरच्या सद्स्याप्रमाणे वागणूक मिळाली. सातपुडा अंतर्गत काम करतांना वन जनजागृती, रोजगार निर्मिती, आरोग्य शिबिरे, आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी कार्यक्रम निर्मिती व अंमलबजावणी, मानव व वन्यजीव संघर्ष, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या आदिवासी लोकांसाठी असलेल्या विविध योजना लोकापर्यंत पोहचविण्याचे काम मंदार पिंगळे हे संस्थे मार्फत करतात. यासोबत वन विभागाच्या विविध कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग नोंदवून आदिवासी तसेच वन संरक्षणासाठी काम करतात. सातपुडा फौंडेशन च्या सहकार्याने पेंच व्याघ्र प्रकल्पात वनवणवा करिता आर्टिफिशल इंटेलिजन्स प्रयोग सध्या केला जात आहे. यामध्ये संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मंदार महत्वाची भूमिका बजावत आहे.