महिमापूर – पायविहीर व स्वच्छतेचा महिमा
महिमापूर – पायविहीर व स्वच्छतेचा महिमा
महिमापूर म्हटले कि डोळ्यासमोर येते ती तेराव्या शतकातील यादवकालीन सातमजली पायविहीर. या पायविहिरीने या गावाला जगाच्या नकाशावर नवीन ओळख दिली आहे. शासनाने हि विहीर राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित केले असून पोस्ट कार्ड तिकीटवर या विहिरीला मानाचे स्थान दिले आहे. १०० फुट खोल , २५० चौरस मीटर लांब त्यात सहा टप्प्यावर ८५ पायऱ्या असल्याने हि केवळ सात मजली विहीर नसून तत्कालीन एक महाल असल्याचा भास निर्माण होतो. हि विहीर स्थापत्य कलेचा उत्तम आदर्श नमुना असल्याने नुकतेच सांस्कृतिक विभागाने हा वारसा जतन व्हावा म्हणून डागडुजीसाठी २ कोटी २३ लाख रुपये मंजूर केले आहे. पूर्वी या विहिरीतून परिसरातील सहा गावांना पाणीपुरवठा केला जायचा. या विहिरीमुळे गावाला वेगळी ओळख मिळाल्याने येथील गावकरी सुद्धा हे वैभव टिकवण्यासाठी तेवढेच प्रयत्न करत आहे.
महिमापूरची लोकसंख्या जेमतेम सव्वा सहाशे आहे. या गावातील भूजल पातळीत वाढ होण्यासाठी येथे अनेक ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग बघायला मिळते. या गावात सुमारे चार हजार पेक्षा अधिक वृक्षाची लागवड केल्याने परिसर हिरवागार दिसतो. इथे स्वातंत्र दिनाच्या औचीत्यावर स्थानिक ग्रामपंचायत द्वारा ग्रामस्थांना रोपटे देण्याची पद्धत आहे. यावर्षी तर ग्राम पंचायत मार्फत स्वच्छतेचे वान वाटप केले जाणार आहे. संपूर्ण गावातील रस्ते सिमेंटचे असून सर्वत्र साफसफाई बघायला मिळते. यासाठी काही ठिकाणी प्लास्टिक कचरा निर्मुलन, कंपोस्ट खत निर्मिती, अमृत सरोवर, सोक पिटची व्यवस्था केली आहे. पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी प्रत्येक घरासमोर नळ व्यवस्था असून पाण्याचे मीटर बसविले आहे. प्रत्येक घरी कचरा पेटी असून त्यात ओला व सुखा कचरा साठविण्याची व्यवस्था आहे. या गावात दर दिवशी ७०० ते ८०० पर्यटक येत असल्याने यावर्षी या गावाने केंद्र सरकारच्या ‘रुरल टुरिझम विलेज’ व महाराष्ट्र सरकारच्या ‘संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान’ स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यापूर्वी २००७ मध्ये या गावाने महामहीम राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त केला आहे.तसेच सन २००५ -०६ मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान प्रथम क्रमांक, सन २०११-१२ चा तंटा मुक्ती पुरस्कार,तसेच सन २०२०-२१तालुका स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे. गत दहा वर्षापासून सौ. किरण सुहास वाटाणे व त्यानंतर श्री सुहास साहेबराव वाटाणे यांच्या नेतृत्वात गावाचा विकास केला जात आहे. गावकरी सुद्धा यात लोकसहभाग नोंदवून खारीचा वाटा देत आहे. या गावात चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने गावातील एक वस्तू चोरण्याची कोणी हिम्मत करत नाही. गावातील प्रवेशद्वारावर कुटुंबातील व्यक्तींच्या स्मृती प्रीत्यर्थ बेंचेस , गोबर गॅस , अनेक ठिकाणी परसबाग, हातपंप जवळ पाणी निचरा व्यवस्था आदी रुपात समृद्ध गावाचे दर्शन होते.
महिमापूर आदर्श डिजिटल गावं व प्राचीन पायविहीर बघण्यासाठी येणारे पर्यटकांची संख्या बघता एस टी महामंडळाने अमरावती हून आष्टी मार्की मार्गे दर्यापूर, अंजनगाव बसेस व्यवस्था केल्यास पर्यटकांच्या सोयीचे होणार असल्याचे येथील सरपंच सुहास वाटाणे यांचे म्हणणे आहे.