राज्यात होतोय पाण्यावर तरंगणारा पहिला सौरउर्जा प्रकल्प
वर्धा जिल्ह्यात 505 मेगावॅटची विद्युत निर्मिती
राज्यात होतोय पाण्यावर तरंगणारा पहिला सौरउर्जा प्रकल्प
वर्धा जिल्ह्यात 505 मेगावॅटची विद्युत निर्मिती
राज्यातील पहिला पाण्यावर तरंगणारा सौर उर्जा प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात आकारास येणार आहे. वर्धा नदीवर वसलेल्या निम्न वर्धा प्रकल्प धनोडी येथे हा प्रकल्प उभारल्या जाणार आहे. या प्रकल्पामुळे 505 मेगावॅटची विद्युत निर्मिती होणार असून याकरिता 3 हजार 30 कोटी खर्च अपेक्षित आहे. यातील अर्धा खर्च राज्य शासन करणार आहे. सुमारे 732 हेक्टर जलक्षेत्रावर हा प्रकल्प राहणार आहे. यामुळे 1400 लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महानिर्मिती व केंद्र सरकारचा सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांच्यात नुकताच या संदर्भातील करार झालेला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर कोळश्याची बचत होणार असल्याने कार्बन उत्सर्जन रोखण्यास सहकार्य होणार आहे. एका वर्षात सुमारे एक हजार पेक्षा अधिक दशलक्ष युनिट अपेक्षित असून 36 महिन्यात हा प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे.
वर्धा नदीवर (सींभोरा) मोर्शी येथे नल दमयंती प्रकल्पाला बघायला पावसाळ्यात हजारोंची गर्दी उसळते. 13 गेट असलेले अप्पर वर्धा धरण म्हणून हे सर्वत्र परिचित आहे. आता त्याच नदीवर 18 गेट असलेल्या निम्न वर्धा प्रकल्पावर ग्रीन एनर्जीचा प्रोजेक्ट होत आहे. वर्धा नदीवरील या प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्यातील रुख्मिणी मातेचे कौंडिण्यपूर, हनुमानाचे प्रसिध्द मंदिर असलेले जहागीरपूर व आर्वी तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निम्न वर्धा प्रकल्पावर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
साधारण नऊ महिन्यापूर्वी नाथसागर जायकवाडी प्रकल्प येथे अश्याच प्रकरचा तरंगत्या पाण्यावर जलविद्युतनिर्मितीचा उभारल्या जाणार होता. मात्र स्थानिक मच्छीमार बांधव व शेतकरी यांनी येथे एकोसेन्सिटिव्ह झोन असल्याने पक्ष्यांच्या अधिवास धोक्यात येत असल्याने या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. अश्या प्रकल्पामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होत असल्याचे सरकार मधील प्रतिनिधी सांगत होते तर दुसरीकडे पाण्यातील जीवांना व वनस्पतीला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने येथील जैवविविधता व जलीय अधिवास धोक्यात येईल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले होते.