मुंडा – पूर्वजांची निशाणी

मुंडा – पूर्वजांची निशाणी
सर्व सामान्य व्यक्ती समूहात आई वडिलांच्या किंवा पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाधी स्थळ उभारली जातात. कोरकू या आदिवासी जमातीत सुध्दा घरातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दगडी किंवा लाकडी ओंडक्यावर स्मृतीमूर्ती कोरली जाते. कोरकु जमातीतील व्यक्तीच्या स्मृती प्रीत्यर्थ उभारल्या जाणाऱ्या प्रतिमेला ‘ मुंडा ‘ या नावाने ओळखल्या जाते. चिखलदरा जातांना धामणगाव गढी जवळ व धारणी मार्गाने जाताना बिहाली नजिक एका मोठ्या वृक्षाखाली 25 ते 30 च्या संख्येत हे मुंडे बघायला मिळतात. या स्थळाला स्थानिक भाषेत गोलादेव म्हणतात. चिखलदरा नजिक असलेल्या बारलिंगा या गावात अशी कलाकुसरीचे करणारे कारागीर आहे. ते दगड व लाकडावर मृत व्यक्तीची प्रतिमा आरिख रेखीव पद्धतीने कोरतात. या कारागिरांना पूर्वी बारा बलुतेदार पद्धतनुसार अन्नधान्यच्या रुपात मोबदला दिला जायचा. आता मात्र हा व्यवहार रोख स्वरूपात केल्या जातो.एका मुंडा वर एकवेळेस एका व्यक्तिंचे कधीकधी एका पेक्षा जास्त व्यक्तीची प्रतिमा काढली जाते. आता तर व्यक्तिचित्रण सह फुलाचे चित्र सुध्दा यावर बघायला मिळतात.
मेळघाटात साग वनस्पती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने सागापासून हा मुंडा बनविल्या जायचा, पण याच समुदायातील एखादं कुटुंब सुखसमृद्ध असल्यास दगडावर रंगीत कोरीव व आकर्षक प्रतिमा रेखाटल्या जाते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर वर्षभरात हा मुंडा तयार करण्यात येत असून याच्या प्रतिष्ठापना दरम्यान गोत्रातील लोकांना निमंत्रित करून धार्मिक विधी केला जातो. यादरम्यान उपस्थितांना बोकड किंवा कोंबड्याची मेजवानी दिल्या जाते. मेळघाटात आदिवासी बांधव जे काही सण साजरे करतात, त्या प्रत्येक सणाला ते मुंडाजवळ घरून शिदोली आणतात. मुंडाजवळ घरून पूजेचे जे काही साहित्य आणले जाते, त्याला शिदोली असे म्हणतात. पोळ्याच्या सणाला मुंडाच्या ठिकाणी संपूर्ण गाव मिळून उत्सव साजरा करतात. यावेळी देखील बोकड कापून सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ज्या कुटुंबात लग्नकार्य राहते, त्या कुटुंबाच्यावतीने लग्नाची निमंत्रण पत्रिका सर्वात आधी मुंडाजवळ निमंत्रण म्हणून ठेवली जाते.