
हवेतील जेट फ्लाईट – बार टेल गॉडवीट
आंतरराष्ट्रीय पक्षी स्थलांतर दिन विशेष
उसे गुमां है कि मेरी उडान कूछ कम है,
मुझे यकीं है कि ये आसामान कूछ कम है !
असाच अनुभव बार टेल गॉडवीट या छोट्याश्या पक्ष्याच्या संदर्भात आला आहे. बार टेल गॉडवीट यालाच पट्टेरी शेपटीचा पाणटीवळा म्हणून ओळखल्या जाते. पाच महिन्याच्या या पक्ष्याने एका उड्डाणात न थांबता तब्बल १३५६० किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास केला आहे.
अलास्का ते ऑस्ट्रेलियामिया मधील टास्मानिया पर्यंत त्याने हा प्रवास केला आहे. हे अंतर त्याने केवळ ११ दिवसात पार केले आहे. एवढे अंतर पार करतांना कुठेही खाण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी न थांबता अविरतपणे हा प्रवास केला आहे. या पक्ष्याची विशेषता म्हणजे एवढ्या लांब स्थलांतर दरम्यान या पक्ष्यांचे अंतर्गत अवयव आकुंचित करू शकतात व पंखांचे प्रसरण करतात. अकरा दिवसात खानपान व विश्रांती शिवाय सलग अकरा दिवस एवढा लांबचा प्रवास म्हणजे अविश्वसनीय बाब आहे. यापूर्वीचा विश्वविक्रम सुद्धा याच प्रजातीच्या नावावर आहे. उडान भरण्यापूर्वी दोन आठवड्यात ते खाण्यापिण्यात खूप बदल करतात. म्हणजे नेहमीपेक्षा अधिक अन्न ग्रहण करतात. यादरम्यान या पक्ष्याच्या शरीरात ५८ टक्के पाणी असते, १७ टक्के चरबी तर उर्वरित २५ टक्के कोरड्या उती असतात. पण जेंव्हा हे पक्षी सलग उड्डाण साठी तयार होतात तेंव्हा त्यांच्या शरीरात नाटकीय आश्चर्य कारक बदल होतात.त्याच्या शरीरात फक्त ३१ टक्के पाणी तर चरबी अचानक १७ टक्के वरून थेट ५५ टक्के पर्यंत बदलते त्यामुळे उड्डाण भरताना ते लठ्ठ दिसतात. याच चरबीचा वापर ते स्थलांतर दरम्यान करतात. उड्डाण करतांना आवश्यक नसलेल्या अवयवांचे वजन कमी करतात. शिवाय आवश्यक असलेल्या स्नायूंचा आकार वाढवतात.जेंव्हा हे पक्षी स्थलांतर करून इच्छितस्थळी पोहचतात त्यांचे शरीरातील बदल सामान्य होतात.