जटायू … नामशेषाच्या मार्गावर
जटायू नामशेषाच्या मार्गावर
रामायणात जेंव्हा रावण माता सीतेचे अपहरण करत होता तेंव्हा जटायू नावाच्या पक्ष्याने रावणाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रावणाने जटायूशी दोन हात करत जटायूचे पंख छाटले. भगवान श्रीराम जेंव्हा सीता मातेच्या शोधार्थ होते तेंव्हा मरणासन्न अवस्थेत जटायूने आपबीती सांगत सीता अपहरणाचा पहिला पुरावा दिला. हा जटायू म्हणजे दुसरातिसरा कोणीही नसून सद्यस्थितीत नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला ‘गिधाड’ पक्षी आहे.
अनेकांना दिसायला कुरूप भासणारा गिधाड हा निसर्गाचा ‘स्वच्छता दूत’ आहे. महाराष्ट्रात नोंद झालेल्या ५८० पेक्षा अधिक पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. त्यामध्ये गिधाडांचाही समावेश आहे. निसर्गातील अन्नसाखळी ही एकमेकांवर अवलंबून आहे. यातील एकही घटक निखळला तर अन्नसाखळी ढासळण्याची शक्यता असते. गिधाडही या अन्नसाखळीतील दुसऱ्या जीवांवर अवलंबून असणारा पक्षी आहे. कारण ते केवळ मेलेल्या प्राण्यांच्या मृतदेहांवर उदरभरण करतात. म्हणून त्यांना ‘मृतभक्षक’ म्हणतात. जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती आढळतात. गरुडापेक्षा गिधाड हा पक्षी आकाराने मोठा आणि ताकदवान असतो तरीदेखील गिधाड शिकार करत नाही. त्यामुळे त्याचा समावेश गरुड, ससाणा आणि घारीसारख्या शिकारी पक्ष्यांच्या यादीत होत नाही.
महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद झाली असली तरी भारतीय, पांढऱ्या पुठ्ठ्याची, लांब चोचीची, हिमालयीन ग्रिफॉन आणि पांढरी गिधाडे प्रामुख्याने आढळतात. १९९० पूर्वी राज्यात गिधाडे खूप मोठ्या संख्येने आढळत होती. मात्र, ‘डायक्लोफेनॅक’ या औषधामुळे देशभरात गिधाडांची संख्या कमालीची कमी झाली. गुरांच्या उपचारांसाठी उपयोगात आणले जाणारे ‘डायक्लोफेनॅक’ नावाचे वेदनाशामक औषध गिधाडांसाठी विष ठरले आहे. हे वेदनाशामक औषध मृत जनावराच्या शरीरातून गिधाडांच्या शरीरात पोहोचते. यामुळे मोठ्या संख्येने गिधाड कमी झाले असल्याचे अनेक संशोधकांचे मत आहे तर काहींच्या मते अनेक जनावरांची विल्हेवाट कत्तलखाण्यात होत असल्याने गिधाड पक्ष्यांना पुरेस्या प्रमाणात अन्न मिळत नसल्याचे मत आहे. कत्तलखाण्यामुळे जनावरांचा नैसर्गिक मृत्यू थांबला. परिणामी गिधाडांचे नैसर्गिक खाद्य संपुष्टात आले. गिधाडांना खाद्यान्नाची कमी झाल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली त्यामुळे ते मलेरिया सारख्या आजाराचे बळी ठरत आहे. यामुळे सुद्धा या पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. नामशेष होण्याचे कारण वेगवेगळे असले तरी निसर्गातील स्वच्छतेसाठी व अन्न साखळी टिकून राहण्यासाठी गिधाड (जटायू) या पक्ष्याचे संवर्धन होणे हि काळाची गरज आहे.