
रेस्टॉरंटमधून घडला वर्ग 1 चा अधिकारी
निलेश दहिकर यांची अनोखी यशोगाथा
सध्या 31 डिसेंबरच्या निमित्याने अनेकजण रेस्टॉरंटबारशी निगडित गमतीदार रिल्स शेयर करत बैठकीचे नियोजन करत आहे. पण ह्याच रेस्टॉरंटबारमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या एका युवकाने आपले करिअर घडविले आहे. आयुष्यात एकदोन नव्हे तर तब्बल सहा नौकरी मिळविण्याची प्रेरणा त्याला याच रेस्टॉरंटबारमधून मिळाली हे विशेष. फुल आमला येथील निलेश दहिकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नुकतीच वर्ग 1 ची नोकरीला गवसणी घातली आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुलआमला येथील रहिवासी असलेल्या निलेश दहीकर यांचे वडिलांचे छत्र हरविल्यावर आई व दोन बहिणीसह कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आली. अमरावती शहरात दिवसा महाविद्यालयात शिक्षण घेणे व रात्री रेस्टॉरंट बारमध्ये नोकरी करणे ही नीलेशची दिनचर्या. याच दरम्यान एकदा जेवण करतांना शिवाजी कुचे यांचे इंग्रजी संभाषण ऐकून निलेश प्रेरित झाला. इंग्रजी शिकायची म्हणून सायंकाळी 7 ते 1 पर्यंत नोकरी व सकाळी 7 ते 9 इंग्रजीचे संभाषणाचे धडे गिरवू लागला. पुढे शिवाजी कूचे यांनी निलेश मधील धडपड बघत चापके सर व यादव तरटे पाटील यांची भेट घेत विनामूल्य शिकविण्याची अट घातली. यादव तरटे यांनी सुध्दा मला अश्याच मेहनती मुलांना मार्गदर्शन करण्याची आवड असल्याचे सांगितले.
निलेशने सुरुवातीला कंत्राटी स्वरूपात समाज प्रवर्तक, नंतर चिखलदरा पंचायत समिती येथे लिपिक पद, तदनंतर दुय्यम निबंधक कार्यालय येथे लिपिक, त्यानंतर सह जिल्हा निबंधक कार्यालय पुणे येथे चार वर्ष सेवा दिली. त्यादरम्यान विभागीय परीक्षा देत वर्ग दोनची परीक्षा उत्तीर्ण केली. निलेश सध्या अमरावती येथे जिल्हा संरक्षक अधिकारी म्हणून सेवा देत असून नुकतीच आदिवासी विभाग अंतर्गत वर्ग एकची वरिष्ठ संशोधन अधिकारी ही परीक्षा उत्तीर्ण करत मुलाखतीत सर्वाधिक गुण प्राप्त केले आहे.
गुरूदक्षिणा मिळाली:
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कठोर परिश्रम करत निलेश दहीकर ह्याने कमवा व शिका ह्या पद्धतीने आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण केले आहे. कधीकाळी हॉटेलमध्ये सेवा देणारा निलेश आज वर्ग एक अधिकारी बनला याचा आम्हाला गर्व आहे. हे यश म्हणजे नीलेशने आम्हाला दिलेली गुरूदक्षिणा असल्याचे मत यादव तरटे पाटील व शिवाजी कुचें यांनी म्हटले आहे.
मुलाखतीत निसर्ग प्रेमाने दिली साथ :-
यादव तरटे पाटील यांचेशी ओळख झाल्यावर निसर्गाशी जवळीक वाढली.यातून नैसर्गिक भटकंती वाढली. यादव सरांच्या मार्गदर्शननुसार एमपीएससी मुलाखतीची तयारी केली. मुलाखतीत सर्वाधिक प्रश्न निसर्गावर विचारण्यात आले. विशेष म्हणजे मुलाखतीच्या अगोदर होळी,रंगपंचमीच्या सलग सुट्ट्या आल्याने व मुलाखतीकरीता कमी कलावधी असल्याने प्रा.यादव तरटे, प्रा.अमोल पाटील (युनिक एकेडेमी) व प्रा. लाहे यांनी सुट्टी असताना एकेडमी उघडून माझी तयारी करून घेतली. ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाने मुलाखतीत सर्वाधिक गुण प्राप्त करू शकलो असल्याचे निलेश दहिकर सांगतात.
10 रुपयाने बदलले माध्यम :
हॉटेलमध्ये सुरुवातीला काम करतांना मराठी भाषा बोलणाऱ्याला कमी व हिंदी बोलनाऱ्याला 10 रुपये जास्त मानधन मिळत होते. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाला हिंदी विषयाला प्राधान्य दिले. त्या काळात एक एक रुपया कमविणे माझ्या साठी गरजेचे असल्याने मी पदवीला हिंदी विषयाला प्राधान्य दिले असल्याचे निलेश दहिकर सांगतात.