झाडाचे वय ओळखायचे तरी कसे ?
झाडाचे वय ओळखायचे तरी कसे ?
जन्माचा दाखला हा वयाचा पुरावा असतो, पाळीव प्राण्यांच्या जन्म हा व्यक्तीच्या सानिध्यात होतो म्हणून त्याचे अचूक वय कळते पण ज्यांचा जन्म मानवाने प्रत्यक्ष बघितला नाही मग त्याचे वय ओळखायचे तरी कसे ? हा प्रश्न अनेकांना बैचैन करणारा आहे. प्राण्याचे वय हे बाह्यांगावरून लक्षात येते जसे शिंगे, खुर, दात, केस, चोच असे नानाविध अवयवावरून अनुभवी व्यक्ती ओळखतात पण झाडाचे वय ओळखणे एवढे सोपे काम नाही.
झाडांचे वय हे झाडाच्या बुंध्यावरून कळते. झाड्याच्या बुंध्यावर अनेक रिंग बघायला मिळतात ह्या रिंग काही झाडावर फिकट रंग्याच्या व काही गडद रंगाच्या असतात. निसर्गातील हवामान, माती, जमिनीचा पोत, प्रदूषण, पाणी, मुळाचा ताण, प्रकाश आदी विविध घटक यासाठी कारणीभूत असतात. झाडाच्या बुंध्यावर रिंग (वलय) असतात. ह्या रिंग वरून तज्ञ व्यक्ती त्या झाडाचे वय सांगतात. वनस्पतीच्या वलयांच्या अभ्यासाला डेंड्रोक्रोनोलॉजी म्हणतात. रिंग वरून झाडाचे वय काढण्यात एक मोठे नुकसान आहे ते म्हणजे रिंग बघण्यासाठी बुंधा कापावा लागतो. अनेक प्रकारच्या झाडांमध्ये, विशेषत: समशीतोष्ण प्रदेशात, प्रत्येक वर्षी खोड आणि फांद्यांमध्ये लाकडाचा एक नवीन थर जोडला जातो. जेव्हा झाड आडवे कापले जाते तेव्हा दृश्यमान रिंग तयार करते. हलक्या किंवा फिक्या रंगाची रिंग वसंत ऋतूतील वाढ दर्शविते तर गडद रिंग उन्हाळ्यातील वाढ दर्शविते. जंगलातील आगीतील बाधित झाडे त्यांच्या अंगावर कड्यांवर चट्टे तयार होतात. जंगलातील झाडे शहराच्या तुलनेत अधिक गतीने वाढतात.
वय काढण्याच्या दुसऱ्या पद्धतीमध्ये झाडांना चिरा न देता झाडांना बोअर करून त्यातील पदार्थ वरून वय काढले जाते. इन्क्रिमेंट बोअरर च्या मदतीने झाडाचा कोर नमुना काढला जातो. ज्याद्वारा कोर नमुन्यातील रिंग नंतर मोजता येतात. रिंगची रुंदी वर्षाच्या हवामानाचा अंदाज देतात. जसे रुंद रिंग हे उबदार, ओले वर्षाचे संकेत देतात तर पातळ रिंग कोरडे वर्ष किंवा थंड असल्याचे संकेत देतात.दुष्काळाच्या काळात झाडाची रिंग इतर वर्षाच्या तुलनेत खूप लहान दिसते. कोरड्या परिस्थितीमुळे त्याच्या वाढीला मर्यादा आल्याने या रिंगवर प्रतिकूल परिणाम दिसून येतो.