हॉर्नबिल संरक्षणासाठी रोपनिर्मितीचा प्रयोग
हॉर्नबिल संरक्षणासाठी रोपनिर्मितीचा प्रयोग
राज्यात हॉर्नबिलच्या महाधनेश, मलबार धनेश, राखाडी धनेश आणि मलबार राखाडी धनेश या चार प्रजाती आहेत. यापैकी महाधनेश ही प्रजाती दुर्मीळ होत असून, ह्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पक्ष्यांच्या विष्ठेपासुन रोपनिर्मितीचा प्रयोग राबविल्या जात आहे. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात हा नावीन्यपूर्ण प्रयोग राबविल्या जात आहे. घनेश पक्ष्यांची ढोली असणारे वृक्ष आणि आजूबाजूची जंगले या उपक्रमाच्या माध्यमातून दत्तक घेतली जातात. या पक्ष्याचे खाद्य वड, पिंपळ आणि उंबराची फळे असतात आणि २० टक्के इतर फळे असतात. पक्ष्यांच्या विष्ठेमधून बिया खाली पडतात. ज्या वृक्षावर ढोल्या आहे त्या वृक्षाखाली स्थानिक संस्थेकडून जाळी बसविली जाते. जाळीमधील बिया आणि फळांवरूनत्या पक्ष्याचे फूड प्लांट समजतात. या बिया संकलित करून त्याद्वारे रोपवाटिकेमध्ये रोपे तयार केली जातात. रोपवाटिकेमध्ये काजरा, वड, पिंपळ, एरंडी, चांदफळ, लिंबारा, कडूकवठ या जातीच्या रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी नी स्वत:च्या जमिनीत झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आजूबाजूच्या जंगलांतील आंबा, काजू या एकाच पद्धतीच्या लागवडीमुळे घटणारी खाद्य झाडांची संख्या यामुळे हॉर्नबिल प्रजाती संकटग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे धनेश पक्षी संवर्धन केंद्रबिदू ठेवून रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्री संकल्प सोसायटी, सृष्टीज्ञान संस्था आणि आठल्ये-सप्रे पित्रे महाविद्यालय यांनी या परिसरात हॉर्नबिल संवर्धन साठी विष्ठेपासून रोप निर्मिती प्रकल्पाला सुरुवात केली आहे. या उपक्रमासाठी शार्दुल केळकर, प्रताप नाईकवाडे, प्रशांत शिंदे विशेष परिश्रम घेत आहेत.
विष पचविण्याची क्षमता :-
दासवन, काजरा या वृक्षांची फळे विषारी असल्याने इतर पक्षी आणि वन्यप्राणी या वृक्षांची फळे खात नाहीत. त्यामुळे या वृक्षाचे बीज प्रसारण होत नाही, पण हॉर्नबिलचे हे आवडते खाद्य आहे. निसर्गाने या पक्ष्याला विष पचविण्याची क्षमता दिलेली आहे. तसेच हे वृक्षदेखील केवळ बीज प्रसारणासाठी हॉर्नबिल पक्ष्यावर अवलंबून आहेत. हॉर्नबिलची संख्या घटत असल्याने या वृक्षांचा प्रसार जास्त झालेला नाही. या वृक्षांचे संगोपन केले जात आहे.