रानपिंगळाचा साक्षीदार – फालतू

रानपिंगळाचा साक्षीदार – फालतू
1880 मध्ये पहिल्यांदा रानपिंगळा किंवा वनघुबड या पक्ष्याची देशात नोंद करण्यात आली. त्यानंतर तब्बल 117 वषार्नंतर 1997 साली विदेशी पक्षी संशोधक पामेला यांनी मेळघाटच्या जंगलात या दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्व शोधले. त्यानंतर या पक्ष्यांच्या अभ्यासासाठी देश विदेशातील अनेक अभ्यासक रान पिंगळा च्या अभ्यासासाठी मेळघाटात यायचे, त्याच्या हालचाली टिपायचे . मेळघाटात चौराकुंड भागात सर्वाधिक रान पिंगळे आढळायचे त्यामुळे साहजिकच अभ्यासकांचा ओढा या भागात अधिक राहायचा. रानपिंगळा मुळे खरे अनेकांना प्रचार प्रसिध्दी मिळाली कारण नामशेष होणारा हा पक्षी मेळघाटात आढळला होता. या सर्व प्रवासात रान पिंगळा पक्ष्याची नस अन् नस माहिती असणारा माहितीगार परशुराम उर्फ फालतू कासदेकर मात्र कायम वंचित राहिला.
परशुराम पटेल :-
चौराकुंड वन परिक्षेत्रात 1991 पासून वनमजूर म्हणून काम करणारा फालतू कासदेकर हा खरं तर इथला निसर्ग शिपाई. परशुराम नावाने कदाचित त्यांना कोणी ओळखणार देखील नाही. फालतू कासदेकर किंवा फालतू पटेल हीच त्यांनी पंच क्रोशितील ओळख. पक्षी, प्राणी व वनस्पतीचा अभ्यास असणारा हा व्यक्ती प्रचंड आधुनिक विचारसरणीचा आहे. गावात एखाद्या मंदिरापेक्षा शाळा व दवाखाने गरजेचा असल्याचं मत सर्व गावकऱ्यांना समजावून सांगतो. एखादा आदिवासी विशेष म्हणजे गावातील पटेल म्हणून त्याला गावकरी मानसन्मान देतात. त्यांच्या अंगी असलेले निसर्गाची दृष्टी बघून अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी सुध्दा अनेकदा फालतू ची भेट घेतली आहे. नवेगाव बांधला सुध्दा अरण्य ऋषींनी फालतूला निमंत्रित केल्याचे परशुराम कासदेकर सांगतात.
शकुन-अपशकुन, काळी विद्या, गुप्तधन या अंधश्रद्धा आणि पक्ष्यांच्या अधिवासाबाबत असलेले अज्ञान यामुळे रानपिंगळ्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पिंगळाच्या अभ्यासासाठी जेंव्हा अभ्यासक चुकीच्या पद्धतीने हाताळणी करायचे तेंव्हा त्यांना समज देण्याचे काम सुध्दा फालतू करायचा. घुबडाच्या बहुतेक प्रजाती निशाचर आहेत पण रानपिंगळा हा दिनचर आहे. साप, उंदीर, पाली, सरडे हे त्याचे खाद्य. मानवी वस्त्या, गवती कुरण व घनदाट जंगले हे त्याचे अधिवास. मेळघाटात आज जे रान पिंगळाचे अस्तित्व बघायला मिळते शिवाय राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्तरावर रान पिंगळा पोहचविण्यासाठी फालतूचे योगदान सुध्दा महत्वाचे आहे. विशेष म्हणजे या पक्षांसोबत त्यांचे अफलातून ट्यूनिंग आहे. पिंगळ्याच्या आवाजात स्वतः फालतू कासदेकर यांनी शिळ घातली की दुसऱ्या बाजूने पिंगळे सुध्दा सादला प्रतिसाद देतात.
फालतू यांच्या आवाजावरून आलेला हाच तो रानपिंगळा
पेसाबाबत स्पष्ट मत :-
मेळघाटमध्ये पेसा भरती अंतर्गत अनेक विभागाच्या पदभरती होत आहे. वन विभागात सुध्दा मोठ्या प्रमाणावर पेसा अंतर्गत वनरक्षकांच्या जागा भरल्या जात आहे. खरं तर शासकीय सेवेत स्थानिक आदिवासींना प्राधान्य मिळणे ही चांगली बाब आहे पण आदिवासी लोकांसोबत सर्व सामान्य लोकांच्या समावेशाने आदिवासी समाज आधुनिककरणाकडे वाटचाल करेल. आज आदिवासी लोकांकडे दुचाकी वाहन वाढत आहे उद्या नोकरीमुळे चार चाकी वाढेल पण सर्व सामान्य लोकांच्या सहवासाने विचारात सुध्दा आधुनिककरण येत असल्याचे परशुराम कासदेकर यांचे म्हणणे आहे.
अशीही एक खंत :-
अनेक लोकं देश विदेशातून पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या संशोधनासाठी चौराकूंड मध्ये येतात. आम्हाला घेऊन स्थानिक भागात फिरतात. आम्ही आमचे कामे सोडून त्यांना वेळ देतो शिवाय कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता सहकार्य करतो. पण कुठल्याही बैठकीत, सभेत किंवा अन्य ठिकाणी आमचा साधा उल्लेख पण संबंधित अभ्यासक यांना करावासा वाटत नाही याची खंत फालतू यांच्या मनात आहे.