शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी अनुभवली खासदार मंत्रीसह ‘ हवाई सफर ‘

जिल्हा परिषद विद्यार्थ्यांनी जाणला राजधानीचा ईतिहास

विद्यार्थ्यांनी अनुभवली खासदार मंत्रीसह ‘ हवाई सफर ‘

सुखद अनुभव : जिल्हा परिषद विद्यार्थ्यांनी जाणला राजधानीचा ईतिहास

सहलीचा शुभारंभ करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, शिक्षणाधिकारी डॉ.अरविंद मोहरे व ईतर मान्यवर

 

तसे त्या २८ विद्यार्थ्यांचे वास्तव्य ग्रामीण भागातले…फार फार तर काहींनी बाजाराच्या व खरेदीच्या निमित्याने गावाची वेस ओलांडलेली…पण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या पुढाकाराने चौदा तालुक्यातील २८ विद्यार्थ्याना दिल्लीची सफर घडली. यात देशातील राजधानी दिल्लीचा ईतिहास व सद्यस्थितीतील राजधानीतील धावपळ अनुभवाला मिळाली. विशेष म्हणजे परतीच्या विमान प्रवासात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह हवाई सफरचा अनुभव मिळाला.

अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत चौदा पंचायत समितीमधील शिष्यवृत्ती परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा अंतर्गत यशस्वी विद्यार्थी, खेळाडू तसेच आदर्श शाळेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्याना जिल्हा परिषद अमरावती तर्फे सेस फंडातून दिल्ली हवाई सफरचे आयोजन करण्यात आले. यावेळी या दिल्ली सहल दरम्यान विद्यार्थ्यां सोबत व मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. सुनीता लहाने(ढोक), भारती कासे, आशिष पांडे, वीरेंद्र ब्राम्हण आदींची निवड करण्यात आली. मेळघाट व ईतर विवीध तालुक्यातील काही विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा गावाबाहेर पाऊल टाकले असल्याने हा प्रवास म्हणजे जीवनाचा नवा अनुभव होता. काही विद्यार्थ्यांनी रेल्वे पहिल्यांदा बघितली होती. पहिल्यांदा वातानुकूलित रेल्वे, हॉटेल प्रवास अनुभवाला मिळाला होता. ऐतिहासिक लाल किल्याची भव्यता, पी.एम.श्री केंद्रीय विद्यालयातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविणारं शिक्षण, राष्ट्रपती भवनातील संग्रहालय, इंदिरा गांधी स्मृतीभवन, कुतुबमिनार, न गंजणारा पंचधातूचा लोहस्तंभ, आय.एन.एस.विक्रांत, मिग विमान यासह दिल्ली शहरातील धावपळ या विद्यार्थ्यांनी अनुभवली.

शिक्षकांनी दाखविले पुस्तकाबाहेरील जग :

सहल प्रवास दरम्यान देशातील विविध राज्य, राजधानी, मोठी शहर, डोंगर, नदी व शहरे लागली. राजधानी म्हणून दिल्ली शहरच का ? रेल्वेच्या रुळात अंतर का ? रेल्वे ये जा करतांना रेल्वेची बाजू का बदलत नाही ? विमानाच्या खिडकी काचबंद का ? असे नानाविध प्रश्नोत्तरेद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात खेळ व मनोरंजक पद्धतीतून पुस्तकंमुक्त व अनुभवजन्य शिक्षण दिलं.

आठवणीतील सहल :

भर उन्हाळ्यात रेल्वे डब्ब्यातील गार गार प्रवास, प्लॅटफॉर्मवरील धावत्या पायऱ्या, आलिशान हॉटेल आणि त्यात टरबूज केकच्या माध्यमातून शिक्षकांनी साजरा केलेला माझा वाढदिवस. ही सहल म्हणजे माझ्या आयुष्यातील आठवणीतील सहल असल्याचे जिल्हा परिषद दहीगाव धावडे येथील विद्यार्थ्यांनी उन्नती सुरेश गवई (इयत्ता सहावी) हिने सांगितले.

खासदार व मंत्रीसह सफर :-

अनेकांना आयुष्यात साधे पंचायत समिती सभापती बघायला मिळत नाही. या सहलीच्या निमित्याने सहलीला हिरवी झेंडी दाखवायला मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, शिक्षणाधिकारी डॉ.अरविंद मोहरे, उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने हे होते. परतीच्या प्रवासात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गप्पा, सेल्फी तसेच हवाई सफर घडली. खासदार बळवंत वानखडे यांनी सुध्दा जिल्हा परिषदेच्या हवाई सफरचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारत फोटोचा आनंद अनुभवला.

खा.बळवंत वानखडे यांचेसह विद्यार्थी

सहलीतील सहभागी विद्यार्थी :

संस्कृती कडू, देवयानी देशमुख, पियूष हिवराळे, मयुरी बोरेकर, यासिर अहमद खान जावेद खान, उम्मी कुल्सूम मो.इम्रान, चंचल शिंदे, अर्णव मेहरे, शेख बिलाल शेख आरिफ, हमराज शेख मो अख्तर, उन्नती सुरेश गवई, मानस डुकरे, मयूर खडके, प्रज्वल तायडे, अदिती चव्हाण, आयुष कलदाते, देवश्री हराळे, प्राजक्ता तिरमारे, वैष्णवी जावरकर, सार्थक कंटाळे, लाईबा तस्निस मो.नौशाद, तन्मय बागेकर, आस्था वैद्य, अरहम सलीम मिर्झा, गुंजन आमले, एकता कोंडेकर, अनुष्का युवनाते, भाविका पाचरे आदी विद्यार्थ्यांचा या सहलीत समावेश होता.

 

 

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close