
जिल्हा परिषदेचे पाच शिक्षक ऑन द स्पॉट सस्पेंड
गुणवत्तासह शालेय अनियमितता ठरली कारणीभूत
अमरावती :-
दिनांक 4 जुलै रोजी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी मेळघाटातील काही आरोग्य केंद्र तथा जिल्हा परिषदेच्या शाळांना आकस्मिक शाळा भेटी दिल्या. यात एकताई शाळेतील एक शिक्षक, खुटिदा शाळेतील दोन व हिरदा शाळेतील दोन शिक्षक असे एकूण पाच शिक्षकांना अनुपस्थिती , दर्जाहीन शालेय पोषण आहार, घटती पटसंख्या, गुणवत्ता व प्रशासकीय अनियमितता या कारणास्तव पाच शिक्षकांना ऑन द स्पॉट निलंबित करण्यात आले.
शिक्षकांशिवाय जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत हतरू येथील ग्रामपंचायत अधिकारी , खुटिदा येथील अंगणवाडी सेविका, हतरु बिटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका, हतरू केंद्रप्रमुख व चिखलदरा पंचायत समितीचे शालेय पोषण आहार अधीक्षक यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. या निलंबन तथा शो कॉजमुळे मेळघाटसह संपूर्ण जिल्ह्यात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी फेब्रुवारी 2024 पासून अमरावतीचे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली. सुरुवातीला प्रशासक म्हणून अनेक शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना सन्मानित करण्यात आले. यासह शिक्षकांना कायम गुणवत्ता वाढीसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. यानंतर त्यांनी शैक्षणिक सत्राच्या अखेरीस स्वतः पुढाकार घेत अंगणवाडी ते इयत्ता आठवी शाळांमध्ये अध्ययन स्तर पडताळणीचा उपक्रम राबविला. नुकताच त्याचा अहवाल दिनांक 26 जून 2025 रोजी शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला. यात महाराष्ट्र शालेय विभाग मार्फत शिक्षकांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेली पायाभूत संकलित चाचणी मध्ये 70% विद्यार्थ्याना वाचता येते तर जिल्हा परिषद अमरावती द्वारा घेण्यात आलेल्या अध्ययन स्तर पडताळणी दरम्यान केवळ 14 % विद्यार्थ्याना वाचन करता येते व अन्य बाबी खटकल्या. ही तफावत प्रत्यक्ष पडताळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी आकस्मिक शाळा भेटीचे सत्र सुरू केले आहे.

मेळघाटात आकस्मिक देण्यात आलेल्या शाळा भेटी दरम्यान अनेक शिक्षकांची अनुपस्थिती, शालेय पोषण आहाराचा सुमार दर्जा, ईतर शालेय रेकॉर्ड अद्यावत नसणे, शाळा सोडून जातांना त्याची नोंद न ठेवणे, सातवीतील विद्यार्थ्याना नीट वाचन न येणे, स्वच्छतागृह घाणेरडे असणे, शिक्षक वारंवार अनुपस्थित राहणे, शालेय पोषण आहारातील मुदत संपलेले साहित्य वापरणे आदींचा ठपका ठेवला. शेरेबुकात या सर्व बाबींची नोंद करत ऑन द स्पॉट सस्पेंड (निलंबन) करत कार्यालयीन चौकशी लावण्याचे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
जिल्हा परिषद प्रशासकाच्या या आकस्मिक भेटीने मेळघाटातील शिक्षकांसह अधिकाऱ्यांना सुध्दा धडकी भरली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रत्येक अंगणवाडी व शाळा भेटी दरम्यान शालेय पोषण आहाराची चव घेत तपासणी करत असल्याने महिला व बालकल्याण विभागसह शिक्षण विभाग हाय अलर्ट मोड वर आला आहे. प्रशासकीय बाबिंसह वर्गातील गुणवत्ता तपासण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 26 जूनच्या बैठकीत दिल्या असल्याने पर्यवेक्षकिय यंत्रणेच्या शाळा भेटी वाढल्या आहे.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट :
या भेटीदरम्यान कार्यालयाला भेट देणाऱ्या विविध व्यक्ती, संघटना द्वारा संकलित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आले. चिखलदरा व धारणी तालुक्यातील दुर्गम पायवाट व चिखल तुडवत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व शाळांना भेटी दिल्या.

गुणवत्ता वाढीवर भर – मुकाअ संजिता महापात्र
प्रत्येक जिल्हा परिषद शिक्षकांनी आपल्या वर्गातील गुणवत्ता वाढीवर भर द्यावा. मेळघाटातील अनेक शाळांना भेटी दिल्या असता अनेक प्रकारची अनियमितता आढळून आली. त्यामुळे विविध शाळांमधील पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे, तर एका शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात असल्याचे जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी सांगितले.