हत्तींना मिळते पेंशन

हत्तींना मिळते पेंशन
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात जुन्या पेन्शनचा मुद्दा जोर धरत आहे, पण तुम्हाला माहिती आहे का? ज्या प्रमाणे माणसांना म्हणजेच राजकारणी किंवा शासकीय कर्मचारी यांना संपूर्ण हयात पेंशन मिळते तशी ती प्राण्यांना सुध्दा मिळते. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणारा कोलखास येथे चंपाकली, लक्ष्मी, जयश्री, सुंदरमाला या नावाच्या मादी हत्ती आहेत. या हत्तींना दरमहा 21 हजार 500 रुपये उदरनिर्वाहसाठी वेतन दिल्या जाते. हत्तीचे सरासरी आयुर्मान 100 वर्षाचे असून साधारण 60 वर्षापर्यंत तो कार्यरत राहतो. या हत्तींना वयाच्या 60 वर्षापर्यंत वेतन मिळत असून सेवा निवृत्तीनंतरसुध्दा म्हणजे ६०न वर्ष वयानंतर 100% वेतनाएवढे निवृत्तीवेतन दिल्या जाते.
प्राण्यांविषयी नागरिकांना ममत्व वाटावे व जवळीक निर्माण व्हावी सोबतच मिळणाऱ्या उत्पनातून हत्तीचे संगोपन करण्याच्या उदेश्याने २०१८ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दत्तक योजना सुरू करण्यात आली. या दत्तक योजने अंतर्गत दत्तक घेण्याऱ्या व्यक्तीला हत्तीच्या संगोपनाकरिता एका महिन्याचे 21 हजार 500 भरावे लागतात. त्या एक महिन्यासाठी त्या दत्तक हत्तींना त्या दानशूर व्यक्तीच्या नावाने ओळखल्या जाते. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘ चंपाकली ‘ या हत्तीनीला दत्तक घेतले आहे. या योजने अंतर्गत भरलेले शुल्क शासनाच्या नियमाप्रमाणे आयकरात ८० टक्के सूट मिळण्याचे प्रावधान आहे. दत्तक घेणाऱ्या जोडप्यासाठी सेमाडोह, हरीसाल येथे दोन रात्र मुक्काम, जंगल सफारी, हत्तीसह नदीत आंघोळ यासह आणखी काही सुविधा विनामूल्य देण्यात येते. मेळघाट येथील कोलखास विश्रामगृह परिसरात या गजगामिनीची सफारी करणे म्हणजे वेगळीच पर्वणी ठरते. हत्तीसह पोलीस विभागातील श्वानाना सुद्धा वेतन व पेन्शन सुविधा राहते.
हत्तींना वैद्यकीय रजा
वाढत्या थंडीमुळे हत्तीच्या तळपायाला भेगा पडतात. चालताना त्यांना त्याचा त्रास होतो. त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी त्यांना वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. या सुट्टीदरम्यान हत्तीच्या पायांना ‘चोपिंग’ केल्या जाते. चोपिंग म्हणजे ४०-४५ प्रकारच्या जडीबुटींपासून औषधी वनस्पतीपासून बनविलेला लेप. त्यासाठी हिरडा, बेहडा, सुंठ, त्रिफळा, जायफळ, आसमंतारा अशा वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून एका ड्रममध्ये उकडून ‘चोपिंग’ चा लेप तयार करतात.