जंगलाचा सम्राट – गजराज
वाघ हा वन्यजीवांपैकी सर्वाधिक ग्लॅमर असलेला प्राणी. जंगलातील नंबर एकचा सेलिब्रिटी म्हटल्यास हरकत नाही, वाघांनंतर सर्वाधिक आकर्षक असते ते हत्तीचे. कारण हत्ती हा जंगली व पाळीव अश्या दोन्ही प्रकारात मोडणारा विशालकाय प्राणी आहे. तब्बल पाच ते सहा टन वजन असलेले वजनदार शरीर व तब्बल नऊ ते दहा फुट उंची असल्याने सहसा कोणता जीव याच्या वाट्याला जात नाही. शरीर विशालकाय असले तरी दृष्टी तशी कमी पण तेवढीच तीक्ष्ण. हत्तीची कातडी एक इंच जाड असते. एका तासात हा प्राणी केवळ पाच ते सहा किमी अंतर कापू शकतो. हत्ती शक्तिशाली प्राणी असून तब्बल चार ते साडे चार टन पर्यंत वजन सहज उचलू शकतो.
प्रजननकाळ :-हत्तींचे गर्भधारण काळ 22 महिने असतो. एका वेळी एकच पिल्लू जन्माला येते. हत्तीचे पिल्लू जन्माच्या वेळी तब्बल 100 ते 120 किलो वजनाचे व ३ फुट उंचीचे असते. प्राण्यांमधील सर्वाधिक गर्भधारण काळ हत्तीचा समजला जातो. पिल्लू 2 ते 4 वर्षे आईच्या सोबत राहतात आणि तिच्याकडून जगण्याचे कौशल्ये शिकतात.
हत्तींचा संवाद :-हत्ती संवाद करण्यासाठी आवाज, स्पर्श, गंध यासाठी सोंड व कानाचा वापर करतात. त्यांची स्मरणशक्ती व बुद्धीमत्ता अफाट आहे. अगोदरच्या पिढीतील काही बाबी त्यांच्या स्मरणात राहत असल्याचे समोर आले आहे. हत्तींना दुःख, आनंद आणि राग यांसारख्या भावना अनुभवू शकतात. शिवाय आपल्या सहकाऱ्यांचा स्मृतीदिन ते स्मरणात ठेवतात. हत्ती आपसात खेळ, मस्ती व प्रसंगी दंगा पण करतात.
हत्तीची चिखलफेक :-हत्ती बऱ्याचदा अंगावर चिखलफेक करताना आढळतो याचा मागोवा घेतला असता हत्तीच्या शरीरात उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने त्याला अधिक गर्मी होते शिवाय अन्य कीटक सुद्धा या महाकाय जीवास त्रास देतात या दोन्ही कारणाने हत्ती आपले शरीर चिखलाने थंड करतो व स्वतःचा किड्यांपासून बचाव करतो. हत्ती स्वतःला कूल ठेवण्यासाठी कानांची उघडझाप करतो.
हत्तीचा आहार :-हत्ती हा शाकाहारी प्राणी असून तो संचार दरम्यान विविध झाडांचे पाने, फुले, साल, फळे खातो. ऊस व केळी हे त्याचे आवडीचे मिष्ठान्न. एका दिवशी तब्बल दीडशे ते दोनशे किलो अन्न तो खावू शकतो. विशेष म्हणजे 24 तासातील 16 तास अन्न खाण्याचे काम हत्ती करतो. आपली भूक शमविण्यासाठी प्रसंगी अनोळखी व्यक्तीवर तो विश्वास ठेवतो. यामुळे दक्षिण भारतातील (वायनाड) एका माथेफिरुने चार वर्षापूर्वी हत्तीनीला स्फोटक पदार्थ असलेला अननस खावू घातला होता. तेंव्हा त्या हत्तीनीने पाण्यात जलसमाधी घेतल्याचा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला होता.
हस्ती दंत :-हत्तीचे एकूण दोन प्रकारचे दात असतात. सोंडे सोबत जे दोन सुळे दिसतात त्याला अग्रदंत असे म्हणतात हे वयानुरूप एक मीटर पर्यत वाढत जातात. अग्रदंत हे लांब, घुमटदार असतात. हे हत्तीसाठी शस्त्र म्हणून उपयोगी येतात. तर पदार्थ चावण्यासाठी ब बारीक करण्यासाठी चर्वणदंत हे दाढेसारखे दात म्हणून काम करतात.
समाजशील प्राणी :- हत्ती हा समाजशील प्राणी असून तो कळपात आपले जीवन घालवतो. या कळपात 5 ते 30 पेक्षा अधिक हत्ती सदस्य असू शकतात. विशेष म्हणजे जेष्ठ हत्ती किंवा मादी हत्ती या कळपाचे नेतृव करते.12 ते 15 वर्षानंतर काही नर हत्ती कळप सोडून एकटे भटकतात.
गजराजला भीती कोणाची ? :-हत्ती सारखा अवाढव्य प्राणी मधमाशी सारख्या छोट्या जीवाला घाबरतो. जेंव्हा मधमाशी हत्तीच्या भोवताल पिंगा घालतात तेंव्हा हत्ती जोमाने कान फडफडवून पाय मारून धूळ उडवून प्रसंगी पळ काढून विचित्र वर्तवणूक करतात.
हत्तीला धोके :-हत्तीला सर्वाधिक धोका हा कोणत्या वन्यजीवापासून नव्हे तर मानवा पासून आहे. मानव-हत्ती संघर्ष, पिकांमुळे हत्तींचा अधिवास नष्ट करणे. हस्ती दंतची आंतरराष्ट्रीय तस्करी होत असल्याने हत्तीची शिकार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काही देशात हा प्राणी रेड लिस्ट मध्ये आला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती तसेच कायदे अधिक कठोर करून संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. हत्ती संवर्धनासाठी भारतातील पेरियार(केरळ), बंदीपूर, दुबारे, (कर्नाटक), थेपक्काडू, मुदुमलाई (तामिळनाडू), कामेंग, चिरंग-रिपू (आसाम), तेहरी (उत्तर प्रदेश), सिंहभूम(झारखंड) येथील जंगलाचा काही भाग संरक्षित केला आहे.