स्वावलंबी भारद्वाज (Crow-pheasant)
स्वावलंबी भारद्वाज (Crow-pheasant)
स्वतंत्रपणे घरटे बांधून पिलाची निगा राखणारा स्वावलंबी पक्षी म्हणून भारद्वाज ओळखल्या जातो . ह्याचा आकार डोमकावळ्याएवढा असतो. हा जरा चमत्कारिक पण मोठा रंगतदार पक्षी आहे. पाठ काळी कुळकुळीत, चकाकणारी, चेस्टनट रंगाचे पंख, लांब रुंद रेखांकित चोच ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. छोटी झाडे, झुडपे व मधून मधून उंच गवत असलेल्या माळरानात हा पक्षी सापडतो. काही वेळा गावांजवळही हा असतो. हा नेहमीच जमिनीवर असतो. शेपटी फरफटत व मधूनमधून पंखांची उघडझाप करून किड्यांना उडवीत हा पक्षी झुडपांमधून हिंडत असतो. मोकळेपणाने उद्यानांमधून वावरतो. अन्नासाठी हा काही वेळा झाडांवर चढतो व ह्या फांदीतून त्या फांदीत त्वरित उड्या मारीत असतो. ‘ऊक’ असा खर्जामधला आवाज नियमितपणे तो काढीत असतो. विशेषतः उन्हाळ्यात (गरम हवामानात) हा आवाज लांबवर ऐकू येतो. काही वेळा ‘कूप-कूप-कूप-कूप’ असा वेगळा आवाजही हा पक्षी करतो. एका वेळेला ६ ते ७ – तर कधी २० वेळापर्यंत हा आवाज निघतो. एका सेकंदात २ किंवा ३ वेळा ‘कूप’ असा आवाजाचा वेग असतो. त्याला लगेच लांबच्या दुसऱ्या पक्ष्याची जोड मिळते आणि हे अनियमित द्वंद्वगीत चालू राहते. काही वेळा कॅव, क्लक अशा निरनिराळ्या आवाजांची भेसळ असलेले गाणेही हा पक्षी गातो. विणीच्या हंगामात नर मादीसमोर विलक्षण क्रीडा करतो. पिसे फुलवून, शेपटी हलवून व पंख खाली टाकून नर मादीसमोर दिमाखाने नाचतो. भारद्वाजाचे उडणे हळू, कष्टप्रद व थोड्या अंतराचे असते. नाकतोडे, इतर कीटक, शेतातले उंदीर, सरडे आणि छोटे साप हे त्याचे अन्न. लहान पक्ष्यांच्या घरट्यात शिरून त्यांची अंडी व पिले खराब करणे किंवा खाऊन टाकणे हा त्याचा छंद आहे. त्यासाठी तो अतिशय काळजीपूर्वक झुडपांमधून घरटी शोधीत हिंडतो. कोकिळ पक्ष्याप्रमाणे हा पक्षी दुसऱ्याच्या घरट्यांवर अवलंबून राहणारा नसून स्वतंत्रपणे घरटे बांधतो. पाने आणि काटक्या ह्यांचा गोलसर आकार करून हा पक्षी काटेरी झाडांच्या बुंध्याजवळ घरटे बांधतो. घरट्याला बाजूने एक दार असते. खडूसारखी स्वच्छ पांढरी ३ ते ४ अंडी हा पक्षी घालतो.