बहुपयोगी अळू Colocasia esculenta

बहुपयोगी अळू Colocasia esculenta
नुकताच मराठी माणसाच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली. श्रावणात उपवासांची संख्या अधिक राहते. उपवासासाठी उपयुक्त असणारी तसेच एक रानभाजी म्हणून ओळख असलेली अळू हि वनस्पती. अळू कंदमूळ प्रकारात मोडणारी सुरण कुळातील बारमाही वनस्पती आहे. अळूचे पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. विदर्भ व मराठवाड्यात अळूला चमकोरा या नावाने ओळखल्या जाते. यासह धोपा, डोडा व अळू नावाने ओळखल्या जाते.
लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात. त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. अळूच्या पानांवर हरबऱ्याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. उपवासाच्या दिवशी अळूचे कंद उकडून खातात. या कंदांना ‘अळकुडी’ असे नांव आहे. अळूच्या कंदाला ‘आर्वी’ म्हणतात. भाजीचा अळू, वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे याचे तीन मुख्य प्रकार आहेत. अळूच्या पानाच्या मधोमधून पिवळे फुल येते. अळूच्या देठापासून देठी हा पदार्थ बनवला जातो. वनस्पतीचे ‘काळे’ अळू आणि ‘पांढरे’ अळू असे दोन प्रकार आहे. देठ व पानांच्या शिरा जांभळट असलेल्या जातीला ‘काळे’ अळू ; तर हेच भाग हिरवे असलेल्या जातीला ‘पांढरे’ अळू म्हणतात. याशिवाय तेरे, दुधाळू, खडकाळू, चित्राळू अश्या नावाने ओळखल्या जाते. काळे अळू हे औषधीयुक्त आहे. अळूच्या कंदात प्रामुख्याने कर्बोदके, प्रथिने, कॅल्शियम व लोह असते. पानात व देठात अ, ब, क आदी जीवनसत्त्वे आढळतात. यासह कॅरोटीन, कॅल्शियम व लोह असते. अळूपासून कर्नाटकाच्या दक्षिण तसेच उडुपी भागात पात्रोडे, केरळात चेंबिला करी आणि गुजरातमध्ये पात्रा असे पदार्थ बनविले जातात.
औषधीय उपयोग :-
स्तनदा माता साठी याचे पान उपयुक्त आहे. कीटक दंश, फोड, कमजोरी, बद्धकोष्ठता, मधुमेह, ब्लड प्रेशर, डोळ्यांची दृष्टी, पोटाची समस्या, सांधेदुखी, वजन कमी करण्यासाठी हि वनस्पती औषधासारखी काम करते. अळूच्या पानांमधील आयोडीन घटक थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. तापामुळे जीभेची चव जाते. त्यामुळे कोणतंच अन्न चवीष्ट लागत नाही, पण अळूच्या पानामुळे चव परत येते. अळूची पाने शरिरात रक्त वाढवण्यास मदत करतात. पानाचे देठ मिठाबरोबर वाटून सुजन आलेल्या गाठीवर लावल्यास आराम पडतो.