आश्चर्य …चक्क पांढरा भारद्वाज

आश्चर्य …चक्क पांढरा भारद्वाज
निसर्ग दर्पण मध्ये ऑगष्ट महिन्यात पालघर जिल्ह्यातील एका शाळेत मध्यान्ह भोजन खाणारा पांढरा कावळा बघितला होता. आता चुंचाळे गावानजिक ऑक्सिजन पार्क असणाऱ्या पांजरापोळच्या जैवविविधता क्षेत्रात पांढऱ्या रंगाच्या भारद्वाज पक्ष्याचे दर्शन झाले. भारद्वाज हा तांबूस-पिंगट रंगाची पिसे असलेला कावळ्यासारखा दिसणारा पक्षी आहे.भारद्वाज पक्षी भारत, श्रीलंका तसेच चीन ते इंडोनेशियापर्यंत सर्वत्र आढळतो. तो दाट झुडपे असलेला प्रदेश, शेते, मनुष्यवस्तीला लागून असलेली उद्याने, झाडी या ठिकाणी राहतो. भारद्वाज जास्त उंचीवर उडताना कधीच दिसत नाही, तो या झाडावरून त्या झाडावर, झुडपात लपत छपत उडताना, चालताना दिसतो.
पक्षी पांढरा का दिसतो ? :-
ल्युसिझम किंवा ल्युकिझम अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे उद्भवणारी असामान्य पिसारा स्थिती आहे, जी रंगद्रव्य, विशेषतः मेलेनिन, पक्ष्यांच्या पिसांवर योग्यरीत्या जमा होण्यापासून प्रतिबंधित करते. ल्युसिस्टिक पक्षी त्यांच्या पिसांमधील सर्व रंगद्रव्य गमावू शकतात आणि ते शुद्ध पांढरे दिसू शकतात. ल्युसिस्टिक पक्ष्यांचे डोळे, पाय सहसा रंगीत असतात. मेलेनिन हादेखील पिसांचा महत्त्वाचा संरचनात्मक घटक आहे आणि व्यापक ल्युसिझम असलेल्या पक्ष्यांना कमकुवत पंख असतात. तसेच कठोर हवामानाविरूद्ध पक्ष्यांचे काही इन्सुलेशन नष्ट होते. पंखदेखील उष्णता अधिक कार्यक्षमतेने प्रतिबिंबित करतातव्यापक ल्युसिझम असलेल्या पक्ष्यांना कमकुवत पंख असतात.
ल्युसिझम पक्ष्याच्या अडचणी :-
हा पक्षी पाहणे हे असामान्य आणि रोमांचक असू शकते. परंतु या स्थितीत असलेल्या पक्ष्यांना जंगलात विशेष आव्हानांना सामोरे जावे लागते. फिकट पिसारा संरक्षणात्मक छटा पक्ष्यांना त्रासदायक ठरू शकतो आणि त्यांना शिकारी पक्षी आणि जंगली मांजरींसारख्या भक्षकांसाठी अधिक असुरक्षित करू शकतो. विणीच्या काळात पिसारा रंग महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे, ल्युसिझम असलेल्या पक्ष्यांना मजबूत, निरोगी जोडीदार मिळू शकत नाहीत.
एका बाजूला ‘शुभ शुभ’ म्हणून भारद्वाजाला डोक्यावर घेणाऱ्या माणसाने या पक्ष्याला वाईट दिवसही पाहायला लावले होते. पूर्वी प्राचीन भारतात भारद्वाजाचे मांस खाणे, हा अनेक रोगांवरचा इलाज म्हणून सांगितले जायचे. खास करून क्षयरोग आणि फुप्फुसांच्या विकारावर ते अतिशय गुणकारी असते, असा गैरसमज होता. ब्रिटिश शिपायांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकदा तित्तर पक्षी समजून भारद्वाजला मारले होते. इंग्रजांच्या काळात भारद्वाजाची बेसुमार हत्या झाल्याची नोंद आहे.