वेबसिरीजद्वारा वाढणार चित्त्यांचे ग्लॅमर

वेबसिरीजद्वारा वाढणार चित्त्यांचे ग्लॅमर
भारतात प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत दोन वर्षापूर्वी परदेशी चित्त्यांचे आगमन झाले. मध्यप्रदेशच्या कुनोच्या जंगलात आलेला हा पाहुणा आता स्थिरावला असून लवकरच त्याच्यावर आधारित वेबसिरीज बनविली जाणार आहे. त्यामुळे भारतीय नागरिकत्व प्राप्त झालेल्या या वन्यजीवांचे आणखी ग्लॅमर वाढणार आहे.
चित्त्यांचा भारतातील पुनर्वसनाचा प्रयत्न वेब सिरीज च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीजला केंद्र सरकारकडून नुकतीच मान्यता देण्यात आली असून याचे चित्रीकरण हे सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होणार असल्याचे समोर आले आहे. 17 सप्टेंबर 2024 रोजी प्रोजेक्ट चित्ताला दोन वर्ष पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे उपमहानिरीक्षक वैभवचंद्र माथुर यांनी मध्यप्रदेशच्या मुख्य वनजीव संरक्षकांना या चित्रीकरणा संदर्भात पत्रव्यवहार केला आहे. ‘शेन फिल्म्स अँड प्लँटिंग प्रोडक्शन’ या निर्मितीगृहाला कुनो राष्ट्रीय उद्यान आणि गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात चित्रीकरणाला आठ तांत्रिक समित्यांची सशर्त मान्यता दिलेली आहे. या वेबसिरीजचे प्रसारण तब्बल १७० देशात डिस्कवरी नेटवर्कच्या माध्यमातून केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी करण्यात आलेली पूर्वतयारी, या प्रकल्पाची व्याप्ती तसेच भविष्यातील भारतातील उद्दिष्टे याबाबतचे बारकावे या माध्यमातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
‘प्रोजेक्ट चित्ता’ प्रकल्पासाठी भारताने नेमकी किती मेहनत घेतली आहे हे जगाला समजावे याकरिता हि वेबसिरीज तयार केली जात आहे. भारतात सप्टेंबर 2022 मध्ये नामीबियातून आठ आणि 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात आणण्यात आले होते. चार भागात या वेबसिरीजचे प्रसारण केले जाणार आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात स्थलांतर करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला. भारतात स्थिरस्थावर होत असताना कोणत्या अडचणी आल्या शिवाय त्या अडचणीवर कशी मात करण्यात आली आदींचे चित्रण या माधमातून दाखविले जाणार आहे. एकीकडे वेबसिरीजची चर्चा होत आहे तर दुसरीकडे प्रोजेक्ट चित्तासमोर सध्या अनेक आव्हाने निर्माण झाली असतानाच या वेब सिरीजच्या निर्मितीची घाई कशासाठी केली जात आहे असल्याचा सवाल भोपाळ येथील काही वन्यजीव अभ्यासकांनी केला आहे. वेबसिरीजनंतर भारतात वाघानंतर चित्यांचे प्रस्थ वाढणार आहे. ताडोबा प्रमाणे कुनो जंगलातील चित्त्यांच्या स्वतंत्र यु ट्यूब स्टोरी निसर्ग प्रेमींकडून तयार होईल यात अजिबात शंका नाही.