चारोळी (Buchanania cochinchinensis)

चारोळी (Buchanania cochinchinensis)
अक्षय तृतीया या सणाला कैरीचे पन्ह केल्या जाते. यात मुख्यत्वे चारोळीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. चार(चारोळी) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची फळे पिकल्यावर काळ्या रंगाची होतात. ती गोड लागतात. याच्या फळात एक कठीण कवच असते. ती फोडली असता त्यातुन निघालेल्या बीला चारोळी म्हणतात.
चार, चिरंजी, चारोळी, राजदाणा, तपसप्रिय इत्यादी नावांनी ओळखले जाणारे हे झाड काजू कुळातील असून अतिशय काटक आहे. हे झाड 20 ते 40 फूट उंच वाढते. खोडाची साल जाड, करडी, भेगाळलेली व खरबरीत असून मगरीच्या पाठीप्रमाणे दिसते. पाने साधी, जाड, एकाआड एक व लंबगोल असून टोक गोलसर असते. चारोळीची फळे करवंदाएवढी गोल असतात. फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर काळी होतात. फळांचा गर गोड असून आत कठीण कवच असते. कवचाच्या आत गोडंबी असते. ह्या बियांनाच चारोळी म्हणतात. बिया गोल, चपट्या, नरम व चवीला काजूप्रमाणे लागतात. त्या बियांत तेल असते. बियांनाच चारोळी व झाडाला चार म्हणतात. भारतातील विविध राज्यांत जंगलामध्ये आणि डोंगराळ भागात चारोळीची झाडे आढळून येतात. नुकतेच पेंच च्या जंगलात भटकंती दरम्यान हि झाडे बघण्याचा योग आला.
महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात चारोळी लोकप्रिय असून चारोळीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. चारोळी (बिया) मेंदू व शरीरास पौष्टिक असतात. वेगवेगळ्या मेवामिठाईंत चारोळ्या मिसळतात. त्यामुळे मिठाईची चव वाढते. फळे व पाने त्वचारोगावर उपयुक्त आहेत. याची फळे खोकला व अस्थमा वर उपयुक्त ठरतात. काही आदिवासी भागांत गरांच्या भुकटीचा लेप चेहऱ्याला लावतात. सालीतून पाझरणारा डिंक बद्धकोष्ठता निर्माण करणारा असल्यामुळे अतिसारावर वापरतात. चारोळीची फळे भारतातील काही आदिवासी राज्यांमध्ये कच्ची खाल्ली जातात. फळे, तोंडी घेतल्यास, शीतलक प्रभावामुळे तहान कमी होते आणि तोंडी स्वच्छता राखण्यास मदत होते. डोळ्यांतील जळजळ, खोकला आणि ताप यांवरही हे फळ फायदेशीर आहे.