वाऱ्याच्या दिंडीत सेवानिवृत्तांची अनोखी सेवा
21 दिवसाच्या वारीत ज्येष्ठांच्या ऊर्जेचे कौतुक

वाऱ्याच्या दिंडीत सेवानिवृत्तांची अनोखी सेवा
21 दिवसाच्या वारीत ज्येष्ठांच्या ऊर्जेचे कौतुक
मांजरखेड कसबा(अमरावती) येथील श्री संत चंदाजी महाराज यांची कुऱ्हा ते पंढरपूर दरम्यान दरवर्षी हभप भास्कर पिंपळे महाराज यांचे नेतृत्वात पायदळ दिंडी काढण्यात येते. यावर्षी या दिंडीचे 245 वे वर्ष असून ही दिंडी केवळ 21 दिवसात तब्बल सव्वा सहाशे किलोमिटर अंतर पार करते. राज्यात सर्वात वेगवान दिंडी असल्याने ही ‘ वाऱ्याची दिंडी ‘ म्हणून सूपरिचित आहे. दिंडीत यावर्षी एकूण 180 वारकरी असून यात तब्बल 65 ज्येष्ठांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दिंडीत ज्येष्ठ लोकांमध्ये सेवानिवृत्त लोकांची ऊर्जा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
2007 पासून या दिंडीत विनायकराव दखणे हे सुरतचे कपडा व्यावसायिक पायी वारी करायला लागले तेंव्हापासून या दिंडीतील रौनक वाढली आहे. त्यांनी गाडी सुविधा उपलब्ध केल्याने संपूर्ण वारकऱ्यांचे खांद्यावरील ओझे कमी झाले. यासह गरजूंना साड्या, कपडे, चपला, औषधी फराळ सुविधा उपलब्ध करून दिली. स्वतः त्यांचे वय व स्थूलपणाने चालता येत नाही. पण वारीत तन, मन व धन ओतून भाविकांची सेवा करतात. दिंडीत पायी चालणाऱ्याना त्रास होणाऱ्या भाविकांना श्री दखणे वाहन सुविधा उपलब्ध करतात. त्यांच्या वारीतील सक्रिय सहभागामुळे विनायक दात्रे(भोपाळ), मधुकर कोठेकर (अहमदाबाद), सेवानिवृत्त प्राचार्य प्रमोद रोकडे, प्रकाश मिसाळ (आर्वी), सुरेश सरोदे, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश ढोरे, रवी नाकाडे, किशोर बकाले आदीं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला आहे.
युवकांची स्फूर्ती लाजवाब :-
या दिंडीत मांजरखेड व किन्ही रोकडे गावांतील युवकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश राहतो. ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनात 35 युवक सुध्दा मागे राहत नाही. सकाळी साडे तीन रात्री 9 पर्यंत सतत क्रियाशील राहत वारकऱ्यांच्या नाश्ता,भोजन, व मुक्कामाच्या ठिकाणची सोय करणे ही युवकांची जबाबदारी. सचिन खोंडे व हरीश रोकडे हे युवक संपूर्ण प्रवास दरम्यान थंड आर ओ पाण्याची सुविधा उपलब्ध करून देतात.
पर्यावरण पूरक दिंडी.:
यावर्षी दिंडीत स्टील प्लेट, चमच, ग्लासचा समावेश केल्याने रस्त्याने होणारा कचरा नियंत्रित केला आहे. शिवाय सुरुवातीला या सर्व साहित्यासाठी अनामत रक्कम म्हणून शंभर रुपये आकारल्याने वस्तू शंभर टक्के काळजीने परत केल्या जात असल्याचे स्वयंसेवक संजय मुळे ह्यांनी सांगितले.त्यामुळे मुक्काम दरम्यान कोणत्याही गावात कचरा निर्माण होत नाही.
दिंडीतील उर्जाशिल डॉक्टर :
चंदाजी महाराज संस्थान दिंडीत अहमदाबादचे 83 वर्षीय प्रभाकरराव पारवे हे दिंडीत ‘डॉक्टर ‘ म्हणून सर्वांना परिचित आहे. पूर्वी अमरनाथ, वैष्णोदेवी येथे मित्रांसह पर्यटनाला जाणारे श्री पारवे अचानक 2007 पासून कुऱ्हा ते पंढरपूर दिंडीचे सदस्य झाले. गत 18 वर्षापासून ते दिंडीतील वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात. प्रत्येक गावात दिंडी पोहचतात सर्वात तत्परतेने गरजूंना मलमपट्टी करणे, ग्लुकोज, छोट्या आजारांवरील जुजबी औषधोपचार ते करतात. विशेष म्हणजे स्वखर्चातून सर्वांना औषधोपचार करतात.

अहमदाबाद येथील मधुकर कोठेकर यांचे टेलरिंग शॉप असून मुलगा व सून कॅनडा येथे नोकरी करतात. ते पाच सहा वर्षांपासून वारीशी जुडले आहे. प्रमोद रोडगे हे शिवाजीराव जोंधळे कॉलेज ऑफ इंजनिअरिंग, डोंबिवली येथून प्राचार्य पदाहून एप्रिल 2025 मध्ये सेवानिवृत्त झाले आहे. सेवानिवृत्ती नंतर एक तरी वारी करायची इच्छा असल्याने त्यांनी निवृत्ती नंतर दोन महिन्याच्या आत आपली मनातील इच्छा पूर्ण केली.
प्रकाश मिसाळ (आर्वी ) – हे सुध्दा 2008 पासून या वारिशी जुळले आहे. वैद्यकीय सेवेतील निवृत्ती नंतर ते वारीत रमले. दरवर्षी वारीला अन्नदान करतात. त्यांचे म्हणणे आहे माझ्या मृत्यूनंतर सुध्दा 20 वर्ष जेवण त्यांचे कडून राहील. त्यांचे सोबत सुरेश सरोदे, डॉ. दिनेश ढोरे ( सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी), रवी नाकाडे ( सेवा निवृत्त वाहक एस टी महामंडळ) ही मंडळी वर्धा जिल्ह्यातील रहिवासी. दिंडी निघण्याच्या तीन दिवस पूर्वी घर ते कूऱ्हा पर्यंत पायदळ वारी सुरुवात करतात.
विनायक दात्रे यांचे भोपाळ येथे पूजा सामग्रीचे दुकान आहे. त्यांची पत्नी क्लास वन अधिकारी आहे. एक मुलगी बँकेत नोकरीला, एक मुलगा कॅनडा, दुसरा अमेरिकात आहे. श्री पारवे यांनी त्यांना पंढरपूर साठी प्रोत्साहित केले. वारीत चालल्याने पायाला दुखापत झाली पण लंगडत लंगडत त्यांनी चौथी वारी पूर्ण केलीच.
किशोर बकाले हे सेवानिवृत्त शिक्षक असून एका शिक्षण संस्थेचे संचालक आहे. गत सोळा वर्षापासून ते दिंडी चालकाच्या खांद्याला खांदा लावून दिंडीचा भार उचलतात. अनेक जण दिंडीच्या पुढे राहतात पण किशोर बकाले हे कोणी सुटू नये किंवा कोणाला अडचण असल्यास त्याचे निराकरण करतात. हभप.श्री भास्कर महाराज पिंपळे हे दिंडी चालक तर त्यांचे मित्र श्री बकाले हे रेल्वेच्या गार्ड प्रमाणे ही दिंडी सांभाळतात.