झाड चक्क सीसीटीव्हीच्या नजरकैदेत
आज पर्यंत बँक, कार्यालय किंवा महागड्या घरांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले अनेकांनी बघितले आहे पण एका वृक्षासाठी एक दोन नव्हे तर चक्क आठ कॅमेरे बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वृक्षाच्या सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्याचे कुंपणसुद्धा आहे. हे साधेसुधे वृक्ष नाही तर या वृक्षांसोबत अनेकांचे भावनिक नाते जुडले आहे. बोधिचित्त हे त्याचे नाव. ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नामस्मरणासाठी तुळसीची माला जपली जाते त्याचप्रमाणे बौद्ध धर्मात विपश्यना दरम्यान मनाच्या एकग्रेसाठी साठी माळ जपली जाते. हि माळ बोधिचित्त या वृक्षाच्या बियांपासून बनविली जाते, त्यामुळे बोधिचित्त वृक्षाचं बौद्ध धर्मात मोठं महत्त्वं आहे.
नेपाळच्या कावरेपालनचोक जिल्ह्यातील टेमल आणि रोशी भागात मोठ्या प्रमाणावर बोधिचित्त वृक्ष आढळतात. पूर्वी या वृक्षाला फारशी किंमत नव्हती परंतु गत 15 वर्षात चीनमधील व्यापाऱ्यांची या वृक्षाला मागणी वाढल्याने नेपाळ मध्ये याला प्रचंड महत्व आले आहे. येथील दिल बहादूर तमांग या व्यक्तीकडील एका वृक्षांच्या बियांसाठी तब्बल 90 लाख रुपये येथील व्यापाराने मोजले. शिवाय स्थानिक व्यापाराने त्यावर प्रक्रिया करून ते चीनच्या व्यापाऱ्यांना तब्बल 3 कोटी रुपयांना विकले असल्याची घटना समोर आली आहे. या मागणीमुळे मोलमजुरी करणाऱ्या दिल बहादूर यांची आर्थिक परिस्थिती पालटली. या वृक्षामुळे घरची परिस्थिती बदलल्याने शिवाय याला मागणी वाढल्याने दिल बहादूर यांनी बोधिचित्तभोवती लोखंडी जाळीसह कॅमेरे बसविले होते. काही दिवसा अगोदर त्यांच्याकडील ह्या वृक्षावर 15 ते 20 बंधुकधारी दरोडेखोरांनी घरावर हल्ला चढवत चक्क हे झाडच कापून नेल्याची घटना समोर आली आहे.
बोधिचित्त वृक्षाला पोलिसांचा खडा पहारा
या घटनेने परिसरात ज्यांच्याकडे बोधी वृक्ष आहे त्यांचे धाबे दणाणले आहे. अनेकांनी तर या वृक्षाच्या संरक्षणासाठी लोखंडी जाळीसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. शिवाय या भागात पोलिसांची गस्त देखील वाढली आहे. बियाण्यांच्या हंगामाच्या वेळी या वृक्षाला पोलीस संरक्षण पुरविण्याची हमी स्थानिक पोलिसांनी दिली आहे.