मेळघाटात चक्क दाढीवाला आंबा
मेळघाटात चक्क दाढीवाला आंबा
माणसाचे वय पन्नासच्यावर झाले कि त्याची दाढी पांढरी होते हे सर्वाना माहिती आहे, पण तुम्ही वनस्पतीला पांढरी दाढी फुटल्याचे बघितले किंवा ऐकले आहे का ? चिखलदरा तालुक्यातील आमझरी परिसरात एका वृद्ध आंब्याच्या वरच्या फांद्यावर भली मोठी दाढी उगवलेली आहे. त्यामुळे या परिसरातील हा दाढीवाला आंबा चांगलाच चर्चेत आला आहे.
निसर्ग दर्पण ने २०२४ च्या पहिल्या अंकात मेळघाटातील हतरु परिसरातील सिपना पटेल या सागाची माहिती दिल्यानंतर अनेकांनी या वृक्षाबद्दल विचारणा केली. त्यांनतर आता हा दाढीवाला आंबा चर्चेत येणे म्हणजे वाचकांसाठी एक पर्वणी आहे. या आंब्याच्या दाढीबाबत पर्यावरण व वनस्पती तज्ञ प्रा.डॉ.सचिन तिप्पट सर व संपूर्ण भारताला जे ग्रासमॅन म्हणून सुपरिचित आहे ते प्रा.डॉ.गजानन मुरतकर सर यांचेशी चर्चा केली असता त्यांनी यामागील शास्त्रीय कारण सांगितले. निसर्गात अपी वनस्पती ( epiphyte) असतात जे दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर किंवा फांदीवर वाढतात. आपले अन्न व पाणी आधारभूत वनस्पतीच्या शरीरातून किंवा मुळांद्वारे जमिनीतून शोषून न घेता स्वतंत्रपणे मिळवून ते आपला जीवनक्रम चालवतात. म्हणजे एकप्रकारे ते केवळ त्या झाडावरचे भाडेकरूप्रमाणे निवास करतात. पक्ष्यांच्या विष्ठेतून ते आधारभूत वनस्पती स्थान मिळवतात. अपिवनस्पती हवेतील नायट्रोजन स्थिरीकरण करून तयार झालेली नत्रयुक्त संयुगे आश्रयी वनस्पतींना देतात त्यामुळे दोन्ही वनस्पतीचा फायदा होतो. निसर्गातील सहजीवनाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. ह्या वनस्पती वरच्या भागात वाढत असल्याने जमिनीवरील प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण होते शिवाय भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि जमिनीवर वाढण्यासाठी ईतर वनस्पतीशी स्पर्धा करावी लागत नाही.
चिखलदऱ्यात मिळणार नैसर्गिक सफर
विदर्भातील नंदनवन म्हणून सुपरिचित असलेले चिखलदरा भागात लवकरच इको टुरिझम विकसित होणार असून चिखलदरा व लगत असलेल्या आमझरी, खटकाली सारख्या भागात गाईड द्वारा नैसर्गिक सफर करायला मिळणार आहे. यापूर्वी गाडीतून केवळ फेरफटका मारायला मिळत होता मात्र पुढे या भागातील वनौषधी वनस्पती, कॉफीमळे, फळभाजी सह टेंट चा अनुभव घेता येणार आहे. आमझरी, पोपटखेडा, खटकाली, लॉंग पॉइंट येथील भागात टेंट मध्ये रात्रीला चांद ताऱ्यांची सफर अनुभवाला मिळणार आहे. यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे. चिखलदरा परिसरात स्कायवाक निर्माण झाल्यावर या भागातील पर्यटनाचा चेहरामोहरा बदलणार आहे