देखणा स्वर्गीय नर्तक ( Asian Paradise-flycatcher)
देखणा स्वर्गीय नर्तक ( Asian Paradise-flycatcher)
हा भारतातील जंगलात आढळणारा अतिशय सुंदर पक्षी आहे. या पक्ष्याच्या नराला लांब शेपूट येते त्यामुळे तो अतिशय देखणा दिसतो. पूर्ण वाढ झालेला नर हा पांढऱ्या रंगाचा असतो. नवतरुण नर आणि मादी लाल रंगाची असते. नावाप्रमाणेच ते जंगलात कायम हवेत उड्या मारून, सूर मारून, पटकन हवेतल्या हवेत कोलांट्या मारत माश्या, किटक, फुलपाखरे पकडत असतात. हा पक्षी भारतात सर्वत्र सहज आढळतो. दाट जंगलांमधे थोड्या उघड्यावर, पाण्याच्या आजूबाजूला यांची वर्दळ कायम असते. यांचा विणीचा हंगाम साधारणत: मार्च ते जुलै महिन्यात असतो. मध्यप्रदेश राज्याचा हा ‘राज्यपक्षी’ आहे. त्याला हिंदीमध्ये ‘दूधराज’ आणि सुल्ताना बुलबुल अशी नावे आहेत.
स्वर्गीय नर्तक हा बुलबुलच्या आकारमानाचा असतो. त्याचे डोके काळ्या रंगाचे असते. युवा नराचा रंग मात्र तांबूस असतो. मादी तांबूस रंगाची असून, तिचे डोके काळ्या रंगाचे असते. दोघांच्या डोक्यावर लहानसा तुरा असतो. विशेष म्हणजे नराला जवळपास फुटभर लांबीची शेपटी असते. स्वर्गीय नर्तक संपूर्ण भारतात आढळत असून यांच्या दोन उपजाती भारतात तर एक उपजात श्रीलंकेत आढळते. दरवर्षी जून महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यांची असंख्य घरटी सहज दृष्टीस पडतात. या कालावधीत ते पन्हाळा परिसरात स्थलांतर करून येतात.
हे पक्षी घरट्याची जागा जिवापाड जपतात. या काळात ते मादीला खास शिळ घालून आळवतात. अर्थात या कामी त्यांची आकर्षक लांब शेपटीसुद्धा कामी येते. नर मादीची जोडी जमल्यावर दोघे मिळून घरटे बांधतात. हे घरटे सहसा जमिनीपासून 6 ते 8 फुटांवर बांधले जाते. दोन तीन काटक्यांमधे उभा कपसारखा घट्ट विणीव गोल बांधला जातो. या घरट्याला मुलायमपणा येण्यासाठी कोळ्याच्या जाळ्याचे तंतू, रेषमासारखे धागे वापरले जातात. मादी त्यात 3 ते 5 गुलबट अंडी घालते. ही अंडी उबवण्याचे आणि पिल्लांचे पालनपोषण दोघेही नर मादी करतात.