बहुगुणी बिब्बा

बहुगुणी बिब्बा Semecarpus anacardium
बिब्बा तसा लहानपणापासून परिचित होता, बाबा अनेकदा वेगवेगळ्या कामासाठी त्याचा वापर करायचे, पण बिब्ब्याचे झाड पाहण्याचा योग गत आठवड्यात मेळघाट भ्रमंती दरम्यान आला. बिब्बा वनस्पतीला भिलावा, बिबवा, भल्लातक, आरूष्कर, इंग्रजीमध्ये मार्किंग नट ट्री असेही बोलल्या जाते.
बिब्याचे वृक्ष मोठे असून पाने मोठी असतात. बिब्ब्याचा फळाचा देठ मोठा होऊन काजूच्या बोंडाप्रमाणे दिसतो. सुकलेल्या बोंडास बिबुट्या किंवा बिंपटी म्हणतात. ती पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. बिब्ब्यातील गरास गोडांब्या म्हणतात. औषधात बिपर्टी, गोडांब्या व बिब्बे वापरतात. बिब्ब्याच्या वरच्या भागात अत्यंत दाहक पण विलक्षण गुणकारी तेल असते. ते खूप दाहजनक आहे. बिब्याच्या आतल्या बीमध्ये असलेल्या गोडांबीत खूप पौष्टिक द्रव्य आहेत. बिब्बा हा कटाक्षाने उष्ण प्रकृतीकरिता कदापि वापरू नये. बिब्ब्याचे औषध घेत असताना कटाक्षाने तूप योग्य प्रमाणात घेतले, तर बिब्बा चांगला मानवतो.
बिब्बा दाभणास टोचून गोड्या तेलाच्या दिव्यावर धरल्याने जी पेटलेल्या तेलाची टिपे पडतात, त्यास बिब्ब्याची फुले म्हणतात. ही टिपे दुधात धरून हळद व खडीसाखर मिसळून पिण्यास देतात. प्रारंभी एक फूल व मग दोन-चार दिवसांनी दोन फुले रात्री निजताना देतात. हा प्रकार फुफ्फुसाच्या रोगात देतात. दम्यात याने फार चांगला गुण येतो. एखाद्या रुग्णाला डोक्यात चाई झालेल्या भागाचे बाजूला सभोवताली भरपूर तूप लावून, चाई असलेल्या भागास, बिब्ब्याचे तेल लावल्यास दोन चार दिवसांत खात्रीने नवीन केस येतात. ज्या मंडळींना संडासला चिकट होते त्यांनी मिठाचे पथ्यपाणी पाळून भल्लातकहरितकी चूर्ण रात्री घ्यावे. ज्यांना कायम दूषित पाणी नाइलाजाने प्यावे लागते, त्यांना भोजनोत्तर भल्लतकासव घ्यावे. पावसाळ्यात खराब पाणी नाइलाजाने प्यावे लागल्यास; बिब्बा हे घटकद्रव्य असलेल्या संजीवनी गोळ्या भोजनोत्तर घ्याव्यात.
टीप : कृपया कोणत्याही वनस्पतीचा उपयोग औषध म्हणून करतांना वैद्याचा सल्ला घ्यावा.