आठ क्विंटलच्या गंजात शिजतेय लाखों भाविकांची ‘खीर ‘
पंढरपुरात कर्नाटकच्या दानेश्र्वर महाराजांची अनोखी विठ्ठलभक्ती

आठ क्विंटलच्या गंजात शिजतेय लाखों भाविकांची ‘खीर ‘
पंढरपुरात कर्नाटकच्या दानेश्र्वर महाराजांची अनोखी विठ्ठलभक्ती
श्री क्षेत्र पंढरपूर :-
सांगा मी काय करू…भक्ती करू की पोट भरू.., कांदा मुळा भाजी…अवघी विठाई माझी..अश्या नानाविध भक्तीगीतद्वारे पंढरपूर सध्या भक्तिमय झाले आहे. पंढरीत कोणी आरोग्यसेवा, कोणी तृष्णातृप्ती, कोणी चपला शिवून देतोय ..व्यक्तीनुरुप भक्तीमार्ग वेगळे असले तरी सर्वांचा उद्देश एकच…विठ्ठलभक्ती. रकवी वनहट्टी (कर्नाटक) येथील चक्रवर्ती दानेश्वर महाराज आषाढी दरम्यान लाखो भाविकांना अन्नदान करून गत अनेक वर्षापासून भाविकांची अनोख्या पद्धतीने विठ्ठल भक्ती करत आहे.
दरवर्षी पंढरपूर आषाढी महोत्सव दरम्यान श्री बसवगोपाल नीलगणीपिठ बंडीगणीमठाचे दासोहरत्न चक्रवर्ती दानेश्वर महाराज यांचे सानिध्यात आठ दिवस भाविकांसाठी अन्नदान केले जाते. यावर्षी दिनांक १ जुलै ते ७ जुलै २०२५ दरम्यान हे अन्नशिबिर सुरू आहे. सुरुवातीच्या दिवसात वीस ते पंचवीस हजार भाविक अन्नग्रहण करतात. चौथ्या पाचव्या दिवशी हा आकडा लाखाच्यावर जातो. भाविकांसाठी इथे दोन वेळेस चहा, भोजन व एक वेळेस नाश्ता तयार करण्यात येतो. हे अन्नदान बनविण्यासाठी सुमारे बाराशे सेवेकऱ्यांचा समावेश असून यात सहाशे पुरुष, सहाशे महिला आहे. विशेष म्हणजे या अन्नयज्ञात साडे चारशे युवक युवती सेवा देत आहे. श्री क्षेत्र पंढरपूरसह महाराष्ट्रात तुळजापूर, हुलजयंती (मंगल वेढा), आंध्रप्रदेश मधील श्री शैलंम, घुड्डापुर, कर्नाटक मधील महानंदी , सोंटूर येथेही मोठ्या प्रमाणावर लाखो भाविकांना अन्नदान केले जाते.
आठ क्विंटलच्या गंजात शिजतेय खीर :
लाखो भाविकांना वेळेवर अन्नदान करण्यासाठी कमी वेळेस जास्तीत जास्त अन्न शिजवावे लागते. खीर पदार्थ बनविण्यासाठी तब्बल 8 क्विंटलचा गंज वापरला जातो. याशिवाय 4 क्विंटल, 2 क्विंटल व छोट्या आकारांच्या गंजात ईतर भाजी, आमटी बनविल्या जाते. सर्व स्वयंपाक हा गॅस व लाकडाच्या विस्तवावर शिकवला जातो. याकरिता 3 ट्रॅक्टर लाकूड येथे संकलित केले आहे.

अन्नदानात नेमके काय ?
पंढरपूर येथे आठ दिवसात चालणाऱ्या अन्नदान छत्रात सकाळी सहाला चहा, बिस्कीट, टोष्ट दिल्या जातो तर सकाळी सात वाजता नाश्त्यात मसाला खिचडी, खीर , शिरा बुंदी हे पदार्थ राहतात. जेवणामध्ये पोळी, पुरी, भाजी,भात, आमटी पुरणपोळी, खीर, सांजेची पोळी व विविध गोड पदार्थचा समावेश राहतो. याकरिता कर्नाटक येथून 3 ट्रक किराणा साहित्य आणले असून यात 1 टन तांदूळ, 30 क्विंटल साखर, 20 क्विंटल गहू, डाळ, चोवीसशे किलो गूळ व ईतर साहित्याचा समावेश आहे. गरजेनुसार स्थानिक भागातून साहित्य खरेदी केल्या जात असल्याचे सेवेकरी रामा चौगुले यांनी सांगितले.