
महाराष्ट्रात होणार अनोखी आयडॉल बँक
या बँकेत पैसे नव्हे तर…..
या आठवड्यात चक्क धावत्या रेल्वेत बँकेचे एटीएम मशीन सुरु झाल्याचे वृत्त आपण वाचले. आता तर महाराष्ट्रात आणखी एक बँक तयार होणार आहे. हि बँक महाराष्ट्र सरकार स्वतः उभारणार असून या बँकेत पैसेचे नव्हे तर चक्क आदर्श गुणांचे क्रेडीट व डेबिट होणार आहे. विशेष म्हणजे आयुक्त, जिल्हाधिकारी सारखे भाप्रसे अधिकारी या बँकेचे ऑडीट प्रमुख म्हणून काम करणार आहे. चला तर हि बँक कोठे असणार व बँकेचे क्रेडीट व डेबिट कसे होणार ते जाणून घेऊया.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बँक नावाने एक नवीन शासन निर्णय निर्गमित केला आहे. यामध्ये शाळा व वर्ग स्तरावर आदर्श व गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या शाळा व आदर्श काम करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे आयडॉल शिक्षक व शाळांची निवड करण्यासाठी तालुका ते राज्यस्तरावर समिती स्थापन केली जाणार आहे. तालुकास्तरीय समिती प्रमुख गटशिक्षणाधिकारी, जिल्हास्तरीय समिती प्रमुख जिल्हाधिकारी तर राज्यस्तरीय समिती प्रमुख म्हणून शिक्षण आयुक्त हे राहणार आहे.

बँकेत भांडवल काय ?
या आयडॉल बँकेत भांडवल स्वरुपात नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, स्कॉफ, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, स्पर्धा परीक्षा, समाज सहभाग, अध्ययन निष्पत्ती, शिक्षकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य, अतिरिक्त पूरक वाचन, स्वच्छता, परसबाग, वृक्षसंवर्धन, संगणकीकरण, शाळा व्यवस्थापन समिती, प्रशिक्षण शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार, विद्यार्थी उपस्थिती, पालक जनजागृती आदींवर भर राहणार आहे. आयडॉल शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीच्या उच्चतम कामगिरीच्या ठेवीवर सर्वाधिक 60 टक्के व्याज मिळणार आहे. तर शाळांना मुख्यंमत्री माझी शाळा, सुंदर शाळा व स्कॉफ या ठेवीवर सर्वाधिक 20 टक्के व्याज परतावा मिळणार आहे.
आयएसएस करणार सोशल ऑडीट
राज्यस्तरावर शाळा व शिक्षकांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे.यात आयुक्त (शिक्षण) हे समिती प्रमुख तर शिक्षण संचालक (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे) हे उप प्रमुख, संचालक प्राथमिक / माध्यमिक शिक्षण तज्ञ, उपसंचालक (एससीइआरटी) व सचिव म्हणून सहसंचालक (एससीइआरटी) समिती मध्ये सहभागी असणार आहे. जिल्हा स्तरीय समिती मध्ये सुद्धा दोन भाप्रसे अधिकारी या समितीत असून जिल्हाधिकारी हे समिती प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी उपप्रमुख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण तज्ञ व जेष्ठ अधिव्याखाता हे सचिव म्हणून काम बघणार आहे. तालुका स्तरीय समिती मध्ये गटशिक्षणाधिकारी हे प्रमुख तर, अधिव्याखाता, शिक्षण तज्ञ, केंद्र प्रमुख तर सचिव म्हणून विस्तार अधिकारी हे समितीत सहभागी असणार आहे.(बाहेरील चर्चेनुसार समिती प्रमुख म्हणून तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी हे समिती प्रमुख म्हणून बदल संभवू शकतो) ह्या समिती मार्फत शाळा व शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण कामाचे ऑडीट केल्या जाणार असून वरील विषयानुरूप त्यांचे खातेवर गुणांचे क्रेडीट किंवा डेबिट केल्या जाईल.
ऑडीट नंतर बक्षीस काय ?
विविध स्तरावर आयडॉल शिक्षक तथा शाळांचे मूल्यमापन झाल्यावर या आयडॉल शिक्षकांच्या सक्सेस स्टोरी ह्या शब्द व चित्रीकरणाच्या माध्यमातून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संकेतस्थळ तथा विविध कार्यक्रमातून (उदा.शिक्षण परिषद,प्रशिक्षण) शब्द, चित्र, तथा विविध माध्यमाद्वारा प्रकाशित व प्रसारित केले
जाणार आहे.