सोनेरी महाल – नैसर्गिक प्रतिबिंब
सोनेरी महाल – नैसर्गिक प्रतिबिंब
छत्रपती संभाजीनगर येथील बिबी का मकबरा बघत असताना लगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात निसर्गाच्या कुशीत ऐतिहासिक सोनेरी महाल असल्याचे कळाले. या महालचे बांधकाम साधारण इ.स. १६५१ ते १६५३ च्या दरम्यानचे आहे. सोनेरी महालाचे प्रवेशद्वार (हाथीखाना) ही एक भारदस्त वास्तू असून तिला कमानीयुक्त सुरक्षा भिंत आहे. सोनेरी महालाची वास्तूही आयताकृती आणि दुमजली असून उंच चौथऱ्यावर आहे. इमारतीस भव्य संतुलित नक्षीदार कमानी, कमानीतून उत्तम प्रकारची प्रकाश योजना व मध्यभागी मुख्य वास्तू अशी रचना केली आहे. संपूर्ण वास्तूचे बांधकाम हे दगड, लाखोरी विटा व चुन्यातील आहे. सोनेरी महाल हे राजपूत व मुघल यांच्या संमिश्र स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे. सोनेरी महाल येथील चित्रांमध्ये निसर्गाचे वास्तविक प्रतिबिंब साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या महालात एकूण सात दालन असून त्याची माहिती पुढीलप्रमाणे
1 चित्र दालन :- महालात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला ही आकर्षक गॅलरी बघायला मिळते. यात एकूण 27 चित्रे असून काही लाकडावर, काचांवर व कपड्यावर बनविलेली आहे. रामायणकाल, महाभारतकाल व इतर काळातील रेखाटलेली सुंदर चित्रे हे येथील प्रमुख आकर्षण आहे.
2 संकीर्ण पुरावशेष दालन :- यादव कालीन व प्राचीन कालीन देव- देवतांचे दगडाचे, तांब्याचे पासून बनविलेल्या पत्राचे अवशष येथे बघायला मिळते. जैन मुनिश्वर, शिव-पार्वती आदींचे मूर्तीसह पूजा अर्चना करणारे भांडे, वैजापूर येथे उत्खननात सापडलेले काही मातीच्या भांड्यांचे अवशेष येथे बघायला मिळतात.
3 दरबार सभामंडप :- सोनेरी महालाचे विशेष आकर्षण म्हणजे दरबार सभामंडप आहे. येथे सोन्याच्या पाण्यापासून तयार केलेले आकर्षक चित्रे बघायला मिळते. यावरून या महालाला सोनेरी महाल असे नाव पडले. विशेष म्हणजे येथील नक्षिकामात निसर्गाचे प्रतिबिंब बघायला मिळते. मुघल कालीन चित्रे ही पाने, फुले, झाडे यांनी युक्त असतात. गुलाब व लिली या फुलांची चित्रे उत्कृष्टपणे रेखाटलेली आहेत. चित्रांमध्ये तपकीरी लाल, निळा, हिरवा, जांभळा, पांढरा व सोनेरी अशा भडक व चकाकणाऱ्या रंगाचा वापर केलेला दिसतो. भडक सोनेरी रंगासाठी सोन्याच्या पाण्याचा वापर रंगात केल्याने ते अधिक आकर्षक दिसतात.
4 सातवाहन दालन :– धाराशिव, पैठण येथील उत्खनन दरम्यान सापडलेल्या सातवाहन कालीन मातीच्या मूर्ती, बांगड्या, नाणी, मातीचे भांडे, वेशभूषा केलेल्या मूर्ती, शाडू पासून बनविलेले मुखवटे, दगडाचे जाते या दालनात बघायला मिळते.
5 धातुमूर्ती दालन : प्राचीन व अतिप्राचीन काळातील तांबे, पितळ पासून बनविलेले तीन व पाच मुखवटे असलेले देवतांच्या मूर्ती, अन्नपूर्णा देवता, गणपती, गजलक्ष्मी, जैन तिर्थकर, राम, सीता हनुमान व ईतर देवतांच्या मूर्ती येथे बघायला मिळतात.
6 मुर्तीशिल्प दालन : विविध देवी देवतांचे अवतार, विष्णू, गोविंदा, शिव पार्वती, ब्रम्हा, रंभा, चामुंडा देवी व ईतर रेखीव व कोरीव काम केलेले शिल्प बघायला मिळते. लाकडाचा कोरीव देव्हारा बघताना तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल.
7 शस्त्रास्त्र दालन : यात विविध आकाराच्या बंदूक, तोफ, तोफगोळे बघायला मिळतात. याशिवाय हा परिसर निसर्गाच्या कुशीत वसल्याने येथील निसर्ग सौंदर्य तुम्हाला निश्चित आकर्षित करेल. येथून थोड्याच अंतरावर बुद्ध लेणी बघायला मिळतात.