इकोफ्रेंडली शून्यता इको हॉटेल
इकोफ्रेंडली शून्यता इको हॉटेल
कर्नाटक राज्यात एक हॉटेल असे आहे जिथे ना एसी आहे ना इलेक्ट्रिसिटी तरी पण हे हॉटेल देशातील सर्वोत्तम हॉटेलमध्ये गणल्या जाते. कर्नाटक मधील चिकमगलूर येथे ‘शुन्यता इको हॉटेल’ या नावाने हे हॉटेल सर्वत्र सुपरिचित आहे. लोकेश गुंजूगनुर या युवा व्यावसायिकाने या हॉटेलची निर्मिती केली. इकोफ्रेंडली व स्वयं शाश्वत असावे या उद्देशातून याची निर्मिती करण्यात आली. हॉटेलला लागणारे बांधकाम साहित्य सर्व स्थानिक भागात उपलब्ध असलेल्या कच्च्या साहित्यातून निर्माण केले आहे. बांधकामसाठी लागणाऱ्या विटा त्यांच्या शेतातील मातीतून बनविल्या आहे. बांधकाम करताना दगड, 10 टक्के सिमेंट, गुळ व चुन्याचा वापर केला आहे. सोलर एनर्जी सारख्या पारंपारिक उर्जा साधनातून या हॉटेलमध्ये विद्युत पुरवठ्याची सुविधा आहे. शिवाय पावसाचे पाण्याचे पुनर्भरण व्हावे म्हणून हॉटेलमधील छतालालागून ‘ रेन वॉटर हार्वेस्टिंग’ चा प्रयोग केला आहे.
बांधकाम करतांना ईमारतीला सपोर्ट देण्यासाठी लोह वापरण्याऐवजी लोड बेअरिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. छतात मातीच्या मडक्यांचा ब नारळाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे रूम थंड राहते शिवाय हॉटेलच्या सौंदर्याला चार चांद लागतात. या हॉटेलमध्ये जमिनीत तब्बल 10 फुट खोल जमिनीत पीव्हीसी पाईपना गाडले आहे. हॉटेल मधील गरम हवा या पाईपद्वारा जमिनीच्या आत सोडल्या जाते, त्यांनतर हि गरम हवा नैसर्गिक पद्धतीने थंड होऊन पुन्हा हॉटेल मधील रूममध्ये सोडल्या जाते. त्यामुळे रूमला एसी प्रमाणे थंडावा मिळतो. यामुळे या ठिकाणी एकाही रूम मध्ये एसी बघायला मिळत नाही. कितीही गर्मी झाली तरी या हॉटेल मधील तापमान 18 ते 25 डिग्री पर्यंत मेंटेन राहते. हॉटेल मधील वापरातील सर्व पाणी जमिनीत सोडून पुन्हा त्याचा वापर केला जातो. या हॉटेलमध्ये आणखी थंडावा येण्यासाठी व हॉटेलचे सौंदर्य खुलण्यासाठी येथे नानाविध प्रकारच्या देशी रोपट्याचे रोपण केले आहे. येथील आरामदायी खुर्च्या, बेड, कपाट, झुला, सोफा ह्या वस्तू बांबूपासून बनविल्या आहे. भिंतीतील गरम हवा बाहेर निघण्यासाठी भिंतीला जागोजागी झरोके बघायला मिळतात. हवेसाठी रूममध्ये डक्टिंग सिस्टीम चा वापर केला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी छोटे थियेटर बघायला मिळेल. ज्यात तुम्हाला थंड जागेत चित्रपट गृहाचा अनुभव प्राप्त होईल.