कला उत्सवात समर्थ हायस्कूल, गुरुदेव विद्यामंदिर, जनता हायस्कूलची बाजी
डाएटचे आयोजन : स्पर्धेत 72 शाळांतील 246 विद्यार्थ्यांचा सहभाग
कला उत्सवात समर्थ हायस्कूल, गुरुदेव विद्यामंदिर, जनता हायस्कूलची बाजी
डाएटचे आयोजन : स्पर्धेत 72 शाळांतील 246 विद्यार्थ्यांचा सहभाग
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) अमरावती येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कला उत्सवात नृत्य व दृश्यकला या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावीत समर्थ हायस्कूल अमरावती ने बाजी मारली. तसेच स्पर्धेतील सर्वाधिक बक्षीस श्री गुरुदेव विद्यामंदिर मोझरी तर तृतीय क्रमांकासाठी जनता हायस्कूल पूर्णानगर(भातकुली) यांनी बाजी मारली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे जेष्ठ अधिव्याखता डॉ.विजय शिंदे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जेष्ठ अधिव्याखता प्रेमला खरटमोल,अधिव्याखाता डॉ.राम सोनारे, डॉ.विकास गावंडे, दीपक चांदुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत सन 2015 पासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी कला उत्सवात एकूण 6 कला प्रकारांचा समावेश होता. गायन, वादन, नृत्य, नाटक, दृश्यकला व कथावाचन आदी कलेचा समावेश या स्पर्धेत होता.
कला उत्सवात नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक शासकीय निवासी मुलींची शाळा, हिंगणगाव (धामणगाव रेल्वे), द्वितीय क्रमांक गणेशदास राठी विद्यालय अमरावती, तृतीय क्रमांक एस. एन. हायस्कूल वलगाव यांना मिळाला. नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ हायस्कूल अमरावती, द्वितीय क्रमांक न्यू ऑरेंज सिटी वरुड, तृतीय क्रमांक माध्यमिक कन्या शाळा नांदगाव पेठ यांना मिळाला. गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री गुरुदेव विद्यामंदिर मोझरी, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय नांदगाव पेठ, तृतीय क्रमांक प्रबोधन विद्यालय दर्यापूर, यांना प्राप्त झाला. वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक मनीबाई गुजराथी हायस्कूल अमरावती, द्वितीय क्रमांक गुरुदेव विद्यामंदिर मोझरी, तृतीय क्रमांक जनता हायस्कूल पूर्णानगर (भातकुली) यांनी बाजी मारली. कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक आदर्श हायस्कूल दर्यापूर, द्वितीय क्रमांक गुरुदेव विद्यामंदिर मोझरी, तृतीय क्रमांक गुरुकुंज विद्यामंदिर मोझरी, यांना मिळाला. दृश्यकला या स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ हायस्कूल अमरावती, द्वितीय क्रमांक आर आर लाहोटी हायस्कूल मोर्शी, तृतीय क्रमांक जनता हायस्कूल पूर्णानगर (भातकुली) यांना मिळाला.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम समन्वयक अधिव्याख्याता डॉ.विकास गावंडे, साधनव्यक्ती संगीता क्षीरसागर, अर्चना उके, नलिनी बाबरे, ममता गुर्जर, गोपाल ढवळी, मुकुंद वरघट, पंकज भांबुरकर, निशिकांत दाळू व गजानन पाठक आदींनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संगीता क्षीरसागर(येते) यांनी केले. परीक्षक म्हणून स्वरांजन संगीत कला विद्यालय अमरावतीचे आदित्य पाचघरे, सुवर्णा नवले, शिवाजी चित्रकला महाविद्यालयचे चारनाथ श्रावस्ती, निरंजन नवले आदींनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
डाएटमध्ये विद्यार्थांचा किलबिलाट :-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत अगोदर डी.एड. प्रवेशोत्सव व विद्यालयमुळे विद्यार्थ्यांची चहलपहल व राबता असायचा . यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा मधील गुणदानामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांनी प्रथमच मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कला उत्सव स्पर्धेत नऊ वर्षात पहिल्यांदाच जिल्ह्यातील तब्बल 72 शाळांमधील 246 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामुळे अनेक वर्षानंतर डाएट संस्थेला विद्यार्थ्यांच्या वेशभूषा, मेक-अप, नाट्य रंगीत तालीम, ने आण करण्यासाठी चारचाकी गाड्यांमुळे परिसराला जुने दिवस अनुभवाला मिळाले. सकाळी सुरु झालेली हि स्पर्धा रात्री 10 पर्यंत चालल्याने संस्थेत दिवसभर किलबिलाट अनुभवाला मिळाला.