राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यात तनिष्का तेलभरे प्रथम
कृत्रिम बुद्धिमत्ता ही तिसरी क्रांती - जिल्हाधिकारी सौरभ कटियार
राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यात तनिष्का तेलभरे प्रथम
कृत्रिम बुद्धिमत्ता ही तिसरी क्रांती – जिल्हाधिकारी सौरभ कटियार
राज्यस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2024 -25 दिनांक 21 सप्टेंबर रोजी सर सी. व्ही. रमण सभागृह, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. व्ही.जी. ठाकरे हे होते.
उद्घाटन सत्राला मार्गदर्शन करतांना अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी सध्याचे युग हे ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे असून ह्या विषयावर शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होणे गरजेचे आहे. पहिली क्रांती कृषी क्रांती, दुसरी क्रांती माहिती तंत्रज्ञानाची तर तिसरी क्रांती ए आय ची आहे. या स्पर्धेतील विद्यार्थी निश्चित मला वेगळ्या उंचीवर दिसेल असा आशावाद त्यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कार्यकारण भाव समजून विश्लेषणात्मक विचाराची जागृती करणे, स्पर्धात्मक वैज्ञानिक दृष्टीकोन वृध्दिंगत करून भावी वैज्ञानिकांना विचारांच्या आदान प्रदानाची संधी उपलब्ध करून देणे. देशात विखुरलेल्या प्रज्ञावान युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करणे हे उहिष्टे समोर ठेवून राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद कोलकत्ता व नॅशनल कौन्सिल ऑफ सायंन्स म्युझियम दरवर्षी अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करीत असते. यावर्षी कृत्रिम बुध्दिमत्ता संभाव्यता व आवाहने हा मेळाव्याचा मुख्य विषय होता. राज्यस्तरावर आठ विभागातील सुमारे 16 विद्यार्थी आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले.
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय कोलकत्ता, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई, रामन विज्ञान केंद्र नागपूर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान संस्था नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती आदींच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले.
ह्या स्पर्धेत सेलू (परभणी) एल.के.आर. आर. प्रिन्स इंग्लिश स्कूलची कु. तनिष्का अनंत तेलभरे ह्या विद्यार्थिनीने उत्तम सादरीकरण करत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तनिष्का तेलभरे ही 20 नोव्हेंबर रोजी नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
यावेळी उत्तेजनार्थ बक्षीस प्राची संगवी (अकोला), समृध्दी राऊत ( पुणे), अमित कुमार ( सातारा), कृतिका देशमुख (जळगाव), सार्थक देसाई (मुंबई), सोहम चिल्लमवार (गडचिरोली) यांना प्राप्त झाले. यासह राज लोंढे ( धाराशिव), उन्मेष देशमुख (नागपूर) स्वरा शिंदे(लातूर), सोहम पोंडे(पुणे), निधी सावंत(सिंधुदुर्ग), अनुष्का बदूकले (यवतमाळ), शेख सेहर कमल असिफ, (मुंबई)आर्या नाईक (छत्रपती संभाजीनगर) , अथर्व व्यवहारे (नाशिक) ह्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रम तथा बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय प्राचार्य डॉ. व्ही.जी.कोरपे हे होते. यावेळी राज्य विज्ञान संस्थेच्या संचालक डॉ.हर्षलता बुराडे, अमरावती डाएटचे प्राचार्य मिलिंद कुबडे, अकोला डाएटचे प्राचार्या रत्नमाला खडके, शिक्षणाधिकारी (योजना) निखिल मानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षलता बुराडे, संचालन स्वप्नील अरसळ, प्रवीण राठोड यांनी तर आभार डॉ पंकज नागपूर यांनी मानले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. दीपक झटाले, प्रा.आर. एस. मावळे , प्रा. योगेश हुषारे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी, विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विज्ञान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.