एकाच दिवशी १३ पेटंट चा विश्वविक्रम
हळदीची गुणवत्ता वाढणार… सीएनजी होईल स्वस्त
महाराष्ट्राचे पेटंटवीर म्हणून ओळख असलेले युवा संशोधक अजिंक्य कोत्तावार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून स्थापन केलेल्या ‘प्री रायझो ल्यूशन’ या संस्थेने एकाचवेळी 13 पेटंट प्राप्त करण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. हळद पिकावरील १० पेटंट व ३ पेटंट हे ऊर्जेशी संबधित आहे. आतापर्यत एकाच दिवशी २५ पेटंट नोंदणी करण्याचा विक्रम झालेला आहे परंतु एकाच दिवशी १३ पेटंट एखाद्या व्यक्तीला किंवा कंपनीला मिळण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे युवा संशोधक अजिंक्य कोत्तावार यांनी सकाळ ला सांगितले.
जगातील 90 टक्के हळदीचे उत्पादन भारत देशात घेतल्या जाते. मात्र हळदीवरील उत्पादनाचे पेटंट ईतर राष्ट्रांकडे होते. पहिल्यांदा पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर या संशोधकाने भारतातील पहिले हळदीवरील पेटंट संदर्भात लढा उभारला. डॉ. माशेलकर यांचे मार्गदर्शनात भारतीय युवा संशोधकांनी तब्बल 15 पेटंट दाखल केले आहे, पैकी 13 पेटंटचा स्वामित्व हक्क ‘प्री रायझो ल्यूशन’ च्या संशोधकांना मिळाला आहे.
हा होणार फायदा :
13 पैकी 10 पेटंट हे हळदीवरील आहे. या संशोधनामुळे हळदीचा गुणात्मक दर्जा वाढलेला असून कर्क्युमिन घटकाची टक्केवारी वाढली आहे. कर्क्युमिन हे घटक कॅन्सर व ईतर दुर्धर आजारावर रामबाण कार्य करते. ओल्या हळदीेपासून तेल, टूथपेस्ट, कोल्ड्रिंक्स, न्युट्रियस ड्रिंक, काढा, ओलिरेझिन सारखे प्रोडक्ट तयार केले जाणार आहे. याचा फायदा हळदीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. या विश्वविक्रमात अजिंक्य कोत्तावार यांचेसह अशपाक पिंजारी, मिलन शाह भरतकुमार पटेल, हर्शल गटकी,जिग्नेश पटेल, हसमुख पटेल यांचा समावेश आहे. 15 जून रोजी त्यांनी 15 पेटंट नोदणी कार्यालयाकडे नोंदविले आणि नुकतेच त्यांना एकाचदिवशी १३ पेटंटचे स्वामित्व हक्क प्राप्त झाले आहे.
सीएनजी होणार स्वस्त :-
नेपियर नावाच्या वनस्पती पासून सीएनजी तयार होतो मात्र या प्रक्रियेला अधिक वेळ लागत असल्याने सीएनजी दरात तफावत आढळते. अजिंक्य कोत्तावार यांनी इंडीयन नेपियर नावाची नवीन प्रजाती विकसित केली असून शेतकऱ्यांना कोणत्याही जमिनीत हे पीक घेऊन नफा कमावता येणार आहे. कचरा विघटना दरम्यान जास्तीत जास्त उर्जा मिळविण्यासाठी सुद्धा महत्वाचे संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे सीएनजी निर्मितीची प्रक्रिया कालावधी कमी होणार असून सर्व कर मिळून केवळ 30 ते 35 रुपयात सीएनजी तयार होणार असल्याचे संशोधक अजिंक्य कोत्तावार यांनी सांगितले. या संशोधनामुळे या विक्रमाची नोंद लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ,एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच लिम्का बुकात होणार असल्याचे अजिंक्य कोत्तावार यांनी सांगितले.