
प्रशासनाची मेळघाटवारी
एक दिवस मेळघाटसाठी
आषाढ महिना म्हटला कि सर्वत्र रेलचेल राहते पंढरीच्या वारीची. एकीकडे संपूर्ण वारकरी पंढरपूरमध्ये जमले असतांना याच दरम्यान अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार व मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या पुढाकारातून एक दिवसीय मेळघाटवारीचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वाधिक प्रशासकीय खर्च हा मेळघाट या भागात होतो. एवढा खर्च होऊन आदिवासी लोकांच्या समस्या काही केल्या कमी होत नसल्याने ते वारंवार जिल्ह्यावर आपले म्हणणे मांडायला जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयात येतात. नेहमी शोषित व पिडीतांनी जिल्ह्यावर आल्यापेक्षा जिल्हा प्रशासन जर त्यांच्या दारी गेले तर सत्य परिस्थिती कळेल या हेतून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकारातून ‘एक दिवस मेळघाटसाठी’ या आगळ्या वेगळ्या वारी वजा उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.
उपक्रमाचे उद्दिष्टे :-राज्यात महत्वाच्या बैठकांमध्ये ‘मिशन मेळघाट’ वर विशेष भर दिला जातो. आकांक्षित तालुक्यातील निर्देशांक पूर्ण करणे, गावकरी व प्रशासन यांच्यातील दरी कमी करून त्यांच्या किरकोळ समस्या जागीच सोडविणे, शासनाच्या योजनांची माहिती सर्व सामान्यांना देणे, महत्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याच्या उद्दिष्टाने या एक दिवसीय मेळघाटवारीचे नियोजन करण्यात आले.
उपक्रमाचे नियोजन :-यामध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या समन्वयातून 100 गावांची निवड करण्यात आली. 100 गावात प्रशासनातील 100 कार्यकुशल अधिकारी यांच्या नेतृत्वात दोन ते तीन लोकांचे पथक नेमण्यात आले. सदर पथकाला शासनाचे आदेश तथा विनंती असल्याने सर्वच 100 पथक आवडीने व स्वखर्चाने मेळघाटात दाखल झाले. या उपक्रमात विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने तपासणीच्या अनुषंगाने प्रशासनाद्वारा दोनदा प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ.कैलास घोडके यांनी प्रत्येक विषय प्रत्येक टीम सदस्यांना नीट समजावा यासाठी विभाग निहाय व्हिडीओ संबधितांना पाठविले. आदिवासींना प्रशासन आपलेसे वाटावे यासाठी कोरकू बोलीभाषेतील शब्दावली देवून त्यांच्या मायबोलीत संवाद करण्याची विनंती केली.
‘नायक’ चित्रपटातील नायकाप्रमाणे या टीमचा प्रमुख जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी असल्याने 100 गावे अलर्ट मोडवर आली. या मिशन मध्ये गावातील 10 प्रमुख विभागांची पाहणी करण्याचे उद्दिष्टे देण्यात आले. यामध्ये गावातील सर्व साधारण माहितीसह, आरोग्य, महिला व बाल विकास, पंचायत, शिक्षण, पशु संवर्धन, महसूल, कृषी, दिव्यांग, बांधकाम व ईतर संकीर्ण माहितीचे प्रत्यक्ष सद्यस्थितीचे निरीक्षण नोंदवायची होती.

मेळघाटातील सद्यस्थिती :- गावातील ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, शिक्षक, कृषी सहायक,पशु सहायक आदी सर्व शासकीय कर्मचारी गावात शासकीय योजनाची अंमलबजावणी नीट करतात कि नाही या संदर्भातील वास्तव या मेळघाटवारीच्या निमित्याने बाहेर आले. अनेक गावात सध्या लाडकी बहिण योजना चर्चेचा विषय ठरत आहे. योजनेच्या निमित्याने कर्मचारी उपस्थितीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. अनेक गावात पिण्याचे पाणी आणि सांडपाणी यांचे नियोजन नसल्याचे समोर आले. साहित्य असूनही हर घर जल पोहचले नाही, ग्रामपंचायत मध्ये पाणी स्वच्छता साठी ब्लिचिंग पावडर उपलब्ध असून त्याचा वापर नसणे आदी अनेक समस्यांची सद्यस्थिती गावात पोहचलेल्या पथकासमोर आली. या निमित्याने काही पथकांना गावांत अंगणवाडी, शाळा तसेच ईतर विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचे उल्लेखनीय कार्य बघायला मिळाले. पथकांनी सुद्धा मिशन मेळघाट @ 28 अंतर्गत अंगणवाडीताई व आशाताईची मुक्त कंठाने तारीफ केली .

प्रतीक्षा निर्णयाची :- प्रशासनाने 100 गावातील सद्यस्थिती बघून माहिती संकलित केली आहे. आता यावर 22 जुलै रोजी जिल्हाधिकारीसमोर पथक प्रमुख अहवाल सादरीकरण करणार आहे. या सभेत जिल्हाधिकारी 100 गावातील यंत्रणेला समस्यांचा निपटारा करण्याची संधी देईल कि संबधितावर कार्यवाही करणार हे सभेत ठरणार. मेळघाटातील एकूण 314 गावांपैकी 100 गावांची वारी झाली उर्वरित 214 गावांसाठी पुन्हा प्रशासन भेटीचे नियोजन करेल कि कर्मचाऱ्यांच्या येणाऱ्या समस्या जाणून घेईल किंवा शासकीय योजना पोचविण्यासाठी एखाद्या डिजिटल मार्गाचा अवलंब करेल किंवा पुन्हा आकस्मिक भेटी देईल किंवा विभाग प्रमुख यांचे मार्फत या उपक्रमाचा पाठपुरावा करेल आदी प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे.

बैठकीत काहीही होवो परंतु प्रशासनाने स्वयं पुढाकार घेवून निसर्गवासी आदिवासींच्या प्रश्नांची जाण ठेवत ‘एक दिवस मेळघाटसाठी’ हा उपक्रम राबविल्याने मेळघाटातील 314 गावातील जनसामान्यांच्या मनात घर केले आहे. मेळघाट वारीच्या निमित्याने प्रत्येक आदिवासी लोकांचे जगणे सुकर व सुलभ होवो बस एवढचं.