मृत्यूतून पेरला गोडवा
कोणी उंबर या वनस्पतीचे फुलं बघितली का ? हा प्रश्न आपल्याला पडल्यावर आपणही विचारात पडला असाल. उंबराची फळे तर अनेकांनी खाल्ली पण फुलं पाहिल्याचे आठवणार नाही. उंबर किंवा औदुंबर हि वनस्पती जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. शिवाय हे 24 तास प्राणवायू हवेत सोडते. याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात. त्यामुळे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होतो.
या झाडाचे फूल कधीच दिसत नाही. उंबर हेच याचे फूल. उंबरामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. उंबरात किडे असतात. फळ कापल्यास ही फुले दिसतात. ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. या चिलटाचे वैशिष्टे म्हणजे यातील मुख्य मादी अंडी घालून अनेक नर, मादीं पिल्लांना जन्म देते. हि मादी स्वतः तिच्या पिल्लांना बंद फळाबाहेर काढत आपली कुर्बानी देते. ती मृत्युपर्यंत कार्य करून यात विलीन होत या फळात पौष्टिकता निर्माण करते. वड, पिंपळ, उंबर व अंजीर या फळांची रचना ही बाहेरून फळात आतून फुले अशी आहे. यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात. उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागात मान्यता आहे.
नृसिंहाची आख्यायिका :-
या झाडाखाली सद्गुरू दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते. भगवान विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला. त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले. लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांमुळे होणारा दाह थांबला असल्याचे दाखले पुराणात दिले जातात.
औषधीय गुणधर्म :-
उंबर हि वनस्पती गालगुंड, गालफुगी, वृक्ष ,पानांचा रसामुळे उष्णता दूर करतात. खाज, कावीळ, रक्तस्त्राव, गोवर, कांजण्या,`विंचूच्या चावणे किंवा इतर विषावर उतारा चावणे, रक्तस्राव, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. शरीराची व्याधी दूर करणारे म्हणून याची ख्याती आहे. या बहुउपयोगी झाडाचा बीजप्रसार पक्ष्यांमार्फत होतो.
अंजिराएवढे उंबर पौष्टिक:-
जेवढी पौष्टिकता अंजीर फळात असते तेवढीच ती उंबरात असते, पण अंजिराला ड्रायफूटचा मान मिळाला तर उंबर मात्र पिकून झाडाखाली त्याचा सडा पडलेला दिसतो. उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते.
उंबरा बद्दल ची रोचक माहिती मिळाली…धन्यवाद
Shrinath,
Always writes a fascinating and interesting facts about the things I have seen from my childhood. His blogs are always informative.