
लाल चे झाले लालासाहेब
निसर्ग संवर्धनातून मिळाली साहेबची पदवी
लाल यांचे वडील वनखात्यात रखवालदार. त्यांची मजुरी केवळ दोन रुपये. तीन भावंडासह प्राथमिक शिक्षण घेतांना वडिलांना मदत म्हणून प्लास्टिक पिशवीत रोपट्यासाठी माती भरण्याचे काम करायचे.100 पिशव्या भरल्यावर एक रुपया मिळायचा. शिवाय वनखात्यातील कामासाठी तमदलगे जंगलातील वडिलांसह फिरस्ती वेगळी. पाचवीला दुसऱ्या गावात प्रवेश झाला. पण एकदा शाळेला उशीर झाल्यामुळे तेथील गुरुजींनी कानशिलात लगावली. त्यामुळे शाळेऐवजी जंगल प्रिय वाटू लागले. शाळा सोडून वाईट संगत मिळाल्याने लाल मिळेल त्या मार्गाने पैसा कमवू लागला. अगदी दारू गाळून सुद्धा पैसा घरात आणू लागला. या दरम्यान लालचे लग्न झाले व संसार वेलीवर दोन मुली जन्माला आल्या. चिमुकल्या मुलीच्या खेळण्या बागडण्याच्या दिवसात आनंदी जीवन जगणाऱ्या लालच्या आयुष्यात वाम मार्गाच्या व्यवसायामुळे जेलची हवा खायची वेळ आली.
जेल मध्ये बंदिस्त असतांना लालच्या आयुष्यात आंतरिक बदल झाला. कारागृहातील झाडांमुळे इलेक्ट्रिक तारांना स्पर्श होऊ नये म्हणून कारागृह प्रशासनाने डझनभर झाडे कापण्याचा निर्णय घेतला. सन 2001 मधील हि घटना. तेंव्हा लालने जेलर ला झाडे कापण्याला विरोध करत केवळ फांद्या कापण्याची विनंती केली शिवाय याची स्वतःहून जबाबदारी स्वीकारली. लालच्या पुढाकाराने केवळ तुरुंग परिसरातील डझनभर झाडे वाचली नाही तर त्या झाडावरील असंख्य पक्ष्यांचे कुटुंब उघड्यावर येण्यापासून वाचले.
कारागृहाबाहेर आल्यावर पत्नी व मुलींवरील प्रेमापोटी आपण कधीही वाममार्गाला जाणार नाही हा निर्धार त्याने केला. घरी आल्यावर रोजगार नसल्याने खाण्यापिण्याची परवड होती. अचानक 2003 मध्ये पुण्याजवळील पानशेत भागात एका फार्म हाउस वर रखवालदारी, वृक्षारोपण करण्याचे काम मिळाले. बालवयात वडिलांकडून वृक्षारोपणाचे कौशल्य आता चांगलेच कामी येत होते. मनासारखे काम मिळाले कि व्यक्ती जीव ओततो. छोट्याशा जागेत लालने पन्नास झाडे लावली व जगविली.
असाही योगायोग :-
धनंजय शेडबाळे हे त्या फार्मचे मालक. या मालकाने केवळ स्वतःचे फार्म हाऊसच सांभाळले असे नाही तर पानशेत परीसरात पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी देखील सेवाभावी वृत्तीने मोठे कार्य सुरु केले होते. या कामामध्ये बंधारे निर्मिती, त्यासाठी ग्रामस्थांना प्रेरीत करणे, देशी झाडांच्या बिया गोळा करणे, त्यांची रोपे बनवणे, जनजागरण करणे अशी अनेक कामे धनंजय शेडबाळे हे स्वतः करायचे. लाल च्या कामामुळे, त्यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या आवडीमुळे मालकांनी लाल ला या सर्व कामात सहभागी करुन घेतले. लालच्या कामामुळे त्याची सर्वत्र ओळख होऊ लागली. त्यांना ‘देवराई’ या संस्थेत काम करण्याची पुर्ण मोकळीक दिली. आता लालची ओळख लालासाहेब माने म्हणून होऊ लागली. कधी एकेकाळी ज्या शिक्षकामुळे शाळा नावडती झाली आणि शिक्षण कायमचे सुटले ती व्यक्ती व ज्या व्यक्तीमुळे समाजात नवीन ओळख, मानसन्मान मिळाला ह्या दोन्ही व्यक्तीचे आडनाव एकच होते ते म्हणजे शेडबाळे. केवढा हा योगायोग.
पुढे घोरावडेश्वर डोंगरावर वृक्षारोपण करणे व त्या झाडांची जपणूक करणे हे जणु पिंपरी चिंचवड करांचे एक जनआंदोलनच झाले. २००८ मध्ये उजाड डोंगर असलेल्या ठिकाणी आज हिरवीगार झाडे बहरली आहे. या डोंगरावर लालासाहेब यांनी स्वतःच्या हाताने अनेक झाडे लावली. अनेकांना वृक्षारोपणसाठी मार्गदर्शन व सहकार्य केले. या झाडांना जगविण्यासाठी चक्क खांद्यावर पाणी वाहुन नेले आहे. नंतर त्यांच्यातील गवंडी, प्लंबर जागा होऊन डोंगरवर झाडांना पाणी देण्यासाठी कायमस्वरुपी सोय त्यांनी केली. अनेकदा उन्हाळ्यात या डोंगराला लागलेल्या वणवे लालासाहेब यांनी अन्य निसर्गमित्रांच्या मदतीने विझवले.
विविध पुरस्काराचे मानकरी :-
पुण्याच्या पश्चिम पट्ट्यात फिरुन दुमिळ होत चाललेल्या शेकडो प्रजातीच्या झाडा-झुडपांचे, वेलींचे संरक्षण त्यांनी बीज गोळा करून व त्यापासुन रोपे बनवुन केले आहे. देवराई संस्थामार्फत शेतकऱ्यांना मोफत रोपटे भेट व मार्गदर्शन असते ते लालासाहेब माने यांचे. अंग्लया, चुक्राशिया, फनसाडा, रान जायफळ, कुकेर, महावेल गारंबी, महावेल अरणो, क्रेशा आदी विविध दुर्मिळ रोपटे पुन्हा सह्यान्द्री मध्ये रुजविल्या जात आहे. लालासाहेब हे देवराई सोबतच पाणी फौंडेशन, नाम फौंडेशन सोबत जुडले आहेत. त्यामुळे नाना पाटेकर, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे सारख्या ज्येष्ठ कलाकारांशी लालासाहेबांची मैत्री आहे. लालासाहेबांची पवना नदीतील प्रदुषण, प्लास्टिक मुक्ती अभियान अंतर्गत जनजागरण, प्लास्टिक संकलन व त्यानंतर त्यावर पुनर्प्रक्रिया आदी कामे देखील नियमितपणे सुरु आहे. कधीकाळी वाल्याच्या रुपात असलेला लाल आज वाल्मिकी प्रमाणे लालासाहेब माने म्हणून समाजात विविध सत्कार व पुरस्काराचे मानकरी ठरत निसर्ग संवर्धनाचे मोठे भरीव कार्य करत आहे.