लोकसहभागातून जंगलातील पाणपोई

लोकसहभागातून जंगलातील पाणपोई
अक्षय तृतीया …साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. अनेक जन या दिवशी आपल्या पूर्वजांच्या स्मुतीप्रीत्यर्थ पाणपोई लावतात. आजपर्यंत अनेकांनी ह्या पाणपोई केवळ माणसांसाठी लावलेल्या आपण बघितल्या आहे. मात्र वाशीम जिल्ह्यातील वनोजा वनविभागात लोकसहभागातून वन्यजीवांसाठी राज्यातील पहिली जंगल पाणपोई तयार करण्यात आली. पाच वर्षापूर्वी स्थानिक हेल्पिंग हँड वाईल्ड एडवेन्चर एंड नेचर क्लब वाशीम द्वारा सुमारे 20 ते 22 हजार लोकवर्गणी जमा करून प्रादेशिक वनविभाग अंतर्गत पाच पाणपोई (पाणवठे ) ची निर्मिती करण्यात आली.
वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने यात वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. जानेवारीच्या अखेरीस या जंगलामधील नैसर्गिक जलस्त्रोत हे आटून जातात. यामुळे वन्यजीवांना घोटभर पाण्यासाठी सर्वत्र भटकंती करावी लागते. कधीकधी पाण्याच्या शोधात वन्यजीव गावाकडे धाव घेतात यामुळे मानव – वन्यजीव संघर्ष वाढतो. ह्या समस्यांवर उपाय योजना म्हणून तत्कालीन उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांच्या मार्गदर्शन तथा सहकार्यातून प्रादेशिक जंगलामध्ये लोकवर्गणीतून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले.
एम.एच 29 हेल्पिंग हँड वाईल्ड एडवेन्चर एंड नेचर क्लब शाखा वाशीमचे शुभम एकड, प्रवीण गावंडे, सौरव इंगोले, राहुल साखरे, अक्षय खंडारे, आदित्य इंगोले आदी युवकांनी स्थानिक लोकांना वन्यजीव व जैवविविधता यांचे महत्व पटवून देत लोकसहभाग मिळविला. ज्या ठिकाणी मालवाहतूक करणारे वाहन जात नव्हते तेथे प्रसंगी डोक्यावर पाणी, विटा,रेती नेऊन या पाणवठ्यांचे काम पूर्णत्वास नेले. त्यांच्या ह्या परिश्रमातून निर्माण झालेल्या चार पाच ठिकाणच्या जंगल पाणपोईतून वन्यजीवांची तहान भागविल्या जात आहे. यामुळे रानडुक्कर, मोर, नीलगाय, भेकर, सायाळ, कोल्हा, लांडगा, तडस, ससा बिबट सारख्या वन्यजीवांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. यासोबत या युवकांनी पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी जल पात्र ठिकठिकाणी लावलेले आहेत. वनविभागाच्या विविध रेस्क्यू कार्यात सुद्धा या युवकांचा सक्रीय सहभाग असतो. वन्यजीवांच्या पाणपोईच्या माध्यमातून शास्वत कार्य हे युवकांनी लोकसहभागातून घडवून आणत समाजात प्रेरणादायी कार्य केले आहे.